India vs Australia, 4th Test: भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघात अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर चौथा कसोटी सामना सुरू आहे. शुक्रवारी या सामन्याच्या दुसऱ्या दिवसाखेर भारतीय संघाने पहिल्या डावात 10 षटकात बिनबाद 36 धावा केल्या आहेत. अद्याप भारतीय संघ 444 धावांनी पिछाडीवर आहे.
तत्पूर्वी, ऑस्ट्रेलियाचा संघाचा पहिला डाव 167.2 षटकात 480 धावांवर संपला. या सामन्यात उस्मान ख्वाजा आणि कॅमेरॉन ग्रीन यांनी शतकी खेळी केल्या. तसेच टॉड मर्फी आणि नॅथन लायन यांनी 9 व्या विकेटसाठी तब्बल 70 धावांची भागीदारी केली.
या सामन्यात दुसऱ्या दिवशी ऑस्ट्रेलियाने 91 षटकापासून आणि 4 बाद 255 धावांपासून पुढे खेळायला सुरुवात केली. पहिल्या दिवसाखेर नाबाद राहिलेल्या उस्मान ख्वाजा आणि कॅमेरॉन ग्रीन यांनी दुसऱ्या दिवशीही दमदार खेळ केला. या दोघांनीही जवळपास दीड सत्र भारतीय गोलंदाजांना यश मिळू दिले नाही. या दरम्यान, ख्वाजाने दीडशतक, तर ग्रीनने शतकी खेळी केली. त्यांनी द्विशतकी भागीदारीही केली.
पण अखेर आर अश्विनने ख्वाजा आणि ग्रीन यांच्यात झालेली 208 धावांची भागीदारी मोडली. त्याने ग्रीनला 131 व्या षटकात चकवले. त्यामुळे ग्रीन 170 चेंडूत 14 चौकारांसह 114 धावा करून यष्टीरक्षक केएस भरतकडे झेल देत बाद झाला. त्यानंतर याच षटकात अश्विनने ऍलेक्स कॅरेलाही शुन्य धावेवर माघारी धाडले. त्यापाठोपाठ अश्विनने स्टार्कलाही 6 धावांवरच बाद केले.
मात्र, ख्वाजा दुसऱ्या सत्रानंतरही खेळपट्टीवर कायम राहिला होता. पण अखेर तिसऱ्या सत्राच्या पहिल्याच चेंडूवर अक्षर पटेलने त्याला पायचीत पकडले. डीआरएस रिव्ह्यूमध्ये तो बाद असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे तो 422 चेंडूत 180 धावांची खेळी करुन माघारी परतला. त्याचे द्विशतक केवळ 20 धावांनी हुकले.
मात्र, तो बाद झाल्यानंतर टॉड मर्फी आणि नॅथन लायन यांनी चिवट फलंदाजी करताना भारतीय गोलंदाजांना झटपट यश मिळणार नाही याची काळजी घेतली. त्यांनी अर्धशतकी भागीदारी करत ऑस्ट्रेलियाला 450 धावांचा टप्पाही पार करून दिला.
पण अखेर अश्विननेच या दोघांचाही अडथळा दूर केला. मर्फीने 41 आणि लायनने 34 धावांची खेळी केली. हे दोघेही बाद झाल्याने ऑस्ट्रेलियाचा पहिला डावही संपुष्टात आला.
भारताकडून या डावात आर अश्विनने सर्वाधिक 6 विकेट्स घेतल्या. तसेच मोहम्मद शमीने 2 विकेट्स घेतल्या. त्याचबरोबर रविंद्र जडेजा आणि अक्षर पटेल यांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.