India vs New Zealand Second Test: भारत-न्यूझीलंड यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्यात वेलिंग्टनच्या मैदानावर सलग चार दिवस वर्चस्व गाजवूनही भारतीय संघाला अखेरच्या दिवशी अनपेक्षितपणे अनिर्णित निकालावर समाधान मानावे लागले. पाचव्या दिवशी डावाने विजयासाठी आठ विकेट्सची गरज असताना सपाट खेळपट्टीमुळे गोलंदाजांची पुरती दमछाक झाली आणि अवघ्या तीन विकेट्सवर समाधान मानावे लागले.
डॅरिल मिचेल आणि ग्लेन फिलिप्स यांनी संयमी फलंदाजी करत यजमान संघाचा पराभव टाळला. या अनपेक्षित निकालाचा फटका जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेतील गुणतालिकेतही बसला असून, कर्णधार शुभमन गिलच्या चेहऱ्यावर निराशा स्पष्ट दिसून आली.
पहिल्या कसोटीतील धावांचा डोंगर उभारुनही मिळालेला विजय निसटल्याने आता दुसऱ्या कसोटीत विजय मिळवणे हे भारतासाठी अत्यंत महत्त्वाचे ठरले आहे. शुक्रवारपासून क्राइस्टचर्चमधील हॅगली ओव्हल मैदानावर सुरु होणारा हा सामना जिंकून मालिका खिशात घालण्याचा गिल आणि त्याच्या संघाचा मानस असेल. मात्र, पराभव किंवा पुन्हा एकदा सामना अनिर्णित राहिल्यास अंतिम फेरीची वाट अधिक खडतर होऊ शकते. या मैदानावर भारताची (India) कामगिरी फारशी उत्साहवर्धक राहिलेली नाही.
फेब्रुवारी 2020 मध्ये झालेल्या एकमेव कसोटीत भारताला पराभव पत्करावा लागला होता; त्या सामन्यात पहिल्या डावात 242 धावा केल्यानंतर दुसऱ्या डावात फलंदाजी 124 धावांवर कोसळली होती आणि न्यूझीलंडने 132 धावांचे लक्ष्य सहज गाठले होते. दुसरीकडे, वेलिंग्टनच्या पहिल्या कसोटीत भारताने पहिल्या डावात 720 धावांची मजल मारली होती.
केएल राहुल आणि ऋषभ पंत यांनी शतकी खेळी खेळली, तर यशस्वी जयस्वाल, देवदत्त पडिक्कल, ध्रुव जुरेल यांनी अर्धशतके झळकावली आणि कर्णधार गिलचे 98 धावांवर शतक हुकले. गोलंदाजीत जसप्रीत बुमराहने चार बळी घेत न्यूझीलंडला 368 धावांत रोखले होते. आता क्राइस्टचर्चमध्ये गोलंदाजी आणि फलंदाजीचा समतोल साधत विजय मिळवण्याचे मोठे आव्हान भारतीय संघासमोर उभे आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.