Neeraj Chopra Support to Wrestler Protest: भारतातील स्टार कुस्तीपटूंनी केलेले अंदोलन रोज वेगळे वळण घेताना दिसत आहे. 23 एप्रिलपासून जंतर-मंतरवर भारतीय कुस्तीपटू अंदोलन करत आहेत.
त्यांनी भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष आणि भाजप नेचे ब्रीजभूषण सिंग यांच्यावर लैंगिक शोषणाचा गंभीर आरोप केला असून त्याचप्रकरणात न्याय मिळावा म्हणून भारतीय कुस्तीपटू आंदोलन करत आहेत.
आंदोलन करणाऱ्या कुस्तीपटूंमध्ये बजरंग पुनीया, विनेश फोगट, साक्षी मलिक अशा स्टार खेळाडूंचा समावेश आहे. आता त्यांना भारताचा ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेत्या नीरज चोप्राचाही पाठिंबा मिळाला आहे. नीरजने शुक्रवारी याप्रकरणावर ट्वीट करत त्वरित तपास करण्याची विनंती केली आहे.
नीरजने ट्वीट केले आहे की 'मला हे पाहून वाईट वाटत आहे की आपले खेळाडू अशाप्रकारे रस्त्यावर उतरून न्याय मागत आहेत. त्यांनी खूप मेहनत केली आहे आणि आपल्या देशाला गौरवाचे क्षण दिले आहेत.
एक राष्ट्र म्हणून आपली जबाबदारी आहे की प्रत्येक व्यक्तीच्या प्रतिष्ठेचे रक्षण करणे, मग तो खेळाडू असो वा नसो. जे होत आहे, ते व्हायला नाही पाहिजे. हा खूप संवेदनशील मुद्दा आहे आणि याप्रकरणाची निष्पक्ष तपासणी झाली पाहिजे. न्याय मिळण्यासाठी लवकरात लवकर पाऊले उचलली गेली पाहिजेत.'
याआधीही कुस्तीपटूंना विविध खेळाडूंचा पाठिंबा मिळाला आहे. यापूर्वी भारताचा पहिला वैयक्तिक ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता अभिनव बिंद्रा याने देखील सोशल मीडियावर पोस्ट करत कुस्तीपटूंना पाठिंबा दिला होता.
त्याने ट्वीट केले होते की 'एक खेळाडू म्हणून आम्ही आंतरराष्ट्रीय स्तरावर देशाचे प्रतिनिधित्व करण्यासाठी प्रत्येक दिवशी खूप मेहनत घेतो. भारतीय कुस्ती प्रशासनामध्ये छळाच्या आरोप झाला असून त्यासाठी आपल्या खेळाडूंना रस्त्यावर उतरून आंदोलन करणे आवश्यक वाटणे ही अत्यंत चिंतेची बाब आहे.'
दरम्यान, भारतीय ऑलिम्पिक असोसिएशन अध्यक्ष पी.टी उषा यांनी कुस्तीपटूंनी बेशिस्तपणे हे आंदोलन करत असल्याचे म्हटले आहे. त्यांनी म्हटले होते की लैंगिक शोषणाच्या विरोधात कारवाईसाठी भारतीय ऑलिम्पिक असोसिएशकडे एक कमिटी आहे.
जर त्यांना कोणती समस्या आहे, तर त्यांनी आमच्याकडे यायला हवे होते, आमच्याशी चर्चा करायला हवी होती. आमच्याकडे येण्याऐवजी ते रस्त्यावर उतरले, जे खेळासाठी चांगले नाही. तसेच यामुळे देशाची प्रतिमाही खराब होत आहे.
पण पी.टी उषा यांच्या टीकेवर कुस्तीपटूंनी नाराजी व्यक्त केली असून त्यांच्याकडून ही अपेक्षा नसल्याचे म्हटले आहे.
दरम्यान, गुरुवारी भारतीय ऑलिम्पिक असोसिएशनच्या कार्यकारी समीतीच्या बैठकीनंतर भारतीय कुस्ती महासंघाला चालवण्यासाठी तीन सदस्ययी पॅनल तयार करण्यात येणार असल्याचेही घोषित करण्यात आले आहे.
यामध्ये माजी नेमबाज सुमा शिरूर, भारतीय वुशू असोसिएशनचे अध्यक्ष भुपेंद्र सिंग बाजवा आणि उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधिश हे सदस्य असतील.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.