Mohammad Amir IPL 2027 Dainik Gomantak
क्रीडा

IPL 2027: पाकिस्तानचा क्रिकेटपटू IPL मध्ये खेळणार? अखेर स्वतःच केला मोठा खुलासा, सर्व चर्चांना दिला पूर्णविराम

Mohammad Amir IPL 2027: पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज मोहम्मद आमिर पुन्हा एकदा क्रिकेटविश्वात चर्चेत आला आहे.

Sameer Amunekar

पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज मोहम्मद आमिर पुन्हा एकदा क्रिकेटविश्वात चर्चेत आला आहे. अफगाणिस्तान प्रीमियर लीगच्या (APL) ड्राफ्टसाठी त्याने आपले नाव नोंदवल्यानंतर आगामी आयपीएलमध्येही तो खेळताना दिसणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या होत्या. विशेष म्हणजे, आमिरने अफगाणिस्तान प्रीमियर लीगसाठी पाकिस्तानी नव्हे, तर ब्रिटनचा रहिवासी म्हणून नोंदणी केली आहे. त्यामुळे आयपीएल 2027 च्या मिनी लिलावात तो सहभागी होऊ शकतो, अशी शक्यता वर्तवली जात होती. मात्र, आता स्वतः मोहम्मद आमिरने सोशल मीडियावर पोस्ट करत या चर्चांना पूर्णविराम दिला आहे. आयपीएलच्या आगामी हंगामासाठी लिलावात नाव नोंदवण्याचा आपला कोणताही विचार नसल्याचे त्याने स्पष्ट केले आहे.

मोहम्मद आमिरने सोशल मीडियावर केला खुलासा

34 वर्षीय मोहम्मद आमिरला मे 2026 मध्ये ब्रिटनचे नागरिकत्व मिळाल्याची माहिती समोर आली होती. त्यानंतर त्याने इंग्लंडमध्ये स्थानिक खेळाडू म्हणून देशांतर्गत क्रिकेटमध्ये सहभाग घेतला. टी-20 ब्लास्ट आणि द हंड्रेड यांसारख्या स्पर्धांमध्येही त्याने आपली कामगिरी दाखवली आहे.

दरम्यान, अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाने अफगाणिस्तान प्रीमियर लीग सुरू करण्याच्या दृष्टीने खेळाडूंची नोंदणी प्रक्रिया राबवली. या स्पर्धेसाठी आमिरनेही आपले नाव दिले. मात्र, त्याची नोंदणी ब्रिटनचा खेळाडू म्हणून झाल्याच्या चर्चेमुळे आयपीएलमधील त्याच्या सहभागाबाबत तर्कवितर्क सुरू झाले.

या पार्श्वभूमीवर आमिरने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'एक्स'वर पोस्ट केली. त्यात त्याने आयपीएलशी संबंधित बातमी चुकीची असल्याचे स्पष्ट केले. आयपीएलच्या लिलावात सहभागी होणार असल्याच्या वृत्तात तथ्य नसल्याचे त्याने सांगितले. त्यामुळे आगामी आयपीएलमध्ये आमिर खेळणार असल्याच्या चर्चांना आता पूर्णविराम मिळाला आहे.

पाकिस्तानकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये केली प्रभावी कामगिरी

मोहम्मद आमिर हा पाकिस्तानच्या प्रमुख वेगवान गोलंदाजांपैकी एक राहिला आहे. आपल्या स्विंग गोलंदाजीच्या जोरावर त्याने अनेक दिग्गज फलंदाजांना अडचणीत आणले. पाकिस्तानकडून खेळताना त्याने तिन्ही प्रकारच्या क्रिकेटमध्ये उल्लेखनीय कामगिरी केली.

त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीवर नजर टाकल्यास, त्याने 61 वनडे सामन्यांमध्ये 81 विकेट्स घेतल्या आहेत. टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 62 सामने खेळताना त्याच्या नावावर 71 विकेट्स आहेत. तर कसोटी क्रिकेटमध्ये 36 सामन्यांत त्याने 119 फलंदाजांना माघारी धाडले.

2020 मध्ये आमिरने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली होती. मात्र, त्यानंतर त्याने पाकिस्तान संघात पुनरागमन केले. 2024 मध्ये त्याने पुन्हा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेत आपल्या कारकिर्दीचा शेवट केला.

इंग्लंडमध्ये नव्या क्रिकेट कारकिर्दीला सुरुवात

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर आमिरने इंग्लंडमध्ये क्रिकेटची नवी वाट निवडली. जून 2026 मध्ये त्याने नॉटिंगहॅमशायर संघाकडून टी-20 ब्लास्ट स्पर्धेत स्थानिक खेळाडू म्हणून सहभाग घेतला. त्यानंतर द हंड्रेड स्पर्धेत ट्रेंट रॉकेट्स संघाकडूनही तो खेळला.

आता अफगाणिस्तान प्रीमियर लीगमध्ये सहभागी होण्यासाठी त्याने नाव नोंदवले आहे. या स्पर्धेसाठी त्याने ब्रिटनशी संबंधित खेळाडू म्हणून नोंदणी केल्यामुळे त्याच्या पुढील क्रिकेट कारकिर्दीबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे. पाकिस्तान क्रिकेटमधील आपला अध्याय संपल्याचेही त्याने यापूर्वी स्पष्ट केले आहे.

पाकिस्तानी खेळाडूंच्या आयपीएल सहभागाबाबत काय नियम?

आयपीएलमध्ये पाकिस्तानी खेळाडूंच्या सहभागावर बंदी असल्याने पाकिस्तानच्या क्रिकेटपटूंना या स्पर्धेत खेळता येत नाही. मात्र, ब्रिटनचे नागरिकत्व मिळाल्यानंतर आमिरच्या आयपीएलमधील संभाव्य सहभागाबाबत चर्चा सुरू झाली होती. त्याने लिलावासाठी नाव नोंदवले असते, तर त्याच्या पात्रतेबाबत वेगळी चर्चा होऊ शकली असती.

यापूर्वी पाकिस्तानचे माजी क्रिकेटपटू अझहर महमूद यांनीही ब्रिटनचा खेळाडू म्हणून आयपीएलमध्ये सहभाग घेतला होता. ते 2012 आणि 2015 च्या आयपीएल हंगामात खेळले होते. त्यामुळे आमिरच्या नावाचीही चर्चा रंगली होती. मात्र, सध्यातरी आयपीएल 2027 च्या मिनी लिलावात सहभागी होण्याचा आमिरचा विचार नसल्याचे त्याच्या पोस्टवरून स्पष्ट झाले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Politics: आरजीतील संघर्ष पेटला! मनोज परब गट निवडणूक लढवणार; 18 मतदारसंघांत गटसमित्यांची पुनर्रचना

Malavya Rajyog 2026: धनत्रयोदशीचा महासंयोग! मालव्य राजयोग ठरवणार 'या' राशींचे भविष्य; बँक बॅलन्समध्ये होणार अफाट वाढ

खरी कुजबुज: 'आरजी'च्या दोन्ही बाजू आमने-सामने

Nepal Helicopter Crash: नेपाळमध्ये मोठी दुर्घटना! लँडिंगदरम्यान दोन हेलिकॉप्टरची जोरदार धडक; एकाचा मृत्यू, थरारक VIDEO समोर

Delhi Green Diwali: दिल्लीत हरित दिवाळी! सर्वोच्च न्यायालयाकडून फटाके फोडण्यास ठराविक वेळेत परवानगी; कडक निर्बंध जारी

SCROLL FOR NEXT