

8th Pay Commission Latest Updates: केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी 8व्या वेतन आयोगाची प्रतीक्षा आता संपत आली आहे. 1 जानेवारी 2026 पासून हा नवा वेतन आयोग लागू होण्याची शक्यता असली तरी प्रत्यक्षात त्याचा लाभ मिळण्यासाठी सरकारी प्रक्रियेमुळे थोडा वेळ लागू शकतो. सध्या 10 लाखांहून अधिक केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारक 7व्या वेतन आयोगाच्या संरचनेनुसार वेतन घेत आहेत.
नवीन वेतन आराखडा मंजूर होऊन त्याची अधिसूचना निघेपर्यंत हीच स्थिती कायम राहील. वेतनवाढ, पेन्शनमधील (Pension) बदल आणि फिटमेंट फॅक्टरबाबत कर्मचाऱ्यांच्या अपेक्षा उंचावल्या आहेत, मात्र सर्वांनाच या आयोगाचा फायदा होईल असे नाही. काही ठराविक श्रेणीतील कर्मचाऱ्यांना या नव्या वेतन संरचनेतून बाहेर ठेवले जाऊ शकते.
सर्वात महत्त्वाचे म्हणजे, 8व्या वेतन आयोगाच्या शिफारसी केवळ केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांसाठी लागू असतात. त्यामुळे खासगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांचा याच्याशी कोणताही संबंध नसून त्यांना याचा फायदा मिळणार नाही. त्याचप्रमाणे, केंद्र सरकारमध्ये कंत्राटी किंवा तात्पुरत्या स्वरुपात काम करणारे कर्मचारी, जे केंद्रीय नागरी सेवा नियमांतर्गत येत नाहीत, त्यांनाही या वेतनवाढीचा थेट लाभ मिळण्याची शक्यता कमी आहे. स्वायत्त संस्थांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या बाबतीत जर त्यांची संस्था केंद्र सरकारच्या वेतन नियमांचे पालन करत असेल, तरच त्यांना हे फायदे मिळतील.
सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम म्हणजेच पीएसयू (PSUs) मधील कर्मचारी देखील 8व्या वेतन आयोगाच्या कक्षेत येत नाहीत. या संस्थांची स्वतःची वेगळी वेतन संरचना असते. जोपर्यंत संबंधित पीएसयू व्यवस्थापन केंद्रीय वेतन आयोगाच्या शिफारसी स्वीकारण्याचा निर्णय घेत नाही, तोपर्यंत तिथल्या कर्मचाऱ्यांना पगारवाढ मिळणार नाही. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या बाबतीत सांगायचे तर, उत्तर प्रदेश, बिहार किंवा महाराष्ट्र सारख्या राज्यांचे कर्मचारी थेट या आयोगाचे लाभार्थी नसतात. जेव्हा संबंधित राज्य सरकार केंद्रीय आयोगाच्या शिफारसी स्वीकारण्याचा आणि लागू करण्याचा निर्णय घेते, तेव्हाच राज्य कर्मचाऱ्यांना लाभ मिळतो. सहसा केंद्रात लागू झाल्यानंतर 6 महिने ते 1 वर्षाच्या कालावधीनंतर राज्यांमध्ये ही अंमलबजावणी होते.
त्याचवेळी पेन्शनधारकांबाबत मध्यंतरी एक अफवा पसरली होती की, जानेवारी 2026 पूर्वी निवृत्त झालेल्यांना याचा लाभ मिळणार नाही. मात्र, सरकारने आणि पीआयबी फॅक्ट चेकने हे स्पष्ट केले की, 8व्या वेतन आयोगाच्या अटींमध्ये पेन्शन सुधारणेचा समावेश आहे. केवळ अशा निवृत्त कर्मचाऱ्यांना यातून वगळले जाईल, ज्यांना शिस्तभंग किंवा गैरवर्तणुकीमुळे सेवेतून बडतर्फ करण्यात आले होते. थोडक्यात सांगायचे तर, 8वा वेतन आयोग मुख्यत्वे केंद्रीय नागरी सेवा कर्मचारी आणि संरक्षण दलातील कर्मचाऱ्यांसाठी आहे जे 7व्या वेतन आयोगाच्या पे-मॅट्रिक्समध्ये येतात. जे कर्मचारी या यादीत बसत नाहीत, त्यांच्या पगारातील वाढ ही त्यांच्या संस्थेच्या स्वतःच्या नियमांवर अवलंबून असेल.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.