

फोंडा: फोंडा तालुक्यात १० लाख चौरस मीटर जमिनीचे भूरूपांतर करण्याचा प्रयत्न चालला आहे. या जमिनी बहुतांश राजकारण्यांच्याच असून त्यांचाच या भूरूपांतरणासाठी आग्रह आहे. राज्यातील १५ आमदारांनी भूरूपांतरणासाठी अर्ज केले असून गोव्याच्या जमिनींचा हा खुलेआम लिलाव आहे, अशी घणाघाती टीका न्या. फर्दिन रिबेलो यांनी फोंडा येथील जाहीर सभेत केली.
फोंड्यातील सावित्री सभागृहात आज ‘इनफ इज इनफ’ची जाहीर सभा आयोजित केली होती. यावेळी व्यासपीठावर हृदयनाथ शिरोडकर, स्वाती केरकर, संजय नाईक, देविदास आमोणकर आणि मान्यवर उपस्थित होते.
रिबेलो म्हणाले की, गोवा सुरक्षित राखण्यासाठी, तसेच ही भूमी पुढील गोमंतकीय पिढीपर्यंत सांभाळून ठेवण्यासाठी आम्ही आंदोलन छेडले आहे. हे आंदोलन हिंसक नव्हे, तर सत्याच्या मार्गाने जाणारे आहे.
या आंदोलनाला गोमंतकीयांनी जर साथ दिली तर निश्चितच गोवा आम्ही अबाधित राखू शकतो. गोमंतकीयांचा विकासाला अजिबात विरोध नाही; पण हा विकास कुणासाठी आणि कशासाठी, याचे उत्तर गोमंतकीयांना हवे आहे.
गोव्याच्या नैसर्गिक साधनसंपत्तीचा ऱ्हास करून बिगर गोमंतकीयांना जर साधनसुविधा उपलब्ध करण्याचा सरकारचा प्रयत्न असेल तर आमचा त्याला पूर्ण विरोध आहे. हा विकास नव्हे, तर रियल इस्टेट विकास आहे.
तोसुद्धा बिगर गोमंतकीयांच्या हितासाठी. म्हणून गोमंतकीयांनो जागे व्हा आणि आपल्या हक्कासाठी, गोव्याची समृद्धता राखण्यासाठी, पुढील पिढीकडे गोवा सुखरूप सोपविण्यासाठी कटिबद्ध होऊया, असे आवाहन रिबेलो यांनी केले.
आज पैशांसाठी गोव्याच्या जमिनींचे बेकायदा रूपांतर केले जात आहे. त्यासाठी फसवे कायदे केले जात असून गोमंतकीयांच्या नाकावर टिच्चून जमिनींचे रूपांतर करण्यात येत आहे. हे रोखण्यासाठी आम्ही सरकारला निवेदन दिले आहे. या निवेदनावरील मागण्या सरकारने मान्य केल्या तर ठीक. अन्यथा या आंदोलनात प्रत्येकाने सहभागी व्हावे आणि गोवा वाचविण्यासाठी सहकार्य करावे, असे रिबेलो म्हणाले.
यावेळी स्वाती केरकर, हृदयनाथ शिरोडकर, संजय नाईक, देविदास आमोणकर, संदीप पारकर, युगांक नाईक, देवेंद्र च्यारी, रिवा पिरिस, सच्चित पालकर, राजाराम पालकर, राजदीप नाईक व इतरांनी, ‘आता जागृत होऊया आणि ‘इनफ ईज इनफ’च्या आंदोलनात सहभागी होऊन गोवा वाचवूया’, असे आवाहन केले. सूत्रसंचालन विराज सप्रे यांनी केले.
मांडवी नदीत पूर्वी फक्त सत्तर प्रवाशांची क्षमता असलेल्या कॅसिनोचा परवाना संपल्यानंतर आता त्याजागी दोन हजार प्रवाशांची क्षमता असलेला कॅसिनो येत आहे. त्यासंबंधीचे सर्व पुरावे माझ्याकडे आहेत. मात्र, सरकार म्हणते आम्ही कॅसिनो आणणारच नाही. हा खोटारडेपणा आहे, गोमंतकीयांची दिशाभूल आहे, असे रिबेलो म्हणाले.
गोमंतकीयांना पुरेसे पाणी हवे आहे. त्यासाठी जलवाहिनी घालण्यास लोकांचा विरोध नाही; पण या जलवाहिन्या घालून कुणाला पाणीपुरवठा करणार, असा सवाल रिबेलो यांनी केला. ग्रामस्थांच्या तोंडचे पाणी पळवून तुम्ही औद्योगिक वसाहती आणि मोठ्या निवासी संकुलांना देणार असाल तर गावकऱ्यांनी काय करायचे, असा प्रश्न रिबेलो यांनी केला. मीराबाग बंधाऱ्याचा मोठा फटका तेथील ग्रामस्थांना बसणार आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.