India vs Australia: भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात चार सामन्यांच्या कसोटी मालिकेला गुरुवारी (9 फेब्रुवारी) पासून सुरुवात झाली असून पहिली कसोटी नागपूरच्या विदर्भ क्रिकेट असोसिएशन क्रिकेट स्टेडियवर खेळवला जात आहे. पहिल्या कसोटीच्या पहिल्या दिवशी भारतीय संघाचे वर्चस्व राहिले आहे.
पहिला दिवस संपला तेव्हा भारताने पहिल्या डावात 24 षटकात 1 बाद 77 धावा केल्या आहेत. अद्याप भारतीय संघ 100 धावांनी पिछाडीवर आहे. तत्पूर्वी ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव 63.5 षटकात 177 धावांवर सर्वबाद झाला होता.
भारतीय सलामीवीरांची दमदार सलामी
या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव संपवल्यानंतर भारतीय संघाकडून कर्णधार रोहित शर्मा आणि केएल राहुल सलामीला फलंदाजी करण्यासाठी आले होते. या दोघांनी चांगला खेळ करताना ऑस्ट्रेलियाला सुरुवातीला विकेट्स मिळू दिल्या नाही.
रोहितने सुरुवातीला काहीसा आक्रमक खेळ केला होता. यावेळी दुसऱ्या बाजूने केएल राहुलने त्याला साथ देत बचावात्मक खेळ केला. या दोघांनी मिळून सलामीला 138 चेंडूत 76 धावांची भागीदारी केली. यात रोहितच्या 55 धावांचे योगदान होते.
पण त्यांची भागीदारी रंगत असताना टॉड मर्फीने 23 व्या षटकात केएल राहुलला 20 धावांवर बाद केले. त्यामुळे रोहितला साथ देण्यासाठी नाईट वॉचमन म्हणून आर अश्विन फलंदाजीसाठी आला.
पहिल्या दिवसाखेरीस 24 षटकांनंतर भारताकडून रोहित शर्मा 56 धावांवर नाबाद राहिला, तर आर अश्विन शुन्यावर नाबाद आहे.
ऑस्ट्रेलियाचा संघ 177 धावांवर गारद
या सामन्यात नाणेफेक जिंकून ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. पण ऑस्ट्रेलियन संघाला 177 धावांवर रोखण्यात भारतीय गोलंदाजांनी यश मिळवले. यामध्ये रविंद्र जडेजाचा वाटा मोठा राहिला. त्याने 22 षटकात 47 धावा देत 5 विकेट्स घेतल्या.
तसेच आर अश्विनने 15.5 षटके गोलंदाजी करताना 42 धावा देत 3 विकेट्स घेतल्या. याशिवाय मोहम्मद शमी आणि मोहम्मद सिराज यांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली.
ऑस्ट्रेलियाकडून तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या मार्नस लॅब्युशेनने सर्वाधिक 49 धावांची खेळी केली. त्याच्यानंतर स्टीव्ह स्मिथने 37 धावांची खेळी केली. या दोघांव्यतिरिक्त ऑस्ट्रेलियाकडून ऍलेक्स कॅरेने (36) आणि पीटर हँड्सकॉम्ब (31) या दोघांनाच ३० धावांचा टप्पा पार करता आला. याव्यतिरिक्त ऑस्ट्रेलियाचे 6 खेळाडू एक आकडी धावसंख्येवर बाद झाले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.