FDA Raid: फोंडा येथील फेरीवाल्यांना नोटिसा, 'एफडीए'ची धडक मोहीम; 80 हून अधिक आस्थापनांची तपासणी

FDA Goa Ponda raid 2026: अन्न आणि औषध प्रशासनाने (एफडीए) गेल्या १० दिवसांपासून राज्यभरात राबवलेल्या धडक मोहिमेत ८० हून अधिक खाद्य आस्थापनांची तपासणी केली आहे.
FDA Goa Ponda raid 2026
FDA Goa Ponda raid 2026Dainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: अन्न आणि औषध प्रशासनाने (एफडीए) गेल्या १० दिवसांपासून राज्यभरात राबवलेल्या धडक मोहिमेत ८० हून अधिक खाद्य आस्थापनांची तपासणी केली आहे. या कारवाईत विनापरवाना व्यवसाय करणाऱ्यांना नोटिसा बजावण्यात आल्या असून, हजारो रुपयांचा दंड आकारण्यासोबतच बनावट ब्रँडची उत्पादने जप्त करण्यात आली आहेत.

रस्त्यावरील फेरीवाल्यांपासून ते घाऊक फळ विक्रेते आणि किनारपट्टीवरील उपाहारगृहांपर्यंत सर्वांवर ही कडक कारवाई करण्यात आल्याची माहिती एफडीए संचालक श्वेता देसाई यांनी दिली आहे.

देसाई यांनी सांगितले की, या मोहिमेचा मुख्य रोख हा विनापरवाना व्यवसायांवर होता. केवळ फोंडा तालुक्यातच सुमारे १३ फेरीवाल्यांना नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. २३ फेब्रुवारी ते २ मार्च २०२६ या कालावधीत रात्री उशिरा आणि पहाटे राबवलेल्या या मोहिमेत एकूण ८० हून अधिक ठिकाणांची झडती घेण्यात आली आहे.

FDA Goa Ponda raid 2026
Goa Politics: पणजी, फोंडा निवडणुकीवर भाजपने ठरविली रणनीती! गाभा समितीची बैठक, संघटनात्मक हालचालींना वेग

२ मार्च रोजी फोंडा तालुक्यात रात्री उशिरा करण्यात आलेल्या तपासणीत प्रामुख्याने विनापरवाना आणि अस्वच्छ विक्रेत्यांवर कारवाई करण्यात आली. ‘एफएसएसआय’ कायद्याच्या कलम ३१(२) अंतर्गत सुमारे १३ फेरीवाल्यांना नोटिसा बजावण्यात आल्या.

खाद्यपदार्थ साठवण्यासाठी वर्तमानपत्रांचा वापर, अस्वच्छ परिसर, कर्मचाऱ्यांचा अयोग्य पेहराव आणि कचराकुंडीचा अभाव अशा त्रुटी प्रामुख्याने आढळल्या. या सर्वांना त्वरित ‘एफएसएसआय’ नोंदणी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

२३ फेब्रुवारी रोजी पहाटे केळी पिकवण्यासाठी कृत्रिम पद्धतीचा वापर करणाऱ्या ४ विक्रेत्यांवर छापे टाकण्यात आले. काही ठिकाणी मान्यताप्राप्त इथिलीन चेंबरचा वापर होत होता, तर काही ठिकाणी अगरबत्तीच्या उष्णतेचा वापर केला जात असल्याचे आढळले. येथून १६ नमुने गोळा करून प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत.

FDA Goa Ponda raid 2026
Goa Tourist Place Ban: गोव्यातील 'या' प्रसिद्ध ठिकाणी पर्यटकांना बंदी! ग्रामस्थांनी घेतला निर्णय; कचरा, धांगडधिंग्यामुळे ठराव मंजूर

३३ आस्थापनांकडे वैध परवानाच नाही

२५ फेब्रुवारी रोजी मडगावच्या नेसाय औद्योगिक वसाहतीत ५५ आस्थापनांची तपासणी करण्यात आली. यामध्ये ४ चिकन शॉप्स, ९ फेरीवाले, ३ रेस्टॉरंट्स आणि ३२ किरकोळ विक्रेत्यांचा समावेश होता. धक्कादायक म्हणजे ३३ आस्थापनांकडे वैध परवानाच नव्हता. तपासणीत सॅनिटरी कार्ड नसणे, पेस्ट कंट्रोलचा अभाव, चिकनवर कृत्रिम रंगांचा वापर आणि लोखंडी सुऱ्यांचा वापर अशा त्रुटी आढळल्या.

काम बंद करण्याचे आदेश

२४ फेब्रुवारी रोजी कळंगुट, बागा, थिवी आणि हणजूण किनारपट्टी भागात १४ व्यवसायांची तपासणी करण्यात आली. गंभीर त्रुटी आढळल्याने ४ युनिट्सना कामकाज तत्काळ बंद करण्याचे आदेश देण्यात आले. बागा येथील एका विक्रेत्याकडून सुमारे १५० किलो बनावट काजू आणि चॉकलेट जप्त करण्यात आले.

‘धूम्रपान निषिद्ध’चा फलक नसल्याने दंड

एका किरकोळ विक्रेत्याची आणि ५ फास्ट फूड सेंटरचीही तपासणी करण्यात आली. त्यापैकी ४ ठिकाणी अस्वच्छता आढळल्याने त्यांना नोटिसा बजाविण्यात आल्या. तसेच ‘कोटपा’ कायद्यांतर्गत ‘धूम्रपान निषिद्ध’चा फलक न लावल्याबद्दल दंड ठोठावण्यात आला. विनापरवाना व्यवसाय केल्याबद्दल एकूण २९,००० रुपये आणि कोटपा उल्लंघनासाठी ८०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com