Mitchell Starc cheering for wife Alyssa Healy in WPL 2023: वूमन्स प्रीमियर लीग 2023 स्पर्धा सध्या भारतात सुरू असून शुक्रवारी (24 मार्च) मुंबई इंडियन्स विरुद्ध युपी वॉरियर्स संघात एलिमिनेटरचा सामना पार पडला. या सामन्यात युपी वॉरियर्सला 72 धावांनी पराभवाला सामोरे जावे लागले. त्यामुळे एलिसा हेलीच्या नेतृत्वातील युपीचे स्पर्धेतील आव्हानही संपले.
या सामन्यात मुंबईने युपीसमोर विजयासाठी 183 धावांचे आव्हान ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना युपीला 17.4 षटकात सर्वबाद 110 धावाच करता आल्या. युपीची कर्णधार हेलीही या सामन्यात आक्रमक सुरूवात केल्यानंतर 6 चेंडूत 11 धावा करून बाद झाली.
हेलीला मुंबईकडून खेळणाऱ्या इजी वाँगने तिसऱ्या षटकात बाद केले. मुंबईची कर्णधार हरमनप्रीत कौरने हेलीचा सोपा झेल पकडला. दरम्यान, या महत्त्वपूर्ण सामन्यात तिला आणि युपी वॉरियर्सला पाठिंबा देण्यासाठी स्टेडियममध्ये हेलीचा पती आणि ऑस्ट्रेलिया पुरुष संघाचा स्टार वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्क देखील उपस्थित होता.
त्यामुळे जेव्हा हेली स्वस्तात बाद झाली, तेव्हा स्टार्क प्रचंड नाराज झालेला दिसला. त्याच्या चेहऱ्यावर दिसत असलेली नाराजी कॅमेरातही कैद झाली. त्याने हेलीच्या विकेटनंतर नाराजीने डोके हलवतानाचा व्हिडिओही सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. विशेष म्हणजे हेलीचा शुक्रवारी 33 वा वाढदिवसही होता.
ऑस्ट्रेलिया महिला क्रिकेट संघाची स्टार यष्टीरक्षक असलेल्या हेलीला युपीने डब्ल्यूपीएलसाठी कर्णधार केले आहे. दरम्यान, तिचा शुक्रवारी युपी संघातर्फे जोरदार वाढदिवसही साजरा करण्यात आला. एलिमिनेटर सामन्यापूर्वी तिचा वाढदिवस साजरा करण्यात आला होता. यावेळी स्टार्कही उपस्थित होता.
खरंतर फेब्रुवारीपासून स्टार्क भारतात आहे. त्याने नुकतीच भारताविरुद्ध कसोटी आणि वनडे मालिका खेळली आहे. ऑस्ट्रेलिया पुरुष संघाचा भारत दौरा बुधवारी संपला. पण यानंतरही अन्य खेळाडू मायदेशी परतले असताना स्टार्क हेलीला डब्ल्यूपीएलमध्ये पाठिंबा देण्यासाठी भारतातच थांबला.
त्याने तिच्याबरोबर तिचा वाढदिवसही साजरा केला. ज्यावेळी युपीच्या अन्य खेळाडूंनी हेलीने केक कापल्यानंतर तो केक तिच्या चेहऱ्याला लावला, तेव्हा स्टार्कही तिच्या चेहऱ्यावर केक लावताना दिसला. तिच्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनचा व्हिडिओ युपी वॉरियर्सच्या सोशल मीडिया अकाउंटवरही शेअर करण्यात आला आहे.
हेली आणि स्टार्क हे क्रिकेटमधील लोकप्रिय जोडपं आहे. त्यांनी 2016 साली लग्न केले आहे. ते नेहमीच एकमेकांना पाठिंबा देण्यासाठी एकमेकांच्या महत्त्वाच्या सामन्यांसाठी मैदानात उपस्थित असतात. या दोघांनीही ऑस्ट्रेलियासाठी मिळून 9 वर्ल्डकप जिंकले आहेत. त्यांचे कपल गोल्स देणारं जोडपं म्हणूनही क्रिकेट चाहत्यांकडून कौतुक होत असते.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.