India women and men team into the Quarter Final in Badminton Asia Team Championships 2024
बॅडमिंटन आशिया टीम चॅम्पियनशीप स्पर्धेला सुरूवात झाली असून बुधवारी भारताच्या महिला आणि पुरुष दोन्ही संघांनी विजयाची नोंद केली आहे. या विजयांसह भारताच्या दोन्ही संघांनी उपांत्यपूर्व फेरीतील प्रवेशही पक्का केला आहे.
भारतीय महिला संघ या स्पर्धेत साखळी फेरीसाठी चीनसह डब्ल्यू ग्रुपमध्ये होते. दरम्यान, चीनच्या महिला संघाला स्पर्धेपूर्वी विजयाचे प्रबळ दावेदार समजले जात होते. परंतु, भारतीय खेळाडूंनी दाखवलेल्या शानदार कामगिरी दाखवत चीनच्या संघाला 3-2 अशा फरकाने पराभवाची धूळ चारली.
या लढतीत पहिला सामना पीव्ही सिंधूचा झाला. या सामन्यातून तिने स्पर्धात्मक बॅडमिंटनमध्ये पुनरागमनही केले. तिने पहिल्या सामन्यात यु हान हिला 40 मिनिटात 21-17, 21-15 अशा फरकाने दोन गेममध्येच पराभवाचा धक्का दिला. त्यामुळे भारताला 1-0 अशी आघाडी मिळाली होती.
मात्र नंतर चीनला ल्यू शेंग शू आणि टॅन निंग यांनी पुनरागमन करून दिले. त्यांनी दुहेरीच्या सामन्यात भारताच्या तनिषा कास्ट्रो आणि अश्विनी पोनप्पा यांना 10-21, 16-21 अशा फरकाने पराभूत केले.
तसेच दुसऱ्या एकेरी सामन्यात भारताच्या अस्मिता चलिहाला 13-21 15-21 अशा फरकाने चीनच्या वँग झी यी हिने पराभूत केले. त्यामुळे चीनला 2-1 अशी आघाडी मिळाली होती.
पण, भारतीय खेळाडूंनीही हार मानली नाही. ट्रेसा जॉली आणि गायत्री गोपिचंद यांनी दुहेरीत चीनच्या ली यी झिंग आणि लुओ झ्युमिन या जोडीला 10-21 21-18 21-17 असे तीन गेममध्ये पराभूत करत भारताला 2-1 अशी बरोबरी साधून दिली.
यानंतर अखेरच्या सामन्यात 16 वर्षीय अनमोल खर्ब हिने कमाल केली. तिने व्यू लुओ यु हिला 22-20 14-21 21-18 अशा फरकाने पराभूत केले आणि भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. यासह भारतीय महिला संघाचा उपांत्यपूर्व फेरीतील प्रवेश पक्का झाला.
भारतीय पुरुष बॅडमिंटन संघाचा समावेश साखळी फेरीसाठी चीन आणि हाँग काँगबरोबर ए ग्रुपमध्ये आहे. दरम्यान, भारतीय पुरुष संघाचा पहिला सामना हाँग काँगविरुद्ध बुधवारी झाला. या सामन्यात भारताने हाँग काँगला 4-1 अशा फरकाने पराभूत केल आणि उपांत्यपूर्व फेरीतील प्रवेश पक्का केला.
भारतीय पुरुष संघाच्या हाँग काँगविरुद्धच्या लढतीत पहिला सामना एचएस प्रणॉयचा नग का लाँग अँगस विरुद्ध झाला. पण या सामन्यात प्रणॉयला 21-18, 21-14 अशा फरकाने पराभूत व्हावे लागले.
पण नंतर सात्विकसाईराज रंकिरेड्डी आणि चिराग शेट्टी या भारतीय जोडीने भारताला पुनरागमन करून दिले. त्यांनी दुहेरीत ल्यू - येउंग या जोडीला 21-16, 21-11 असे पराभूक करत भारताला 1-1 अशी बरोबरी साधून दिली.
तिसऱ्या सामन्यात लक्ष्य सेनने चॅन युन चॅक याला 21-14, 21-9 अशा फरकाने पराभूत केले. नंतर भारताच्या अर्जून एम.आर आणि ध्रुव कपिला या जोडीने दुहेरीत चाव आणि हँग या जोडीला 21-12, 21-7 अशा फरकाने पराभूत केले आणि भारताला 3-1 अशी आघाडी मिळवून दिली.
अखेरच्या सामन्यात किदंबी श्रीकांतने जेसन गुनावनला 21-14 आणि 21-18 अशा फरकाने पराभूत केले आणि भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.
आता भारतीय पुरुष संघाचा चायनाविरुद्धची लढत 15 फेब्रुवारीला होणार आहे.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.