Mumbai Indians Dainik Gomantak
क्रीडा

WPL 2023: मुंबई इंडियन्सचा ऐतिहासिक विजय! रोमांचक फायनलमध्ये दिल्ली कॅपिटल्स पराभूत

MI vs DC: मुंबई इंडियन्स संघाने दिल्ली कॅपिटल्सला पराभूत करत पहिल्या वूमन्स प्रीमियर लीगचे विजेतेपद जिंकण्याचा इतिहास रचला.

Pranali Kodre

Mumbai Indians vs Delhi Capitals: मुंबई इंडियन्स संघाने रविवारी पहिल्या वहिल्या वूमन्स प्रीमियर लीगचे विजेतेपद जिंकण्याचा इतिहास रचला आहे. मुंबईने ब्रेबॉर्न स्टेडियमवर झालेल्या अंतिम सामन्यात मेग लेनिंगच्या नेतृत्वातील दिल्ली कॅपिटल्सचा ३ चेंडू राखून आणि ७ विकेट्सने पराभव केला.

अंतिम सामन्यात दिल्लीने मुंबईसमोर १३२ धावांचे आव्हान ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग मुंबईने १९.३ षटकात ३ विकेट्स गमावत १३४ धावा करत पूर्ण केला.

या सामन्यात १३२ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना मुंबईची सुरुवात फारशी चांगली झाली नव्हती. मुंबईने २३ धावातच २ विकेट्स गमावल्या होत्या. पण नंतर हरमनप्रीत कौर आणि नतालिया स्किव्हर-ब्रंट यांनी मुंबईचा डाव सावरला. पण तरी दिल्लीच्या गोलंदाजांनी शिस्तबद्ध गोलंदाजी करताना धावगतीवर नियंत्रण ठेवले होते.

त्यातच हरमनप्रीत कौर १७ व्या षटकात ३९ चेंडूत ३७ धावांवर धावबाद झाली. त्यामुळे तिची आणि नतालियाची ७२ धावांची भागीदारी तुटली. पण नंतर नतालियाला एमेलिया केरने चांगली साथ दिली. या दोघी फलंदाजी करत असताना १२ चेंडूत मुंबईला २१ धावांची गरज होती. पण १९ व्या षटकात नतालिया आणि एमेलियाने ३ चौकार मिळून १६ धावा काढल्या. त्यामुळे मुंबईसाठी विजय सोपा झाला.

अखेरच्या षटकात 5 धावांची गरज असताना पहिल्या तीन चेंडूतच या धावा करत एमेलिया आणि नतालियाने मुंबईच्या विजयावर आणि डब्ल्युपीएलच्या ट्रॉफीवर नाव कोरले. नतालिया स्किव्हरने ५५ चेंडूत ६० धावांची नाबाद खेळी केली. एमेलियाने नाबाद १४ धावा केल्या. दिल्लीकडून राधा यादव आणि जेस जोनासन यांनी प्रत्येकी १ विकेट घेतली.

तत्पूर्वी दिल्लीने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी केली होती. पण दिल्लीसाठी सुरुवात चांगली राहिली नाही. शफाली वर्मा, एलिस कॅप्सी आणि जेमिमाह रोड्रिग्स यांच्या स्वस्तात विकेट गमावल्या. त्यामुळे दिल्लीची अवस्था ३ बाद ३५ धावा अशी झाली होती.

पण नंतर मॅरिझेन कापने कर्णधार मेग लेनिंगला चांगली साथ देण्याचा प्रयत्न केला होता. त्यांच्यात चौथ्या विकेटसाठी ३८ धावांची भागीदारीही झाली होती. पण मॅरिझेनला एमेलिया केरने १८ धावांवर बाद केले. त्यानंतर १२ व्या षटकात खेळपट्टीवर स्थिरावलेली लेनिंगही धावबाद झाली. लेनिंगने २९ चेंडूत ३५ धावांची खेळी केली. ती बाद झाली तेव्हा दिल्लीच्या ५ बाद ७४ धावा झाल्या होत्या.

त्यानंतर दिल्लीने पुढच्या ४ विकेट्स ५ धावांत गमावल्या. त्यामुळे ९ बाद ७९ धावा अशी अवस्था दिल्लीची होती. पण अखेरच्या विकेटसाठी राधा यादव आणि शिखा पांडे यांनी नाबाद ५२ धावांची भागीदारी केली. त्यामुळे दिल्लीने २० षटकात ९ बाद १३१ धावा केल्या. राधाने १२ चेंडूत २७ धावांची नाबाद खेळी केली. तसेच शिखाने १७ चेंडूत २७ धावांची खेळी केली.

मुंबईकडून इजी वाँग आणि हेली मॅथ्यूज यांनी प्रत्येकी ३ विकेट्स घेतल्या. तसेच एमेलिया केरने २ विकेट्स घेतल्या.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Kushavati District: ‘कुशावती’बाबत नवीन अपडेट! भाडेकरू, हॉटेल कामगारांच्या पडताळणीचे आदेश; ओळखपत्राची सक्ती

1106 च्या ताम्रपटात उल्लेख असलेला गंडगोपाळ तलाव, करमळीचे सुलभातीचे तळे; गोवापुरीच्या जलव्यवस्थापनाचा लौकिक पुन्हा गवसेल?

Madhav Gadgil: खाण परिस्थिती नियंत्रणात आहे की नाही? गोव्यावर भरभरून प्रेम करणारे 'माधव गाडगीळ'

Kundaim Fire: कुंडई वीजतारांमुळे वाढला धोका! आगीच्या घटनांमध्ये वाढ; तातडीने उपाययोजना करण्याची मागणी

खोटी कागदपत्रं वापरून घेतला पासपोर्ट, गोव्यात करायची सलूनमध्ये काम; फिलिपिन्स महिलेसह स्थानिकाच्या आवळल्या मुसक्या

SCROLL FOR NEXT