

डिचोली: लीज क्षेत्र आणि अन्य प्रश्नांवरून गेल्या दीड-दोन वर्षांपासून मुळगावात खदखदत असलेला ‘खनिज’ प्रश्न आता पेटला आहे. २०२१ च्या प्रादेशिक आराखड्यानुसार बफर झोन निश्चित करा. रात्रपाळी बंद करा तसेच खाणीशी संबंधित गावचे मुख्य प्रलंबित प्रश्न सोडवा. आदी मागण्या पुन्हा एकदा पुढे करीत आक्रमक झालेल्या संतप्त मुळगाववासियांनी रविवारी (ता.१) सायंकाळी डिचोली खाण ब्लॉक-१ अंतर्गतच्या गावातील खाणीवर धडक दिली.
ग्रामस्थांनी खाणीवर धडक दिली, तेव्हा खाणीवरील कामकाज बंद होते. त्यामुळे आक्रमक झालेल्या ग्रामस्थांना कोणतीही कृती करणे शक्य झाले नाही. मात्र गावचे प्रमुख प्रश्न सुटत नाही, तोपर्यंत खाणीवर कामकाज सुरू करण्यास देणार नाही. असा निर्धार ग्रामस्थांनी केला.
गेल्या दीड वर्षाहून अधिक काळापासून मुळगावात खाणीचा विषय धुमसत आहे. प्रलंबित प्रश्न सोडवा. अन्यथा गावात खनिज व्यवसाय नकोच, अशी मागणी मुळगावच्या लोकांची आहे. यापूर्वीही मुळगावच्या लोकांनी आक्रमक भूमिका घेत खाणीवर धडक दिलेली होती.
खाणी विरोधात सायंकाळी गावकरवाडा येथील श्री केळबाई मंदिराच्या सभागृहात मुळगाववासियांची एक जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेस महिला मिळून दोनशेहून अधिक ग्रामस्थ उपस्थित होते.
या सभेत माजी सरपंच वसंत गाड, कोमुनिदादचे अध्यक्ष महेश्वर परब, सामाजिक कार्यकर्ते स्वप्नेश शेर्लेकर, शेतकरी संघटनेचे प्रकाश परब, सुरेंद्र गाड, मनोज गाड यांनी खाण विरोधी भूमिका मांडताना खाणीमुळे गावचे अस्तित्व धोक्यात आहे, अशी भीती व्यक्त केली.
अन् जाहीर सभा फिस्कटली!
ग्रामस्थांनी संघटितपणे खाण विरोधी लढा अधिक तीव्र करण्याचा निर्धारही या सभेत करण्यात आला, पण सभा अर्ध्यावरच थांबवून मुळगाववासियांनी खाणीवर मोठ्या संख्येने ग्रामस्थांनी धडक दिली. या सभेवेळी देवस्थान समितीचे अध्यक्ष कृष्णनाथ परब आणि अन्य संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.