India vs Sri Lanka: भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह श्रीलंकेविरुद्धच्या आगामी वनडे मालिकेतून पुनरागमन करेल, असे अपेक्षित होते. मात्र, आता त्याचे पुनरागमन लांबले असल्याचे समजत आहे. तो 10 जानेवारीपासून सुरू होणाऱ्या भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यातील 3 सामन्यांच्या वनडे मालिकेतून बाहेर गेला आहे.
(Jasprit Bumrah ruled out of India vs Sri Lanka ODI Series)
श्रीलंकेविरुद्ध वनडे मालिकेतून तो बाहेर होण्यामागे तंदुरुस्तीचे कारण असल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान या वनडे मालिकेसाठी ज्यावेळी संघाची निवड झाली होती, त्यावेळी बुमराहचा समावेश नव्हता. पण काही दिवसांनी बंगळुरूमधील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीने (एनसीए) त्याला तंदुरुस्त जाहीर केल्यानंतर त्याचा भारतीय संघात समावेश करण्यात आला होता.
मात्र पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार बुमराह आता या मालिकेतून तंदुरुस्तीच्या कारणाने बाहेर गेला आहे. त्यामुळे आता त्याचे पुनरागमन पुन्हा लांबले आहे. बुमराह पाठीच्या दुखापतीमुळे सप्टेंबर 2022 पासून भारतीय संघातून बाहेर आहे. त्याला गेल्यावर्षी ऑस्ट्रेलियामध्ये झालेल्या टी२० वर्ल्डकपमध्येही या दुखापतीमुळे खेळता आले नव्हते.
आता तो भारतीय संघात पुन्हा कधी पुनरागमन करणार याची प्रतिक्षा चाहत्यांना आहे.
भारत आणि श्रीलंका यांच्यात पहिला वनडे 10 जानेवारीला गुवाहाटीला होणार आहे. त्यानंतर 12 जानेवारीला कोलकाता येथे आणि 15 जानेवारीला तिरुअनंतपुरम येथे अनुक्रमे दुसरा आणि तिसरा वनडे सामना होणार आहे.
या वनडे मालिकेपूर्वी भारत आणि श्रीलंका यांच्यात टी20 मालिका झाली. या मालिकेत भारताने 2-1 अशा फरकाने विजय मिळवला आहे. या टी20 मालिकेत रोहित शर्मा, विराट कोहली, केएल राहुल, श्रेयस अय्यर यांसारख्या खेळाडूंना विश्रांती दिली होती. आता हे खेळाडू आगामी वनडे मालिकेतून भारतीय संघात पुनरागमन करणार आहेत.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.