India vs Australia, 1st Test: भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात नागपूरला कसोटी मालिकेतील पहिला सामना सुरू आहे. या सामन्याच्या दुसऱ्या दिवसाखेर भारताने 144 धावांची आघाडी घेतली आहे.
दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा भारताने पहिल्या डावात 114 षटकात 7 बाद 321 धावा केल्या आहेत. दुसरा दिवस भारतासाठी रोहित शर्मा, रविंद्र जडेजा, आणि अक्षर पटेलने, तर ऑस्ट्रेलियासाठी टॉड मर्फीने गाजवला.
रोहितचे शतक
दुसऱ्या दिवशी भारताने पहिल्या डावात 25 व्या षटकापासून 1 बाद 77 धावांपासून खेळायला सुरुवात केली होती. यावेळी रोहित शर्मा 56 धावांवर आणि पहिल्या दिवशी नाईटवॉचमन म्हणून खेळायला आलेला आर अश्विन शुन्यावर नाबाद होता. या दोघांनीही दुसऱ्या दिवसाची सुरुवात चांगली केली.
दुसऱ्या दिवशी त्यांनी जवळपास सुरुवातीची 16 षटके खेळून काढताना ऑस्ट्रेलियाला मोठे यश मिळवू दिले नाही. पण त्यांची भागीदारी रंगत असतानाच मर्फीने 23 धावांवर खेळणाऱ्या अश्विनला पायचीत पकडले.
त्यानंतर फलंदाजीला आलेल्या चेतेश्वर पुजारा आणि विराट कोहलीलाही मर्फीने फार काळ टिकू दिले नाही. पुजाराला 7 धावांवर आणि विराटला 12 धावांवर त्याने बाद केले. यानंतर सूर्यकुमार यादवही नॅथन लायनविरुद्ध खेळताना 8 धावावंर त्रिफळाचीत झाला.
पण, भारताची मधली फळी झटपट कोलमडल्यानंतरही रोहितने एक बाजू सांभाळली होती. त्याला जडेजाची साथ मिळाली. या दोघांनी नंतर ऑस्ट्रेलियन गोलंदाजांना थकवताना 130 चेंडूत 61 धावांची भागीदारी केली. यादरम्यान रोहितने त्याचे नववे कसोटी शतकही पूर्ण केले.
त्यामुळे तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये तिन्ही प्रकारात शतकी खेळी करणारा पहिला भारतीय कर्णधारही ठरला. पण शतक केल्यानंतर रोहितला तिसऱ्या सत्राच्या सुरुवातीलाच ऑस्ट्रेलियन कर्णधार पॅट कमिन्सने त्रिफळाचीत केले. रोहितने 212 चेंडूत 120 धावांची खेळी केली. त्याने या खेळीदरम्यान 15 चौकार आणि 2 षटकार ठोकले.
कमिन्सने रोहितला बाद केल्यानंतरही जडेजाने अक्षर पटेलला साथीला घेत भारताचा डाव पुढे नेला. जडेजा आणि पटेल या दोघांनीही दुसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत ऑस्ट्रेलियाला आणखी यश मिळू न देता नाबाद 81 धावांची अर्धशतकी भागीदारी रचली. यादरम्यान दोघांनीही अर्धशतके केली.
दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा जडेजा 66 धावांवर आणि पटेल 52 धावांवर नाबाद आहेत. तर ऑस्ट्रेलियाकडून या सामन्यातून पदार्पण केलेल्या टॉड मर्फीच्या नावावर 5 विकेट्सची नोंद झाली. याशिवाय पॅट कमिन्स आणि नॅथन लायन यांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली.
जडेजाची गोलंदाजीतही कमाल
जडेजाने या सामन्याच्या पहिल्या दिवशी गोलंदाजीतही कमाल केली होती. त्याने ऑस्ट्रेलियाच्या पहिल्या डावात 5 विकेट्स घेतल्या होत्या. त्याने स्टीव्ह स्मिथ, मार्नस लॅब्युशेन, मॅट रेनशॉ, पीटर हँड्सकॉम्ब आणि टॉड मर्फी यांना बाद केले होते.
त्याच्या 5 विकेट्समुळे भारताला ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव 63.5 षटकात 177 धावांवर संपवण्यात यश मिळाले. ऑस्ट्रेलियाकडून लॅब्युशेनने सर्वाधिक 49 धावांची खेळी केली.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.