IPL 2021: पंजाब किंग्सचा (Punjab Kings) कर्णधार केएल राहुलच्या (KL Rahul) 67 धावांच्या जोरावर आयपीएलमध्ये शुक्रवारी कोलकता नाईट रायडर्सचा (Kolkata Knight Riders) पाच गडी राखून पराभव केला आहे. दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर झालेल्या सामन्यात कोलकताने प्रथम फलंदाजी करताना 7 विकेटच्या मोबदल्यात 165 धावा केल्या. पंजाबने हे लक्ष्य 19.3 षटकांत पाच गडी गमावून पूर्ण केले. कोलकत्याचा सलामीवीर व्यंकटेश अय्यरने (Venkatesh Iyer) पुन्हा एकदा आपला क्लास दाखवत 67 धावांची खेळी केली. पण त्याची ही खेळी पंजाबचा कर्णधार केएल राहुलच्या खेळीने फिकी ठरली. कोलकाताच्या या पराभावाचा फायदा दिल्ली कॅपिटल्सला झाला असून प्लेऑफसाठी पात्र होणारा दिल्लीचा (Delhi) दुसरा संघ बनला आहे. तर दुसरीकडे पंजाबनेही त्यांच्या प्लेऑफच्या आशा जिवंत ठेवल्या आहेत.
166 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना पंजाबला डावाच्या तिसऱ्या षटकातच कोलकाताचा कर्णधार इऑन मॉर्गनने मयंकचा झेल सोडला. त्यानंतर मयांकने याचा फायदा घेत कर्णधार केएल राहुल साथीने कोलकाताच्या गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेतला. या जोडीने पहिल्या विकेटसाठी 71 धावांची भागीदारी करत कोलकत्याला सामन्यात बॅकफूटवर आणले. पण नवव्या षटकांत वरुण चक्रवर्तीने मॉर्गनच्या करवी मयांकला झेलबाद केले. मयंकने 27 चेंडूंत तीन चौकार आणि तीन षटकारांच्या मदतीने तुफानी 40 धावा केल्या.
पूरनकडून पुन्हा निराशा
वेस्ट इंडिजच्या निकोलस पूरनकडून पंजाब संघाला खूप आशा होती. परंतु अजूनही त्याची बॅटमधून धावांचा पाऊस पडत नसल्याने त्याचा फटका पंजाब संघाला बसत आहे. मैदानात येताच त्याला एक जिवनदान मिळाले पण त्याचा फायदा तो घेऊ शकला नाही. पंजाब संघाच्या 84 धावा झाल्या असताना शिवम मावीने वरुणच्या चेंडूवर त्याचा झेल टिपला. पूरनने सात चेंडूत एका षटकाराच्या मदतीने 12 धावा केल्या.
राहुलचे अर्धशतक
एका बाजूने विकेट जात असताना दुसऱ्या बाजूला मात्र पंजाबचा कर्णधार केएल राहुल मैदानात तळ ठोकून उभा होता आणि त्याने आपला चमकदार फॉर्म कायम ठेवत हवे तेव्हा मोठे फटके मारत उकृष्ट फलंदाजी करत आपले अर्धशतक पूर्ण केले. दुसऱ्याबाजूने राहुलला साथ मिळत नव्हती, एडिन मार्कराम सेट होताना दिसत होता. पण 16 व्या षटकात सुनील नरेनच्या गोलंदाजीवर मोठा शॉट खेळण्याच्या प्रयत्नात तो गिलच्या हाती झेलबाद झाला. त्याने 16 चेंडूत 18 धावा केल्या. त्याच्या पाठोपाठ दीपक हुडाही तीन धावा काढून बाद झाला.
राहुलनेच टिपला राहुलचा झेल !
पण तरीही केएल राहुल पंजाब संघाला विजयाकडे घेऊन जात होता. त्याने वेगाने धावा काढण्यास सुरुवात केली. शाहरुख खानेही त्याला साथ देत होता. शेवटच्या दोन षटकांत पंजाबला विजयासाठी नऊ धावांची गरज होती, पण 19 व्या षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर राहुलने शिवम मावीला जोरदार शॉट खेळला पण राहुल त्रिपाठीने त्याचा शानदार झेल टिपला. पण पंचांना झेलबद्दल खात्री नव्हती, म्हणून त्यांनी थर्ड अंपायरची मदत घेतली. तिसऱ्या अंपायरने चेंडू जमिनीवर आदळला असल्याने राहुलला नाबाद घोषित केले. अखेरच्या षटकात अय्यरने राहुलला मावीच्या हाती झेल देऊन पंजाबला पुन्हा दबावात आणले. राहुलने आपल्या डावात 55 चेंडूंचा सामना केला आणि चार चौकार आणि दोन षटकार ठोकले. राहुल बाद झाला त्यावेळी पंजाबला चार चेंडूंत चार धावांची गरज होती. पुढील चेंडूवर शाहरुखने षटकार ठोकून पंजाबला विजय मिळवून दिला. शाहरुख नऊ चेंडूत 22 धावा करुन नाबाद राहिला.
अय्यरने पुन्हा एकदा दाखविला आपला क्लास
तत्पूर्वी, कोलकात्याने सलामीवीर व्यंकटेश अय्यरच्या शानदार खेळीच्या जोरावर चांगली धावसंख्या उभारली. अय्यर व्यतिरिक्त राहुल त्रिपाठीनेही चांगले योगदान दिले. अय्यरने 49 चेंडूंचा सामना करत नऊ चौकार आणि एक षटकार मारत 67 धावांची शानदार खेळी केली. त्याचबरोबर राहुलने त्याच्या 26 चेंडूत तीन चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने 34 धावा केल्या. या दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी 72 धावा जोडल्या आणि सुरुवातीच्या धक्क्यातून या दोघांनी कोलकता संघाला बाहेर काढले. या दोघांशिवाय नितीश राणाने 18 चेंडूत दोन चौकार आणि दोन षटकारांच्या मदतीने 31 धावांचे योगदान दिले. केकेआरचे उर्वरित फलंदाज या तिघांनी उभारलेल्या व्यासपीठाचा लाभ घेऊ शकले नाहीत. केकेआरने शेवटच्या पाच षटकांत 44 धावा केल्या आणि चार गडी गमावले. मोहम्मद शमी (23 धावांत 1) आणि अर्शदीप सिंग (32 धावांत 3) गडी बाद कतर शेवटच्या दोन षटकांत त्यांनी केवळ 14 धावा दिल्या. मधल्या षटकांमध्ये लेगस्पिनर रवी बिश्नोई (22 धावांत 2) फलंदाजांना तंबुत धाडले.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.