Sumit Nagal Dainik Gomantak
क्रीडा

Sumit Nagal: अनेक मैदाने गाजवणाऱ्या टेनिसपटूची जगण्यासाठी धडपड, खात्यात राहिले अवघे 80 हजार

Pranali Kodre

India Tennis Player Sumit Nagal Struggle:

काही वर्षांपूर्वी म्हणजेच 2019 मध्ये झालेल्या अमेरिकन ओपन या ग्रँडस्लॅम स्पर्धेत रॉजर फेडरर विरुद्धच्या सामन्यात पहिलाच सेट जिंकून एक भारतीय खेळाडू चर्चेत आला होता. हा खेळाडू होता सुमीत नागल. त्याला त्यावेळी फेडररविरुद्ध पराभव स्विकारावा लागलेला, पण तरी फेडरर सारख्या दिग्गज खेळाडूविरुद्ध पहिला सेट जिंकत त्याने भारतीयांकडून वाहवा मिळवली होती.

दरम्यान, सुमीत नागल हा सातत्याने भारताकडून ग्रँडस्लॅमपर्यंत पोहचत आहे. गेल्या अनेक वर्षांपासून तो कामगिरीत सातत्य राखून आहे. मात्र, असे असले तरी तो अर्थिक अडचणींचा सामना करत आहे.

त्याचा वर्षाचा खर्च साधारण 1 कोटींपर्यंत येतो, पण सध्या त्याच्या खात्यात १ लाखापेक्षाही कमी रक्कम असल्याचे त्याने सांगितले आहे. त्याने असेही सांगितले की त्याला मिळालेली बक्षीसाची रक्कमही त्याने त्याच्या ट्रेनिंगमध्ये खर्च केली आहे.

नागल गेल्या अनेक वर्षांपासून जर्मनीतील नान्सेल टेनिस अकादमीमध्ये ट्रेनिंग करतो. पण आता त्याला तिथे अर्थिक अडचणींमुळे तिथे सराव करणे कठीण होत आहे.

त्याला जानेवारी-फेब्रुवारीमध्ये त्याचे मित्र, सोमदेव देववर्मन आणि ख्रिस्तोफर मार्किस यांनी केलेल्या मदतीमुळे तो जर्मनीमध्ये राहण्याची व्यवस्था करू शकला होता. मात्र, तो आता अर्थिक तंगीचा सामना करत असल्याने त्याने सरकारकडेही मदत मागितली आहे.

नागलने त्याला मिळालेली सर्व बक्षीस रक्कम, त्याला इंडियन ऑइलकडून मिळणारे वेतन आणि महा टेनिस फाऊंडेशनकडून मिळाणारी मदत एटीपी टूर स्पर्धांमध्ये खेळण्यासाठी गुंतवली आहे.

त्याने त्याच्या अर्थिक परिस्थितीबद्दल पीटीआयला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की 'जर मी माझा बँक बॅलन्स पाहिला, तर या वर्षाच्या सुरुवातीला जेवढी रक्कम माझ्याकडे होती, तेवढीच आहे. माझ्याकडे 900 युरो (साधारण 80 हजार रुपये) आहेत.'

'मला सध्या महा टेनिस फाऊंडेशनच्या मार्फत प्रशांत सुतार यांच्याकडून मदत मिळत आहे आणि मला महिन्याला इंडियन ऑइलकडून वेतन मिळत आहे. पण पहिल्या 100 मध्ये येण्यासाठी मला 1 कोटीच्या जवळपास फंडिंग हवी.'

नागलला यावर्षी खेळलेल्या 24 स्पर्धांमधून 65 लाख रुपये मिळाले आहेत. त्याला सर्वाधिक पैसे अमेरिकन ओपन स्पर्धेतून मिळाले. या स्पर्धेत त्याला 22 हजार डॉलर (साधारण 18 लाख) मिळाले. मात्र, त्याला हे सर्वच पैसे गुंतवावे लागले आहेत.

तो म्हणाला, 'मी जे काही मिळवत आहे, ते गुंतवत आहे. मी एका प्रशिक्षकाबरोबर प्रवास करतो, ज्याचा मिळून वर्षाचा खर्च मला 80 लाख ते 1 कोटी रुपयांपर्यंत येतो. तेही केवळ एका प्रशिक्षकासह त्यात फिजिओचा समावेश नसतो. जे काही मला मिळाले आहे, ते मी गुंतवले आहे.'

त्याने पुढे बोलताना तो भारताला अव्वल क्रमांकाचा टेनिसपटू असल्याचीही आठवण करून दिली.

तो म्हणाला, 'मी गेल्या काही वर्षापासून भारताचा अव्वल क्रमांकाचा खेळाडू आहे, मी एकमेव खेळाडू आहे, जो ग्रँडस्लॅमसाठी पात्र ठरत आहे, गेल्या काही वर्षात ऑलिम्पिकमध्ये सामना जिंकणारा एकमेव टेनिसपटू आहे, तरी मला कमी पाठिंबा मिळत आहे, तसेच सरकारनेही माझ्या TOPS मध्ये समावेश केलेला नाही.'

त्याचबरोबर त्याने असेही सांगितले की जेव्हा दुखापतीमुळे त्याची क्रमवारी घसरली होती, तेव्हा त्याला फारसा पाठिंबा मिळाला नव्हता. त्यामुळे तो खूप निराश झाला होता. त्याने असेही म्हटले की भारतात अर्थिक मदत मिळवणे कठीण आहे. तसेच त्याने आता परिस्थितीपुढे हार मानली आहे.

नागलवर गेल्यावर्षी हिप सर्जरीही झाली, तसेच दोनदा त्याला कोविडचाही सामना करावा लागला. त्यामुळे पुनरागमन करताना त्याला संघर्ष करावा लागला. याबरोबरच त्याने असेही सांगितले की त्याच्या प्रशिक्षकांनी त्याला काही पैशांची बचत कर आणि मग जर्मनीत परत ये असा सल्ला दिला आहे.

नागलने असेही सांगितले की तो खूप महागड्या गोष्टी नाही, तर मुलभूत गोष्टींची मागणी करत आहे. त्याने म्हटले आहे की 'आपल्याकडे चीन इतकीच क्षमता आहे, तरीही आपण ऑलिम्पिकमध्ये 5-6 पदकेच का जिंकतो, जेव्हा चीन 38 सुवर्णपदके जिंकतात.'

त्याने म्हटले आपल्याकडे मार्गदर्शनाची कमी आहे. टेनिसमध्ये आपण सर्वोच्च स्थरावर स्पर्धा करण्यापासून खूप लांब आहोत.

नागलची क्रमवारी सध्या एकेरीत 159 आहे. त्याच्यानंतर भारताच्या शशीकुमार मुकुंदची 407 क्रमवारी आहे, तर प्रज्ञेश गुण्णेश्वरणची 540, दिग्विजय प्रताप सिंग (554), रामकुमार रामनाथन (569) या भारतीय खेळाडूंचा क्रमांक लागतो.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Government Schools: ...गेल्या 5 वर्षांत ट्रेंड बदलला, शासनाचे सरकारी शाळांना प्राधान्य; CM सावंत

Goa Today's News Live: ख्रिस्ती समाजाच्या मोर्चाचा वाहतुकीला फटका; अनेकांची गैरसोय

Saint Francis Xavier: संत फ्रान्सिस झेवियर यांच्या अवशेषांच्या DNA चाचणी मागणीवरून गोव्यात वाद का पेटला?

Goa Crime: लग्नाचे आमिष देवून अत्याचार करणाऱ्या ओडिशातील तरुणाचा कोर्टाने फेटाळला जामीन!

गोव्यात गेल्या दहा वर्षात सर्वाधिक 'वृक्षसंहार', शेतजमिनींचादेखील ऱ्हास; केंद्रीय अहवालातून खुलासा!

SCROLL FOR NEXT