Reasons behind CSK successful comeback in IPL 2023: इंडियन प्रीमियर लीग 2023 स्पर्धेत मंगळवारी चेन्नई सुपर किंग्सने गुजरात टायटन्सचा पहिल्या क्वालिफायर सामन्यात 15 धावांनी पराभव केला. एमए चिदंबरम स्टेडियमवर झालेल्या या सामन्यातील विजयासह चेन्नईने अंतिम सामन्यात प्रवेश केला.
एमएस धोनीच्या नेतृत्वातील चेन्नई सुपर किंग्स 28 मे रोजी तब्बल 10व्यांदा अंतिम सामना खेळताना दिसणार आहे. विशेष म्हणजे गेल्या हंगामात चेन्नई सुपर किंग्स गुणतालिकेत 9 व्या क्रमांकावर राहिले होते. पण गेल्यावर्षीच्या अपयशानंतर चेन्नई सुपर किंग्सने यंदा दणक्यात पुनरागमन केलेच, पण अंतिम सामना गाठणारा पहिला संघही ठरला.
पण यंदा चेन्नईसाठी कोणत्या गोष्टी महत्त्वाच्या ठरल्या, यावरही एक नजर टाकू.
चेन्नईची यावेळी सर्वात मोठी ताकद त्यांचे सलामी जोडी ठरली. चेन्नईने विजय मिळवलेल्या जवळपास प्रत्येक सामन्यात ऋतुराज गायकवाड आणि डेव्हॉन कॉनवे या सलामीवीरांनी चांगली सुरुवात दिली. ज्यामुळे मधल्या आणि तळातील फलंदाजी फळीला मोठे फटके खेळण्याचे स्वातंत्र्य मिळाले.
ऋतुराज आणि कॉनवेने यंदाच्या हंगामात भागीदारीत 750 पेक्षा अधिक धावा केल्या आहेत. तसेच कॉनवेने आत्तापर्यंत 14 डावात 6 अर्धशतकांसह 625 धावा केल्या आहेत. तसेच ऋतुराजने 14 डावात 4 अर्धशतकांसह 564 धावा केल्या आहेत.
सलामीवीरांनी चांगली सुरुवात दिल्यानंतर चेन्नईची मधली फळीत अजिंक्य रहाणे आणि शिवम दुबे यांचे योगदान महत्त्वाचे ठरले. दुबे मधल्या षटकांमध्ये फिरकी गोलंदाजांविरुद्ध आक्रमक पवित्रा स्विकारताना दिसला, तर अजिंक्य राहणेने वेगवान गोलंदाजांविरुद्ध चांगले फटके खेळताना दिसला.
रहाणेने गेल्या काही सामन्यांमध्ये मोठी खेळी केली नसली, तरी त्याने सुरुवातीच्या सामन्यांमध्ये केलेली कामगिरी चेन्नईला लय मिळवून देण्यास महत्त्वाची ठरली. तसेच दुबेने सातत्याने मधल्या फळीत आक्रमक फलंदाजी करत योगदान दिल्याने चेन्नईला अनेकदा मोठ्या धावसंख्या उभारता आल्या. दुबेने 13 डावात 158 च्या स्ट्राईक रेटने 3 अर्धशतकांसह 386 धावा केल्या.
चेन्नईसाठी महिश तिक्षणा आणि मथिशा पाथिराना ही श्रीलंकेची जोडीही महत्त्वाची ठरली आहे. तिक्षणाची फिरकी गोलंदाजी आणि वेगवान गोलंदाज पाथिरानाने अखेरच्या षटकांमध्ये केलेल्या गोलंदाजी चेन्नईसाठी महत्त्वाची ठरली आहे.
पाथिराना चेन्नईसाठी अखेरच्या षटकांसाठी यंदा हुकमी एक्का ठरला आहे. त्याची काहीशी मलिंगा सारखी असलेली गोलंदाजी शैली खेळण्यास फलंदाजांना संघर्ष करावा लागत आहे. त्याचाच फायदा चेन्नईला झाला आहे.
चेन्नईला सुरुवातीलाच बेन स्टोक्स, सिसांडा मगला, दीपक चाहर यांच्या दुखापतींमुळे फटका बसला होता. पण त्याचमुळे संघात संधी मिळाल्यानंतर आकाश सिंग, राजवर्धन हंगारगेकर अशा खेळाडूंना संधी मिळाली. त्यांनीही या संधीचा फायदा घेत संघासाठी चांगली कामगिरी केली होती.
आकाशने 6 सामन्यांमध्ये 5 विकेट्स घेतल्या. तसेच हंगारगेकरला 2 सामन्यात संधी मिळाली, ज्यात त्याला ३ विकेट्स घेता आल्या. याशिवाय तुषार देशपांडेलाही यावेळी चेन्नईने सातत्याने संधी दिली. तो देखील पाथिरानासह अखेरच्या षटकांमध्ये महत्त्वपूर्ण गोलंदाज ठरला.
दीपक चाहरने दुखापतीनंतर पुनरागमन चांगले केले. त्याने सुरुवातीच्या षटकांमध्ये जबाबदारी सांभाळल्यानंतर तुषार आणि पाथिराना अखेरच्या षटकांमध्ये वर्चस्व गाजवताना दिसले.
चेन्नईने 8 सामने एमए चिदंबरम स्टेडियमवर खेळले आहेत. या सामन्यांमध्ये फिरकी गोलंदाजांची कामगिरी महत्त्वाची ठरली. तसेच चेन्नईसाठी फिरकी गोलंदाजीसाठी सर्वोत्तम पर्याय असेलला अष्टपैलू खेळाडू रविंद्र जडेजाची कामगिरी महत्त्वाची ठरली.
त्याने मोठी खेळी केली नाही. पण छोटेखानी खेळी करत महत्त्वाची भूमिका बजावली. त्याचबरोबर त्याची गोलंदाजी या हंगामात सर्वात महत्त्वाची ठरली. त्याला मोईन अलीचीही साथ मिळाली. जडेजाने 15 सामन्यांमध्ये 137.80 च्या स्ट्राईक रेटने 175 धावा केल्या आहेत. तसेच 19 विकेट्सही घेतल्या आहेत.
खेळाडूंच्या कामगिरीबरोबरच धोनीच्या चालाख नेतृत्वाचाही चेन्नईच्या यशात मोठा वाटा आहे. त्यान क्वालिफायरच्या सामन्यानंतरच म्हटले होते की तो कदाचीत त्रासदायक कर्णधार असेल, कारण तो सातत्याने क्षेत्ररक्षणात बदल करत असतो. मात्र, हेच बदल चेन्नईला अनेकदा फायदेशीर ठरल्याचे दिसून आले आहे.
क्षेत्ररक्षणात अचानक बदल करत रचलेल्या सापळ्यांमध्ये फलंदाज अडकलेले दिसले. क्वालिफायर सामन्यातही हार्दिक पंड्या आणि राशीद खान यांच्या फलंदाजीवेळी धोनीने क्षेत्ररक्षण करताना केलेले बदल त्यांच्या विकेट्स मिळण्यासाठी महत्त्वाचे ठरले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.