Team India Dainik Gomantak
क्रीडा

INDW vs AUSW: टीम इंडिया पुन्हा हारली! कांगारुची मालिकेत अभेद्य आघाडी; ऋचा अन् दीप्तीचा संघर्ष व्यर्थ

Manish Jadhav

INDW vs AUSW 2nd ODI Mumbai Wankhede: भारत आणि ऑस्ट्रेलिया महिला क्रिकेट संघ यांच्यात 3 सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळवली जात आहे. मालिकेतील दुसऱ्या सामन्यातही ऑस्ट्रेलियाने भारताचा पराभव केला. ऑस्ट्रेलियाने हा सामना अवघ्या 3 धावांनी जिंकला. या विजयासह कांगारु संघाने या मालिकेवरही कब्जा केला.

भारतीय महिला क्रिकेट संघाला 2 वर्षांनंतर एकदिवसीय सामन्यात ऑस्ट्रेलियाला पराभूत करण्याची संधी मिळाली होती, परंतु ऋचा घोष आणि दीप्ती शर्मा यांची मेहनत व्यर्थ गेली. या सामन्यात भारताला पराभवाला सामोरे जावे लागले.

सामन्यात ऑस्ट्रेलियन कर्णधार अॅलिसा हिलीने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. ऑस्ट्रेलियाने 50 षटकांत आठ विकेट गमावत 258 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात टीम इंडियाला 50 षटकांत आठ विकेट्सच्या मोबदल्यात केवळ 255 धावा करता आल्या.

एलिस पेरीने अर्धशतक केले

दरम्यान, पहिल्यांदा फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियन संघाला पहिला धक्का कर्णधार एलिसाच्या रुपाने बसला होता. 24 चेंडूत 13 धावा केल्यानंतर पूजा वस्त्राकरने तिला बोल्ड केले. तर एलिस पेरीला दीप्ती शर्माने श्रेयंका पाटीलच्या हाती झेलबाद केले. पेरी 47 चेंडूंत पाच चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने 50 धावा करुन बाद झाली. बेथ मुनीच्या रुपाने ऑस्ट्रेलियाला तिसरा धक्का बसला. 17 चेंडूत 10 धावा करुन ती बाद झाली. मुनीला दीप्तीने एलबीडब्ल्यू केले.

फोबी लिचफिल्ड 98 चेंडूत 63 धावा करुन बाद झाली. श्रेयंका पाटीलच्या चेंडूवर ऋचा घोषने झेलबाद केले. कांगारु संघाला पाचवा धक्का अॅश्ले गार्डनरच्या रुपाने बसला होता. तिने सहा चेंडूंवर दोन धावा केल्या. स्नेह राणाच्या चेंडूवर अमनजोत कौरने झेलबाद केले.

ताहिला मॅकग्रा 32 चेंडूत 24 धावा करुन दीप्ती शर्माची शिकार ठरली. जॉर्जिया वेरेहॅम 22 धावा करुन दीप्ती शर्माच्या चेंडूवर स्मृती मानधनाकरवी झेलबाद झाली. त्याचवेळी, अॅनाबेल सदरलँड (23) दीप्तीने तिच्याच चेंडूवर झेलबाद केले. अलाना किंग 28 आणि किम गर्थ 11 धावांवर नाबाद राहिली.

मंदाना आणि जेमिमा अपयशी ठरल्या

प्रत्युत्तरात, यास्तिका भाटियाच्या रुपाने भारताला पहिला धक्का बसला. 26 चेंडूत 14 धावा करुन ती एलबीडब्ल्यू आऊट झाली. त्यानंतर स्मृती मंदाना 38 चेंडूत 34 धावा करुन बाद झाली. अलाना किंगच्या चेंडूवर मॅकग्राने झेल घेतला. जेमिमाह रॉड्रिग्ज 55 चेंडूत 44 धावा करुन बाद झाली. जॉर्जिया बिअरहॅमच्या चेंडूवर तिला फोबी लिचफिल्डने झेलबाद केले. हरमनप्रीत कौर 10 चेंडूत पाच धावा करुन बाद झाली. बेअरहॅमच्या चेंडूवर अॅलिसा हिलीने झेल घेतला.

दीप्ती शर्माने 41 वर्षांचा विक्रम मोडला

या सामन्यात भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागला असला तरी दीप्ती शर्माने आपल्या कामगिरीने इतिहास रचला. दिप्ती शर्माने 38 धावांत 5 बळी घेत 41 वर्ष जुना विक्रम मोडीत काढला. अशा परिस्थितीत एवढी मोठी कामगिरी करुनही दिप्ती शर्मा आपल्या संघाला विजयापर्यंत नेऊ शकली नाही. जर भारताने आजचा सामना जिंकला असता तर भारताचा ऑस्ट्रेलियाविरुद्धचा हा 11वा विजय ठरला असता, मात्र हा विक्रम करण्यापासून भारताला मुकावे लागले. भारताने ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळलेल्या 52 पैकी 10 सामने जिंकले आहेत.

ऋचाने 96 धावांची तूफानी खेळी

दरम्यान, ऑस्ट्रेलिया महिला क्रिकेट संघाने भारताविरुद्धचा 42 वा एकदिवसीय सामना जिंकला आहे. भारताला आजचा सामना जिंकण्याची मोठी संधी होती, पण ऑस्ट्रेलियाने अखेरच्या क्षणी सामन्यात शानदार पुनरागमन करत भारतीय संघाच्या एकापाठोपाठ एक विकेट्स घेतल्या, त्यामुळे भारताला विजयी सामना गमवावा लागला.

ऋचा घोषने या सामन्यात अप्रतिम खेळी खेळली, तिने 117 चेंडूत 96 धावा केल्या. याशिवाय, दीप्ती शर्माने गोलंदाजीतही अद्भुत कामगिरी केली. तिने 10 षटकात 38 धावा देऊन 5 विकेट घेतल्या, तरीही या सामन्यात भारताला पराभवाला सामोरे जावे लागले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Government Schools: ...गेल्या 5 वर्षांत ट्रेंड बदलला, शासनाचे सरकारी शाळांना प्राधान्य; CM सावंत

Goa Today's News Live: ख्रिस्ती समाजाच्या मोर्चाचा वाहतुकीला फटका; अनेकांची गैरसोय

Saint Francis Xavier: संत फ्रान्सिस झेवियर यांच्या अवशेषांच्या DNA चाचणी मागणीवरून गोव्यात वाद का पेटला?

Goa Crime: लग्नाचे आमिष देवून अत्याचार करणाऱ्या ओडिशातील तरुणाचा कोर्टाने फेटाळला जामीन!

गोव्यात गेल्या दहा वर्षात सर्वाधिक 'वृक्षसंहार', शेतजमिनींचादेखील ऱ्हास; केंद्रीय अहवालातून खुलासा!

SCROLL FOR NEXT