India Team lost against Pakistan by 4-5 in Men's Asian Hockey 5s World Cup Qualifier :
आशिया हॉकी 5s वर्ल्डकप क्वालिफायर स्पर्धेत बुधवारी भारतीय संघाने ओमानविरुद्ध १२-२ अशा गोलफरकाने विजय मिळवला. मात्र त्याचनंतर पाकिस्तानविरुद्ध भारताला ४-५ अशा गोलफरकाने पराभवाचा सामना करावा लागला आहे
पाकिस्तानविरुद्ध झालेल्या सामन्यात भारताकडून मनिंदर सिंग (17', 29'), गुरज्योत सिंग (12') आणि मोहम्मद राहिल (21') यांनी गोल नोंदवले. पाकिस्तानकडून अहतिशम अस्लम (2', 3'), झिक्रिया हयात (5') आणि अब्दुल रेहमान (13') आणि अब्दुल राणा (26') यांनी गोल केले.
पाकिस्तानने सुरुवात चांगली केली होती. अहतिशम अस्लमने सुरुवातीलाच भारताचा बचाव भेदत दुसऱ्या आणि तिसऱ्या मिनिटाला गोल केले. भारताने प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला. मात्र पाकिस्तानचा गोलकिपर अली रझाने चांगला बचाव केला.
त्यानंतर झिक्रिया हयातने पाकिस्तानसाठी तिसरा गोल नोंदवला. पण त्यानंतर गुरज्योत सिंगने पहिला हाफ संपण्यास काही मिनिटे बाकी असताना भारतासाठी पहिला गोल नोंदवला.
मात्र त्यापाठोपाठ अब्दुल रेहमानने लगेचच पाकिस्तानविरुद्ध चौथा गोल नोंदवला. त्यामुळे पहिला हाफ संपला, तेव्हा पाकिस्तान 1-4 असा आघाडीवर होता.
दुसऱ्या हाफमध्ये भारताने चांगले पुनरागमन केले. मनिंदर सिंगने दोन आणि मोहम्मद राहिलने एक गोल केला. मात्र 26 व्या मिनिटाला कर्णधार अब्दुल राणाने केलेला गोल पाकिस्तानसाठी महत्त्वाचा ठरला. त्यामुळे पाकिस्तानने हा सामना जिंकला.
या सामन्यापूर्वी भारताने ओमानविरुद्ध विजय मिळवला होता. या सामन्यात भारताकडून मोहम्मद राहिल (2', 9', 30'), पवन राजभर (9', 10', 21') आणि मनिंगर सिंग (16', 23', 26') यांनी गोलची हॅट्रिक साधली.
तसेच जुगराज सिंग (3', 28') आणि सुखविंदर (29') यांनी गोल केले. ओमानकडून फवाद अल लवाटी (16') आणि राशीद अल फझारी (18') यांनी गोल केले.