Rohit Sharma confession on Absence of Senior Fast Bowlers for West Indies Tour: भारतीय क्रिकेट संघाच्या वेगवान गोलंदाजीची मदार काही वर्षांपूर्वी जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, उमेश यादव आणि इशांत शर्मा अशा गोलंदाजांवर होती. पण सध्या बुमराह आणि उमेश दुखापतग्रस्त आहेत. शमीला विश्रांती देण्यात आली आहे, तर इशांत जवळपास दोन वर्षापासून संघातून बाहेर आहे.
त्यामुळे सध्या वेस्ट इंडिज दौऱ्यावर असलेल्या भारतीय कसोटी संघाच्या वेगवान गोलंदाजीची धूरा सांभाळण्याची जबाबदारी मोहम्मद सिराजवर आहे. दरम्यान, संघात सिराजव्यतिरिक्त फारसा अनुभव असलेला वेगवान गोलंदाज नाही. त्याच पार्श्वभूमीवर भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माने वेस्ट इंडिजविरुद्धच्या मालिकेपूर्वी मोठे भाष्य केले आहे.
सध्या वेस्ट इंडिज दौऱ्यावर आलेल्या भारतीय संघाच्या वेगवान गोलंदाजांच्या फळीत मोहम्मद सिराज, शार्दुल ठाकूर, मुकेश कुमार, नवदीप सैनी आणि जयदेव उनाडकट या गोलंदाजांचा समावेश आहे.
आम्ही वेगवान गोलंदाजांना इथे विकेट्स घेताना पाहिले आहे. पण सत्य हे आहे की खेळाडू दुखापतग्रस्त होत आहेत. आम्हाला खेळाडूंना रोटेट करावे लागत आहे. आमच्याकडे वेगवान गोलंदाजांची लाईन लागलेली नाही. आमच्या अनेक खेळाडूंना दुखापत आहे. त्यामुळे आमच्याकडे जे गोलंदाज उपलब्ध आहेत, त्यांना आम्हाला मॅनेज करावे लागणार आहे. त्यामुळे आमचे अनुभवी खेळाडू या दौऱ्यात उपलब्ध राहू शकलेले नाहीत.रोहित शर्मा, भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार
तसेच रोहितने सध्याच्या गोलंदाजी फळीवर विश्वासही दाखवला आहे. तो म्हणाला, 'मला आमच्या नव्या खेळाडूंवरही पूर्ण विश्वास आहे. जयदेव 10-12 वर्षे खेळत आहे. मुकेश कुमारनेही देशांतर्गत क्रिकेटमध्ये सातत्याने चांगली कामगिरी केली आहे. त्याने त्याच्या राज्यासाठी आणि विभागासाठी चांगली कामगिरी केली आहे. आम्ही कोणच्या संमिश्रणासह जायचे याचा विचार करू.'
'भारतीय क्रिकेटमध्ये हे आव्हान नेगमीच असणार आहे, कारण आम्ही खूप खेळतो. त्यामुळे आम्हाला खेळाडूंना मॅनेज करावे लागते, रोटेट करावे लागते. त्यांना ताजेतवाने राहण्यासाठी पुरेशी विश्रांतीही द्यावी लागते.'
तसेच रोहित म्हणाला, 'आम्ही केवळ एका मालिकेवर लक्ष केंद्रित करण्याची चैन करू शकत नाही. आम्हाला भविष्याचाही विचार करावा लागतो. वर्ल्डकप येत आहे आणि आम्हाला पाहावे लागेल की त्या स्पर्धेसाठी आम्हाला कोणत्या खेळाडूंची गरज आहे.'
'वेगळ्या बाजूने विचार झाला, तर अनेक खेळाडूंना संघात संधी मिळत आहे, ही चांगली गोष्ट आहे. आम्ही बेंच स्ट्रेंथ तयार करत आहोत. आम्ही त्याच त्याच खेळाडूंना घेऊन वर्षानुवर्षे खेळू शकत नाही.'
दरम्यान, भारतीय संघ या वेस्ट इंडिज दौऱ्यात कसोटी, टी20 आणि वनडे अशा तिन्ही प्रकारच्या मालिका खेळणार असून 12 जुलैपासून कसोटी मालिकेला सुरुवात होणार आहे. कसोटी मालिकेतील पहिला सामना डॉमिनिकाला खेळवला जाणार आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.