भारतीय क्रिकेट संघाचा भरवशाचा फलंदाज केएल राहुल सध्या त्याच्या निवृत्तीच्या चर्चांमुळे चर्चेत आला आहे. गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर राहुल क्रिकेटला रामराम ठोकणार असल्याच्या अफवांना उधाण आले होते. मात्र, आता स्वतः केएल राहुलने या सर्व चर्चांवर मौन सोडले असून, निवृत्तीबाबत त्याच्या मनात नक्की काय विचार सुरू आहेत, याचे सत्य समोर आणले आहे. इंग्लंडचा माजी कर्णधार केविन पीटरसनशी संवाद साधताना त्याने आपल्या भविष्यातील योजना स्पष्ट केल्या आहेत.
या मुलाखतीदरम्यान केएल राहुलने एक खळबळजनक कबुली दिली. तो म्हणाला की, काही काळापूर्वी त्याच्या मनात संन्यास घेण्याचा विचार नक्कीच आला होता. मात्र, थोडा विचार केल्यानंतर आपल्याला जाणवले की, अजून आपल्यातील क्रिकेट संपलेले नाही. "मला वाटते की माझ्या निवृत्तीसाठी अजून काही वेळ बाकी आहे, त्यामुळे मी सध्या खेळत राहीन," असे सांगत त्याने तूर्तास निवृत्तीच्या चर्चांना पूर्णविराम दिला आहे. राहुलच्या मते, क्रिकेट व्यतिरिक्त जगात इतरही अनेक गोष्टी आहेत, त्यामुळे निवृत्तीचा निर्णय घेताना त्याला फार अडचण येणार नाही.
१९९२ मध्ये जन्मलेला केएल राहुल आता ३३ वर्षांचा झाला आहे. भारतासाठी त्याने ६७ कसोटी सामन्यांत ४,००० पेक्षा जास्त धावा केल्या आहेत, ज्यामध्ये ११ शतकांचा समावेश आहे. एकदिवसीय क्रिकेटमध्येही त्याने ९४ सामन्यांत ८ शतकांसह ३,३६० धावा केल्या आहेत.
सध्या तो कसोटीत सलामीवीराची, तर वनडेमध्ये यष्टीरक्षक-फलंदाज आणि फिनिशरची महत्त्वाची भूमिका पार पाडत आहे. मात्र, टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून तो २०२२ पासून दूर आहे.
राहुल शेवटचा टी-२० सामना २०२२ मध्ये खेळला होता. त्यानंतर तो या फॉरमॅटमध्ये भारतीय संघात स्थान मिळवू शकला नाही. आयपीएलमध्ये मात्र तो सक्रिय असून, सध्या दिल्ली कॅपिटल्सच्या ताफ्यात अक्षर पटेलच्या नेतृत्वाखाली खेळत आहे.
पूर्वी पंजाब किंग्स आणि लखनौ सुपर जायंट्सचे नेतृत्व केल्यानंतर, आता तो संघाच्या गरजेनुसार वेगवेगळ्या क्रमांकावर फलंदाजी करत आपली उपयुक्तता सिद्ध करत आहे. योग्य वेळ आल्यावर निवृत्तीचा निर्णय घेणार असल्याचे सांगून राहुलने चाहत्यांना सध्या धीर दिला आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.