Hockey World Cup 2023: भारतात होत असलेल्या हॉकी वर्ल्डकप 2023 स्पर्धेत शनिवारी प्लेसमेंट प्लेऑफमध्ये भारतीय संघाचा सामना दक्षिण आफ्रिकेविरुद्ध झाला. राउरकेलामधील बिरसा मुंडा हॉकी स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात भारताने 5-2 अशा गोलफरकाने विजय मिळवला. या विजयासह भारताने 9 वा क्रमांक मिळवत आपल्या वर्ल्डकप मोहिमेचा शेवट केला.
मात्र, यजमान संघासाठी ही पुरुष हॉकी वर्ल्डकपमधील सर्वात खराब कामगिरीही राहिली. भारताने 2010 मधील आपलाच विक्रम मोडला. 2010 साली दिल्लीमध्ये झालेल्या वर्ल्डकपमध्ये भारत 8 व्या क्रमांकावर राहिला होता.
भारतासह अर्जेंटिना 1978 सालच्या वर्ल्डकपमध्ये मायदेशात 8 व्या क्रमांकावर आणि मलेशिया 2002 साली मायदेशात वर्ल्डकपमध्ये 8 व्या क्रमांकावर राहिले होते.
(India's campaign in the Hockey World Cup 2023 ended with 9th position after beating South Africa)
शनिवारी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध झालेल्या सामन्यात भारताने सुरुवातीपासूनच वर्चस्व ठेवले होते. सामन्याच्या चौथ्याच मिनिटाला अभिषेकने भारताचे गोलचे खाते उघडले. त्यानंतर 12 व्या मिनिटाला कर्णधार हरमनप्रीत सिंगने 11 व्या मिनिटाला पेनल्टी कॉर्नरवर भारतासाठी दुसरा गोल नोंदवला.
त्यानंतर मात्र, दुसऱ्या क्वार्टरमध्ये कोणालाही गोल करता आला नाही. तिसऱ्या क्वार्टरमध्येही दोन्ही संघांच्या बचावाने गोल होणार नाही, याची काळजी घेतली होती. मात्र 44 व्या मिनिटाला समशेर सिंगने गोल करत भारताला 3-0 अशा आघाडीवर नेले.
अखेरचे क्वार्टर रोमांचक ठरले. या क्वार्टरमध्ये दोन्ही संघांकडून मिळून 4 गोल झाले. चौथ्या क्वार्टरच्या सुरुवातीलाच 48 व्या मिनिटाला आकाशदीप सिंगने भारताला चौथा गोल करून दिला होता. त्याच मिनिटाला दक्षिण आफ्रिकेच्या सॅमकेलो एमविम्बीने गोल केला आणि दक्षिण आफ्रिकेला गोलचे खाते उघडून दिले.
त्यानंतर सुखजीत सिंगने भारतासाठी पाचवा गोल केला. यानंतर दक्षिण आफ्रिकेला फारशी पुनरागमनाची संधी नव्हती. पण अखेरच्या मिनिटाला त्यांना पेनल्टी स्ट्रोक मिळाला. ज्यावर मुस्ताफा कॅसिएमने गोल केला. त्यामुळे भारतीय संघ हा सामना 5-2 अशा फरकाने जिंकला.
दरम्यान भारताने या सामन्यापूर्वी जपानला 8-0 असे पराभूत केले होते. त्याआधी भारताला क्रॉसओव्हर फेरीत न्यूझीलंडकडून पेनल्टी शुटआऊटमध्ये पराभवाचा सामना करावा लागला होता. त्यामुळे भारताचे वर्ल्डकप जिंकण्याचे स्वप्न भंगले होते.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.