IPL Viewership: बुधवारी इंडियन प्रीमियर लीग 2023 स्पर्धेत 17 वा सामना चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स संघात पार पडला. एमए चिदंबरम स्टेडियमवर पार पडलेल्या या सामन्यात राजस्थानने अखेरच्या चेंडूवर 3 धावांनी विजय मिळवला. या सामन्यादरम्यान ऑनलाईन व्ह्युवरशीपबाबत मोठा विक्रम झाला आहे.
या सामन्यात जेव्हा सीएसकेकडून एमएस धोनी फलंदाजीला आला होता, तेव्हा जिओ सिनेमावर तब्बल 2.2 कोटींपेक्षा जास्त युजर्स सामना पाहात असल्याचे दिसले. त्यामुळे हा चालू आयपीएल हंगामातील जिओ सिनेमावरील व्ह्युवरशीपबाबात विक्रम आहे. यापूर्वी व्ह्युवर्सचा 2 कोटींचा आकडा ओलांडला गेला नव्हता.
यापूर्वी रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर विरुद्ध लखनऊ सुपर जायंट्स संघादरम्यान झालेल्या सामन्यादरम्यान 1.8 कोटी व्ह्युवर्सची संख्या नोंदवली गेली होती.
2.2 कोटी - चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स
1.8 कोटी - रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर विरुद्ध लखनऊ सुपर जायंट्स
1.7 कोटी - मुंबई इंडियन्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स
1.7 कोटी - चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध लखनऊ सुपर जायंट्स
1.6 कोटी - चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध गुजरात टायटन्स
बुधवारी झालेल्या सामन्यात राजस्थानने दिलेल्या 176 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना सीएसकेला अखेरच्या षटकात 21 धावांची गरज होती. या षटकात संदीप शर्मा गोलंदाजी करत होता. त्याने पहिले दोन चेंडू वाईड टाकले. पण त्यानंतर त्याने निर्धाव चेंडू टाकला. तर दुसऱ्या आणि तिसऱ्या चेंडूवर एमएस धोनीने सलग दोन षटकार मारले.
तसेच चौथ्या चेंडूवर त्याने एक धाव घेतली. अखेरच्या दोन चेंडूवर 6 धावांची गरज असताना रविंद्र जडेजाने एक धाव घेतली. अखेरच्या चेंडूवर स्ट्राईकवर आलेल्या धोनीला मोठा फटका मारला आला नाही. त्यामुळे सीएसकेला विजयाच्या जवळ जाऊनही 3 धावांनी पराभवाचा सामना करावा लागला.
या सामन्यात सीएसकेकडून डेव्हॉन कॉनवेने 50 धावांची खेळी केली, तसेच अजिंक्य रहाणेने 31 धावांची खेळी केली. मात्र, मधली फळी झटपट कोसळली. त्यामुळे अखेरच्या पाच षटकांदरम्यान रविंद्र जडेजा आणि एमएस धोनी फलंदाजी करताना दिसले. त्यांनी 30 चेंडूत नाबाद 59 धावांची भागीदारी केली. पण त्यांना संघाला विजय मिळवून देता आला नाही. राजस्थानकडून आर अश्विन आणि युजवेंद्र चहल यांनी प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या.
दरम्यान, या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना राजस्थान रॉयल्सने 20 षटकात 8 बाद 175 धावा केल्या. राजस्थानकडून सलामीवीर जॉस बटलरने सर्वाधिक 52 धावांची खेळी केली. तसेच देवदत्त पडिक्कल (38), आर अश्विन (30) आणि शिमरॉन हेटमायर (30*) यांनीही छोटेखानी पण महत्त्वपूर्ण खेळी केल्या. सीएसकेकडून आकाश सिंग, तुषार देशपांडे आणि रविंद्र जडेजा यांनी प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.