Nepal secure Asia Cup 2023 spot: मंगळवारी नेपाळ क्रिकेट संघाने मोठा इतिहास रचला आहे. नेपाळने आशियाई क्रिकेट परिषदेच्या प्रीमयर कप स्पर्धेच्या अंतिम सामन्यात संयुक्त अरब अमिराती (UAE) संघाला पराभूत केले. याबरोबरच विजेतेपद पटकावत सप्टेंबरमध्ये होणाऱ्या आशिया चषक 2023 स्पर्धेसाठी पात्रता मिळवली आहे.
नेपाळ आशिया चषक 2023 स्पर्धेसाठी पहिल्यांदाच पात्र ठरला आहे. त्यामुळे आता नेपाळ या स्पर्धेत साखळी फेरीत भारत आणि पाकिस्तान संघासह अ गटात खेळेल. ब गटात श्रीलंका, बांगलादेश आणि अफगाणिस्तान संघांचा समावेश आहे.
याशिवाय प्रीमियर कप स्पर्धेत नेपाळ, युएई आणि ओमान या संघांनी पहिले तीन क्रमांक पटकावल्याने ते जुलैमध्ये उदयोन्मुख आशिया चषकातही खेळतील. या स्पर्धेत आयसीसीचे पूर्ण सदल्स असलेल्या आशिया खंडातील 5 देशांचे अ संघही सहभागी होणार आहेत.
प्रीमियर कपचा अंतिम सामना सोमवारीच सुरू झाला होता. पण सोमवारी पावसाचा व्यत्यय आल्याने सामना थांबवण्यात आला. सामना थांबला तेव्हा प्रथम फलंदाजी करणाऱ्या युएईने 9 बाद 106 धावा केल्या होत्या. सोमवारी हा सामना परत चालू झाला नाही. त्यामुळे मंगळवारी राखीव दिवशी सामना पूर्ण करण्यात आला.
मंगळवारी युएईचा डाव 33.1 षटकात 117 धावांवर संपुष्टात आला. युएईकडून असिफ खानने सर्वाधिक 46 धावांची खेळी केली. त्याच्याव्यतिरिक्त कोणालाही 15 धावांचा टप्पाही ओलांडता आला नाही. नेपाळकडून ललित राजबांशीने सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या.
त्यानंतर 118 धावांच्या आव्हानाचा पाठलाग नेपाळने 30.3 षटकात 3 विकेट्स गमावत पूर्ण केला आणि हा सामना सात विकेट्सने जिंकला. नेपाळकडून गुलशन झा 67 धावांवर नाबाद राहिला, तसेच भीम शार्की 36 धावांवर नाबाद राहिला. युएईकडून रोहन मुस्तफाने सर्वाधिक 2 विकेट्स घेतल्या.
आशिया चषक 2023 चे यजमानपद पाकिस्तानकडे आहे. आणि ही स्पर्धा नियोजित वेळेनुसार सप्टेंबरमध्ये होणार आहे. मात्र, बीसीसीआयने भारतीय संघाला पाकिस्तानला पाठवण्यासाठी नकार दिला आहे. त्यामुळे या स्पर्धेच्या आयोजनावर सध्या प्रश्नचिन्ह आहे.
पण मागील काही दिवसात समोर आलेल्या माहितीनुसार असा सुवर्णमध्यही काढण्यात आला आहे की भारतीय संघ पाकिस्तानला न जाता तटस्थ ठिकाणी सामने खेळेल. तर अन्य संघांचे सामने पाकिस्तानमध्ये होतील.
पण अद्याप आशिया चषकाच्या आयोजनाबद्दल कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.