India vs Australia: भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात सध्या बॉर्डर-गावसकर ट्रॉफी ही कसोटी मालिका सुरू आहे. ही मालिका ऑस्ट्रेलियाचा स्टार फलंदाज स्टीव्ह स्मिथसाठी मात्र वैयक्तिकरित्या फारशी खास ठरलेली दिसत नाही. याच मालिकेदरम्यान त्याच्या नावावर एक नकोसा विक्रमही नोंदवला गेला आहे.
सध्या या मालिकेतील चौथा आणि अखेरचा कसोटी सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये सुरू आहे. या सामन्यात प्रथम फलंदाजी करणाऱ्या ऑस्ट्रेलिया संघाकडून पहिल्या डावात स्मिथने उस्मान ख्वाजाला तिसऱ्या विकेटसाठी चांगली साथ देताना 79 धावांची भागीदारी केली होती.
पण 135 चेंडू खेळत खेळपट्टीवर स्थिरावलेल्या स्मिथला जडेजाने 38 धावांवर त्रिफळाचीत केले. त्यामुळे स्मिथ पुन्हा एकदा या मालिकेत 50 धावांचा टप्पाही पार करण्यात अपयशी ठरला. त्याला या मालिकेत आत्तापर्यंत खेळलेल्या 6 डावात एकदाही 50 धावांचा टप्पा ओलांडता आलेला नाही.
त्यामुळे त्याच्या करकिर्दीत असे पहिल्यांदाच घडले आहे की सलग 6 डावात त्याने 50 धावांचा टप्पा ओलांडलेला नाही. यापूर्वी कधीही अशी घटना त्याच्या कारकिर्दीत घडली नव्हती.
स्मिथने या कसोटी मालिकेत आत्तापर्यंत 37, 25*, 0, 9, 26, 38 अशा धावांची खेळी केल्या आहेत. स्मिथ या कसोटी मालिकेत खेळलेल्या 6 डावांपैकी तीन वेळा रविंद्र जडेजाविरुद्ध 3 वेळा बाद केले आहे.
दरम्यान, अहमदाबाद कसोटीत स्मिथ जरी 38 धावांवर बाद झाला असला, तरी ऑस्ट्रेलियाकडून उस्मान ख्वाजा आणि कॅमेरॉन ग्रीन यांनी शतके साजरी केली. त्यामुळे ऑस्ट्रेलियाने सहज 350 धावांचा टप्पा दुसऱ्या दिवसाचे दुसरे सत्र संपण्यापूर्वी पार केला होता.
स्मिथची वैयक्तिक कामगिरी चांगली झाली नसली, तरी त्याने नेतृत्वात कमाल केली आहे. पॅट कमिन्स दुसऱ्या कसोटीनंतर आईच्या आजारपणामुळे मायदेशी परतल्याने स्मिथकडे तिसऱ्या आणि चौथ्या कसोटीत ऑस्ट्रेलियाच्या कर्णधारपदाची जबाबदारी सोपवण्यात आली.
त्याने तिसऱ्या कसोटीत शानदार नेतृत्व करताना ऑस्ट्रेलियाला विजय देखील मिळवून दिला. त्याचमुळे भारताने पहिले दोन सामने जिंकून मालिकेत घेतलेली आघाडी ऑस्ट्रेलियाने 2-1 अशी कमी केली. आता चौथ्या कसोटी सामना जिंकून मालिकेत बरोबरी साधण्याची ऑस्ट्रेलियाला संधी आहे, तर हा सामना अनिर्णित ठेवून किंवा जिंकून भारतीय संघ मालिका नावावर करू शकतो.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.