भारताचा माजी क्रिकेटपटू आणि खासदार गौतम गंभीरने शनिवारी केलेल्या पोस्टने सर्वांनाच चकीत केले आहे. गंभीरने त्याला राजकीय कर्तव्यातून मुक्त करण्यात यावे अशी विनंती भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष जेपी नड्डा यांच्याकडे केली असल्याचे पोस्टमधून सांगितले आहे.
गौतम गंभीरने खेळाडू म्हणून क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर 2019 च्या लोकसभा निवडणूकीपूर्वी राजकारणात प्रवेश केला होता. त्यानंतर तो 2019 साली पूर्व दिल्लीतून भारतीय जनता पक्षाकडून लोकसभा निवडणूकही लढला आणि जिंकलाही.
मात्र आता 2024 लोकसभा निवडणूक तोंडावर असतानाच तो त्याच्या राजकीय कामकाजातून मुक्त झाला आहे. दरम्यान, त्याच्या या पोस्टमुळे अशी चर्चा सुरू झाली आहे की तो आगामी लोकसभा निवडणूक लढणार नाही.
गौतम गंभीरने पोस्टमध्ये लिहिले आहे की 'मी भाजपचे अध्यक्ष जेपी नड्डा यांना विनंती केली आहे की मला माझ्या राजकीय कर्तव्यातून मुक्त केले जावे, जेणेकरून मी क्रिकेटमधील माझ्या आगामी वचनबद्धतेवर लक्ष देऊ शकेल. मी पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आणि अमित शाहजी यांचे आभार मानतो की त्यांनी मला लोकांची सेवा करण्याची संधी दिली. जय हिंद.'
दरम्यान, त्याच्या या पोस्टमधून हे स्पष्ट झालेले नाही की त्याने राजकारण क्षेत्र सोडले आहे की यापूढेही त्याच्या क्रिकेटमधील कमिटमेंट पूर्ण झाल्यानंतर राजकारणात सक्रीय होणार आहे.
गंभीरने भारताकडून अनेकवर्षे क्रिकेट खेळले आहे. 2007 टी20 वर्ल्डकप आणि 2011 वनडे वर्ल्डकप भारतीय संघाला जिंकून देण्यातही त्याने मोलाचा वाटा उचलला आहे. त्याने भारताकडून 200 हून अधिक आंतरराष्ट्रीय सामने खेळताना 10 हजारांपेक्षा अधिक धावा केल्या आहेत.
तसेच तो इंडियन प्रीमियर लीगशीही पहिल्या हंगामापासून जोडलेला आहे. तो आयपीएलमध्ये खेळाडू म्हणून निवृत्तीनंतर मार्गदर्शकाच्या भूमिकेतही दिसला आहे. तो आगामी आयपीएल 2024 स्पर्धेत कोलकाता नाईट रायडर्स संघाचा मार्गदर्शक म्हणून जबाबदारी सांभाळणार आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.