India women Badminton team won Gold Medal in Asia Team championships 2024:
भारताच्या महिला बॅडमिंटन संघाने रविवारी (18 फेब्रुवारी) ऐतिहासिक कामगिरी नोंदवली. मलेशियामध्ये झालेल्या बॅडमिंटन आशिया टीम चॅम्पियनशीपमध्ये भारतीय महिला संघाने विजेतेपद पटकावले. या स्पर्धेतील भारताचे हे पहिलेच विजेतेपद आहे.
भारतीय महिला संघाने रविवारी अंतिम लढतीत थायलंडला 3-2 अशा फरकाने धूळ चारली. या अंतिम लढतीत पीव्ही सिंधूसह 17 वर्षाच्या अनमोल खर्बने एकेरीत विजय मिळवले, तर गायत्री गोपीचंद आणि ट्रिसा जॉली यांनी दुहेरीत विजयाची नोंद केली.
या स्पर्धेत भारताने आधी बलाढ्य आणि या स्पर्धेतील सर्वात यशस्वी संघ असलेल्या चीनला पराभूत केले होते. त्यानंतर हाँग काँग आणि जपानला पराभूत करत भारतीय संघ अंतिम सामन्यात पोहचला होता. आता अंतिम सामन्यात थायलंडलाही भारताने पराभवाचा धक्का दिला.
अंतिम लढाईत पहिला सामना पीव्ही सिंधू विरुद्ध सुपानिंदा काटेथाँगविरुद्ध झाला. यामध्ये सिंधूने 39 मिनिटात 21-12, 21-12 अशा फरकाने विजय मिळवला. त्यामुळे भारताला 1-0 अशी आघाडी मिळाली होती.
त्यानंतर गायत्री गोपीचंद आणि ट्रीसा जॉली यांनी दुहेरीत जाँगकोलफम कितीखाराकुल आणि रावविंडा प्रजोंगजल यांना तीन गेममध्ये पराभूत केले. गायत्री आणि जॉलीने रावविंडा आणि जाँगकोलफम जोडीला 21-16, 18-21, 21-16 अशा फरकाने पराभूत करत भारताला २-० अशी आघाडी मिळवून दिली होती.
त्यानंतर एकेरीत भारताच्या अस्मिता चालिहा हिला थायलंडच्या बुसनान ओंगबमरुंगफनने 11-21, 14-21 अशा फरकाने पराभूत केले. त्यामुळे थायलंडने आपले आव्हान कायम ठेवले होते.
यानंतर दुहेरीतही भारताच्या प्रिया कोंजेंगबम आणि श्रृती मिश्रा यांना पराभवाचा धक्का बसला. त्यांना बेन्याप ऐमसार्द आणि नटकरण ऐमसार्द या जोडीने 11-21, 9-21 अशा फरकाने पराभूत करत थायलंडला 2-2 अशी बरोबरी साधून दिली होती.
त्यामुळे अनमोल खर्ब विरुद्ध पोर्पिचा शोकिवाँग यांच्यात झालेल्या अखेरचा एकेरी सामना निर्णायक होता. या सामन्यात अनमोलने 21-14, 21-9 असा सहज विजय मिळवत भारताच्या सुवर्णपदकावर शिक्कामोर्तब केले.
दरम्यान, चीनविरुद्धच्या पहिल्या सामन्यातही अनमोलने निर्णायक सामना जिंकून भारताला उपांत्य पूर्व फेरीत प्रवेश मिळवून दिला होता.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.