भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मानंतर रवींद्र जडेजानेही भारत आणि इंग्लंड यांच्यातील तिसऱ्या कसोटीच्या पहिल्या दिवशी शतक पूर्ण केले. कठीण परिस्थितीत फलंदाजीसाठी आलेल्या रवींद्र जडेजाने कर्णधार रोहित शर्मासह पहिल्यांदा भारतीय डावाची धुरा सांभाळली.
त्यानंतर जडेजाने कसोटी कारकिर्दीतील चौथे शतक झळकावले. जडेजा फलंदाजीला आला तेव्हा भारताने पहिल्या तीन महत्त्वाच्या विकेट्स अवघ्या 33 धावांत गमावल्या होत्या. त्यानंतर रवींद्र जडेजाने रोहित शर्मासोबत 200 हून अधिक धावांची भागीदारी करुन भारताला मजबूत स्थितीत आणले.
दरम्यान, रवींद्र जडेजा अनेक वर्षांपासून निरंजन शाह स्टेडियमवर देशांतर्गत क्रिकेट खेळला आहे. 2018 मध्ये, रवींद्र जडेजानेही भारताच्या दौऱ्यावर असलेल्या वेस्ट इंडिजविरुद्ध नाबाद 100 धावा केल्या होत्या. त्यानंतर राजकोटमध्ये रवींद्र जडेजाचे हे दुसरे बॅक टू बॅक शतक आहे.
त्यावेळी, जडेजाने फलंदाजी आणि गोलंदाजीतही चमकदार कामगिरी केली होती. त्यामुळे भारताने वेस्ट इंडिजचा एक डाव आणि 272 धावांनी पराभव केला होता. रवींद्र जडेजानेही या मैदानावर प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये त्रिशतक झळकावले आहे.
दरम्यान, या कसोटीत शतक पूर्ण केल्यानंतर रवींद्र जडेजाने कसोटी क्रिकेटमध्ये 3000 धावाही पूर्ण केल्या आहेत. या कसोटीपूर्वी त्याने 69 कसोटीत 2893 धावा केल्या होत्या. म्हणजेच 3000 धावा पूर्ण करण्यासाठी त्याला 107 धावांची गरज होती, जी त्याने दिवस संपण्यापूर्वीच गाठली. जडेजाच्या नावावर आता 3003 धावा आहेत आणि त्याने 200 हून अधिक कसोटी विकेट्सही घेतल्या आहेत. कसोटीत 3000 धावा आणि 200 बळी घेणाऱ्या भारतातील काही खेळाडूंपैकी तो आता एक बनला आहे.
सर्वप्रथम कपिल देवबद्दल बोलूया. त्यांनी कसोटी क्रिकेटमध्ये 5248 धावा केल्या आहेत आणि 434 विकेट्सही घेतल्या आहेत. भारताच्या महान कर्णधार आणि अष्टपैलू खेळाडूंमध्ये त्यांची गणना होते. बराच काळ हा विक्रम त्यांच्याच नावावर होता. यानंतर रवी अश्विनने ही कामगिरी केली, ज्याने आतापर्यंत कसोटीत 3271 धावा आणि 499 विकेट्स घेतल्या आहेत. आता रवींद्र जडेजाच्या नावावर 3003 धावा आणि 280 विकेट्स आहेत. भारताचे हे तीन खेळाडू आहेत ज्यांनी ही कामगिरी केली आहे.
जडेजाच्या आजच्या खेळीबद्दल बोलायचे झाल्यास, त्याने 212 चेंडूत 110 धावा केल्या आहेत. यामध्ये त्याने आपल्या बॅटने 9 चौकार आणि 2 षटकार मारले. दिवसाचा खेळ संपेपर्यंत तो नाबाद होता. म्हणजेच आता तिसऱ्या दिवसाचा खेळ सुरु झाल्यावर ते 110 धावांची ही इनिंग आणखी मोठी करतील, अशी अपेक्षा करायला हवी. सर्फराज बाद झाल्यानंतर कुलदीप यादवला नाईटवॉच मॅन म्हणून पाठवण्यात आले, जो 10 चेंडूत एक धाव घेत नाबाद आहे. दुसऱ्या दिवशी भारतीय संघ आणखी किती धावा करतो हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.
जडेजाआधी कर्णधार रोहित शर्मानेही शतक झळकावले. रोहित शर्माने आपल्या शतकी खेळीत 196 चेंडूंचा सामना करत 131 धावा केल्या. रोहितने आपल्या खेळीत 14 चौकार आणि 3 शतके ठोकली. रोहित शर्माच्या कसोटी कारकिर्दीतील हे 11वे शतक ठरले. कसोटी कर्णधार म्हणून रोहित शर्माचे कसोटी कारकिर्दीतील हे तिसरे शतक आहे. रोहित शर्माला 131 धावांवर मार्क वुडने त्याचा बळी बनवले. वास्तविक, मार्क वुडच्या शॉर्ट बॉलवर मोठा शॉट खेळत असताना रोहित शर्माने बेन स्टोक्सला झेल दिला.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.