India vs Australia | World Cup Final Dainik Gomantak
क्रीडा

World Cup 2023: भारत-ऑस्ट्रेलियाला फायनलपर्यंत पोहचवणारे 'हे' आहेत प्रमुख 10 शिलेदार

India vs Australia Final: भारत आणि ऑस्ट्रेलियाला वर्ल्डकप 2023 स्पर्धेच्या अंतिम सामन्यापर्यंत पोहचवण्यात महत्त्वाची भूमिका निभावणाऱ्या खेळाडूंचा घेतलेला आढावा.

Pranali Kodre

Key Players for India and Australia in ICC ODI Cricket World Cup 2023:

भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोन संघांमध्ये वनडे वर्ल्डकप २०२३ स्पर्धेच्या अंतिम सामन्याचा थरार रंगणार आहे. हा सामना अहमदाबादमधील नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियमवर रंगणार आहे. या दोन्ही संघांची या स्पर्धेतील कामगिरी दमदार झाली आहे.

भारतीय संघ या स्पर्धेत अपराजित राहिला आहे. भारताने साखळी फेरीतील सर्व 9 सामने आणि उपांत्य सामना असे मिळून 10 सामने सलग जिंकले आहेत; तर ऑस्ट्रेलियाने साखळी फेरीतील पहिले दोन सामने गमावल्यानंतर पुढील सर्व 7 सामने आणि उपांत्य सामना असे मिळून सलग 8 सामने जिंकले आहेत. आता तुफान फॉर्ममध्ये असणारे हे दोन संघ अंतिम सामन्यात आमने-सामने असणार आहेत.

दरम्यान, या दोन्ही संघांना अंतिम सामन्यापर्यंत पोहचवण्यात काही खेळाडूंची कामगिरी प्रचंड महत्त्वाची ठरली. अशाच दोन्ही संघातील महत्त्वाच्या शिलेदारांचा आढावा घेऊ.

भारतीय संघ

1. रोहित शर्मा

भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माने प्रत्येक सामन्यात ज्याप्रकारे आक्रमक सुरुवात करून दिली ती संघाला फायदेशीर ठरली. त्याने दिलेल्या सुरुवातीमुळे अन्य फलंदाजांना भारताला मोठी धावसंख्या उभारून देण्यात मदत मिळाली. रोहितने 10 सामन्यांत 55 च्या सरासरीने 550 धावा केल्या.

इतकेच नाही, तर रोहितने खेळपट्टीचाही योग्य अंदाज यंदा बांधलेले दिसले, त्यामुळे त्याला मैदानात निर्णय घेण्यात मदत झाली. त्याने गोलंदाजांचाही या स्पर्धेत चांगला वापर करून घेतला.

2. विराट कोहली

भारतीय संघासाठी यंदा फलंदाजीतील सर्वात सकारात्मक बाब स्टार फलंदाज विराट कोहलीची कामगिरी राहिली. विराटने अँकर फलंदाजाची भूमिका साकारताना 3 शतके आणि 5 अर्धशतके ठोकली.

त्याने मधल्या फळीत भारताचा डाव सांभाळल्याने त्याच्या आजूबाजूला खेळणाऱ्या फलंदाजांना आक्रमक खेळण्याची मुभा मिळाली. विराट हा वर्ल्डकपमध्ये सर्वाधिक धावा करणारा फलंदाजही ठरला. त्याने 10 सामन्यात 101.57 च्या सरासरीने 711 धावा केल्या.

3. रविंद्र जडेजा

रविंद्र जडेजा या फारसा प्रकाशझोतात आला नसला, तरी त्याची कामगिरीही या वर्ल्डकपमध्ये महत्त्वाची ठरली. त्याच्या संघात असल्याने फलंदाजीला खोली मिळाली, तसेच फिरकी गोलंदाजीतही तो एक चांगला पर्याय ठरला.

कोलकातामधील दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात त्याचे संघातील महत्त्व प्रकर्षाने भारताला जाणवले. त्याने अखेरच्या षटकात चांगली फटकेबाजी केली, तसेच गोलंदाजीत 5 विकेट्ही घेतल्या. हार्दिक पंड्या दुखापतीमुळे संघातून बाहेर गेल्याने एक अष्टपैलू म्हणून तो संघातील महत्त्वाचा खेळाडू ठरला. इतकेच नाही, तर क्षेत्ररक्षणातही त्याचे योगदान महत्त्वाचे होते.

4. मोहम्मद शमी

भारतीय संघाने खेळलेल्या गेल्या 6 सामन्यांतील 4 सामन्यात सामनावीराचा पुरस्कार जिंकला आहे. यावरून त्याने केलेल्या कामगिरीचे महत्त्व लक्षात येते. त्याला पहिल्या 4 सामन्यात संधी मिळाली नव्हती, पण नंतर त्याला संधी मिळालेल्या ६ सामन्यात त्याने कमालीची गोलंदाजी केली. 6 सामन्यातील तीन सामन्यात त्याने 5 पेक्षा जास्त विकेट्स घेतल्या आहेत. त्याने 6 सामन्यांत 23 विकेट्स घेतल्या आहेत.

5. जसप्रीत बुमराह

जसप्रीत बुमराहने 10 सामन्यांत 18 विकेट्स या स्पर्धेत घेतल्या आहेत. त्याने या स्पर्धेत इकोनॉमिकल गोलंदाजी केली. त्यामुळे संघातील त्याच्या साथीदार गोलंदाजांना विकेट घेण्यात मदत झाली. त्याने सुरुवातीला अनेक सामन्यात विकेट घेत गोलंदाजीत भारताला चांगली सुरुवात करून दिली, ज्याचा फायदा भारतीय गोलंदाजांना मिळाला. त्याची इकोनॉमी 3.98 इतकी राहिली आहे.

ऑस्ट्रेलिया संघ

1. डेव्हिड वॉर्नर

वर्ल्डकपच्या आधी फारशा चांगल्या फॉर्ममध्ये वॉर्नर नव्हता, मात्र संघव्यवस्थापनाने त्याच्या अनुभवावर दाखवलेला विश्वास त्याने सार्थ ठरवला.

ऑस्ट्रेलियासाठी सलामीला खेळताना त्याने कधी मिचेल मार्श आणि ट्रेविड हेडसह संघाचा चांगली सुरुवात करून दिली. तो ऑस्ट्रेलियाकडून यंदाच्या स्पर्धेत सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला. त्याने 2 शतकांसह 52.80 च्या सरासरीने 528 धावा केल्या आहेत.

2. मिचेल मार्श

अष्टपैलू क्रिकेटपटू मिचेल मार्श हा ऑस्ट्रेलियन संघासाठी या स्पर्धेतील प्रमुख खेळाडूंपैकी एक ठरला आहे. त्याने त्याच्या कामगिरीतील सातत्य नसले, तरी त्याने वेळोवेळी आणि मोक्याच्या क्षणी केलेली कामगिरी महत्त्वाची ठरली. त्याने 2 शतके केली असून 107.85 च्या सरासरीने 9 सामन्यात 426 धावा केल्या आहेत. तसेच 2 विकेट्स घेतल्या.

3. ग्लेन मॅक्सवेल

ऑस्ट्रेलियासाठी मधल्या फळीत ग्लेन मॅक्सवेल असणे महत्त्वाचे ठरले आहे. त्याची फटकेबाजी कधीही कोणत्याही संघाविरुद्ध धोकादायक ठरू शकते.

मुंबईला अफगाणिस्तानविरुद्ध त्याने पायात क्रॅम्प्स आलेले असतानाही केलेली 201 धावांची खेळी या स्पर्धेतील सर्वोत्तम क्षणांपैकी एक ठरली. त्याच्या फलंदाजीबरोबरच फिरकी गोलंदाज म्हणूनही तो संघासाठी एक चांगला पर्याय ठरतो. त्याने या स्पर्धेत 5 विकेट्सही घेतल्या आहेत.

4. ऍडम झम्पा

ऑस्ट्रेलियाच्या फिरकी गोलंदाजीत झम्पा महत्त्वाचे अस्त्र ठरले आहे. त्याने सातत्याने 3-4 अशा विकेट्स घेतल्या आहेत. त्याचबरोबर भारतीय खेळपट्ट्या त्याच्या गोलंदाजीला अनुकूलही ठरत आहेत. यंदाच्या वर्ल्डकपमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजांमध्ये शमीच्या पाठोपाठ झम्पा आहे. त्याने 10 सामन्यांत 22 विकेट्स घेतल्या आहेत.

5. जोश हेजलवूड

हेजलवूडची मिचेल स्टार्कबरोबर सुरुवातीला गोलंदाजी ऑस्ट्रेलियासाठी फायदेशीर ठरली आहे. आयपीएलमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी खेळण्याचा हेजलवूडला फायदा झाला आहे. तो ऑस्ट्रेलियासाठी सर्वाधिक विकेट्स घेणारा झम्पानंतर दुसऱ्या क्रमांकाचा गोलंदाज ठरला आहे. त्याने 10 सामन्यांत 14 विकेट्स घेतल्या आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Royal Enfield Bike: रॉयल एनफील्ड 'मीटिओर 350' नव्या अवतारात बाजारात दाखल, जाणून किंमत, फीचर्स आणि डिझाइनमधील मोठे बदल

Asia Cup 2025: टी-20 क्रिकेटमध्ये यूएईच्या मोहम्मद वसीमचा वर्ल्ड रेकॉर्ड! बटलरला मागे टाकत रचला नवा इतिहास VIDEO

Viral Video: लग्नासाठी घरचे तयार नाही झाले तर काय कराल? पठ्ठ्यांनी दिलेल्या उत्तराचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल; नेटकरी म्हणाले...

Ajit Pawar: अजित पवारांच्या वक्तव्यावरुन गोव्यात रंगलं राजकारण; भाजप प्रदेशाध्यक्षांनी पवारांचं अज्ञानच काढलं

India vs Pakistan: ये तो ट्रेलर था, पिक्चर अभी बाकी है... Asia Cup मध्ये भारत-पाकिस्तान आणखी दोनवेळा भिडणार, संपूर्ण 'गणित' समजून घ्या

SCROLL FOR NEXT