कर्नाटक क्रिकेटला रविवारी एक मोठा धक्का बसला. बंगळुरू येथे सैफायर क्रिकेट क्लबकडून 'थर्ड डिव्हिजन' सामना खेळताना एस. एल. अक्षयला अचानक छातीत त्रास होऊ लागला. सामन्यात आपल्या कोट्यातील ४ षटके गोलंदाजी केल्यानंतर त्याला कमालीचे अस्वस्थ वाटू लागले. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून त्याला तातडीने मैदानाबाहेर नेण्यात आले आणि जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, दुर्दैवाने डॉक्टरांनी त्याला तपासून मृत घोषित केले.
एस. एल. अक्षय हा कर्नाटकच्या त्या सुवर्णकाळातील संघाचा भाग होता, ज्या संघाने २०१४-१५ च्या हंगामात प्रतिष्ठेची 'रणजी ट्रॉफी' जिंकली होती. २०११ ते २०१३ या काळात त्याने कर्नाटकसाठी ६ प्रथम श्रेणी सामने, ३ लिस्ट-ए आणि ९ टी-२० सामने खेळले होते. आपल्या कारकिर्दीतील अखेरचा प्रथम श्रेणी सामना तो भारतीय संघाचे स्टार खेळाडू केएल राहुल आणि मनीष पांडे यांच्यासोबत खेळला होता.
खेळाडू म्हणून मैदानापासून दूर झाल्यानंतरही अक्षयचे क्रिकेटवरील प्रेम तसूभरही कमी झाले नव्हते. तो कनिष्ठ पातळीवर युवा खेळाडूंना कोचिंग देत होता. कर्नाटकच्या १९ वर्षांखालील (Under-19) संघासोबत तो प्रशिक्षक म्हणून काम पाहत होता. अनेक नवोदित खेळाडूंचे करिअर घडवण्यात आणि त्यांना योग्य दिशा देण्यात त्याने मोलाचे योगदान दिले होते.
अक्षयच्या या अकस्मात जाण्याने कर्नाटक राज्य क्रिकेट असोसिएशनने (KSCA) तीव्र दुःख व्यक्त केले आहे. केएससीएने जारी केलेल्या अधिकृत पत्रकात म्हटले आहे की, "अक्षयने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये कर्नाटकचे अत्यंत शानदार प्रतिनिधित्व केले. क्रिकेटमधून निवृत्त झाल्यानंतरही त्याने संपूर्ण समर्पण आणि आवडीने या खेळाची सेवा सुरू ठेवली होती. त्याचे जाणे हे केवळ त्याच्या कुटुंबाचेच नव्हे, तर संपूर्ण कर्नाटक क्रिकेट परिवाराचे मोठे नुकसान आहे."
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.