IND vs WI 2nd ODI Shubman Gill double century Dainik Gomantak
क्रीडा

IND vs WI: शुभमन गिलचं द्विशतक, रोहित शर्माची शतकी खेळी अन् भारताचा दणदणीत विजय; तरीही गौतम गंभीर खूश नाही, कारण काय?

Gautam Gambhir reaction to Guwahati pitch: भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील गुवाहाटी वनडे सामना धावांच्या पावसामुळे क्रिकेट चाहत्यांच्या चांगलाच लक्षात राहणार आहे.

Sameer Amunekar

Gautam Gambhir unhappy after India win: भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील गुवाहाटी वनडे सामना धावांच्या पावसामुळे क्रिकेट चाहत्यांच्या चांगलाच लक्षात राहणार आहे. वेस्ट इंडिजने प्रथम फलंदाजी करताना 405 धावा केल्या, तर भारताने हे विशाल लक्ष्य अवघ्या 43.3 षटकांत 2 विकेट्स गमावून पार केले. सामन्यात दोन्ही संघांनी मिळून तब्बल 811 धावा केल्या. शुभमन गिलने नाबाद 223 धावांची विक्रमी खेळी केली, तर रोहित शर्मानेही शतक ठोकले.

भारताने 8 विकेट्सने विजय मिळवत तीन सामन्यांच्या मालिकेत 2-0 अशी आघाडी घेतली. मात्र, या ऐतिहासिक विजयाने टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर पूर्णपणे समाधानी दिसले नाहीत. सामन्यानंतर त्यांनी गुवाहाटीच्या खेळपट्टीवरच प्रश्न उपस्थित करत फलंदाज आणि गोलंदाज यांच्यातील समतोलाची गरज व्यक्त केली.

सामन्यानंतर ब्रॉडकास्टरशी बोलताना गंभीर यांनी स्पष्ट शब्दांत आपली नाराजी व्यक्त केली. त्यांच्या मते, क्रिकेटमध्ये फलंदाज आणि गोलंदाज यांच्यात पुरेसा संघर्ष दिसणे गरजेचे आहे. गुवाहाटीतील खेळपट्टीवर मात्र गोलंदाजांसाठी फारसे काही उपलब्ध नव्हते.

गंभीर यांच्या म्हणण्यानुसार, अशा खेळपट्टीवर एखादा युवा गोलंदाज गोलंदाजी करत असेल आणि प्रतिस्पर्धी संघ 400 धावा करत असेल, त्यानंतर दुसरा संघही सहज 400 धावांचा पाठलाग करत असेल, तर आकडेवारी आणि प्रेक्षकांच्या मनोरंजनाच्या दृष्टीने तो सामना शानदार ठरतो. मात्र प्रशिक्षक आणि क्रिकेटप्रेमी म्हणून गोलंदाजांचाही विचार करणे आवश्यक आहे.

वेस्ट इंडिजने उभारला 405 धावांचा डोंगर

भारताने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र वेस्ट इंडिजच्या फलंदाजांनी भारतीय गोलंदाजांवर सुरुवातीपासून दबाव निर्माण केला. जॉन कॅम्पबेल आणि शाई होप यांनी 110 धावांची भागीदारी करत मोठ्या धावसंख्येचा पाया रचला.

कॅम्पबेल आणि होप यांनी शतके झळकावली, तर आमिर जंगूनेही शतकी खेळी केली. त्यामुळे वेस्ट इंडिजने 50 षटकांत 7 विकेट्स गमावून 405 धावा केल्या.

रोहित-गिलने 255 धावांची सलामी दिली

406 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारताने सुरुवातीपासूनच आक्रमक फलंदाजी केली. रोहित शर्मा आणि कर्णधार शुभमन गिल यांनी पहिल्या विकेटसाठी 255 धावांची भागीदारी केली. रोहितने 101 धावांची शानदार खेळी केली.

रोहित बाद झाल्यानंतरही गिलचा धडाका सुरूच राहिला. त्याने अवघ्या 133 चेंडूंमध्ये नाबाद 223 धावा करत भारताला विक्रमी विजय मिळवून दिला. भारताने 43.3 षटकांत 406 धावा करत सामना 8 विकेट्सने जिंकला. हा भारताचा वनडे क्रिकेटमधील सर्वात मोठ्या यशस्वी धावांचा पाठलाग ठरला.

गंभीर यांनी पुढे सांगितले की, आधुनिक वनडे क्रिकेटमध्ये गोलंदाजांसमोर आधीच अनेक आव्हाने आहेत. अशा परिस्थितीत खेळपट्टीवरही जर गोलंदाजांसाठी कोणतीही मदत नसेल, तर त्यांच्यासाठी परिस्थिती आणखी कठीण होते.

त्यांच्या मते, गोलंदाजांना काम करण्यासाठी काहीतरी मिळाले पाहिजे. केवळ फलंदाजांना अनुकूल परिस्थिती तयार झाल्यास गोलंदाजांच्या कामगिरीचे योग्य मूल्यमापन करणेही अवघड होते.

खराब आकडे म्हणजे नेहमीच खराब गोलंदाजी नाही

गंभीर यांनी गोलंदाजांच्या आकडेवारीबाबतही महत्त्वाचे भाष्य केले. एखाद्या गोलंदाजाने सामन्यात भरपूर धावा दिल्या असतील, तर त्याच्या आकडेवारीवरून तो खराब गोलंदाजी करत होता, असा निष्कर्ष काढणे योग्य नाही, असे त्यांनी सांगितले.

फलंदाजांना अनुकूल असलेल्या खेळपट्टीवर गोलंदाजाने चांगली योजना राबवली तरी त्याच्या आकडेवारीवर त्याचा परिणाम होऊ शकतो. त्यामुळे प्रशिक्षकांनी केवळ आकडे न पाहता गोलंदाजाने आपली योजना आणि कौशल्य योग्य पद्धतीने वापरले की नाही, याचाही विचार करायला हवा, असे गंभीर यांनी स्पष्ट केले.

आकिब नबी आणि गुरनूर बरारचे उदाहरण

गंभीर यांनी युवा गोलंदाज आकिब नबीचे उदाहरणही दिले. पदार्पणाच्या सामन्यात त्याने 8.5 षटके गोलंदाजी करताना 84 धावा दिल्या आणि त्याला एकही विकेट मिळाली नाही. मात्र अशा फलंदाजीला अनुकूल परिस्थितीत त्याला दोष देण्याऐवजी त्याला पाठिंबा देण्याची गरज असल्याचे गंभीर यांनी सांगितले.

गुरनूर बरारबाबत बोलताना त्यांनी कठीण परिस्थितीत गोलंदाजी करण्याचा अनुभव युवा खेळाडूंसाठी महत्त्वाचा असल्याचे सांगितले. सुरुवातीच्या 10 षटकांमध्ये आणि डेथ ओव्हर्समध्ये दबावाखाली गोलंदाजी करण्याची संधी मिळणे त्यांच्या विकासासाठी उपयुक्त ठरू शकते.

811 धावांचा सामना, पण गंभीर म्हणतो...

गुवाहाटीतील सामन्यात 811 धावा झाल्या आणि पाच शतके झळकली. हा सामना वनडे क्रिकेटमधील सर्वाधिक धावसंख्या असलेल्या सामन्यांपैकी एक ठरला. मात्र या धावांच्या विक्रमापेक्षा गंभीर यांचे लक्ष खेळातील समतोलाकडे होते.

भारताने मालिका 2-0 अशी खिशात घातली असली तरी आगामी मोठ्या स्पर्धांसाठी युवा गोलंदाजांना तयार करताना त्यांना वेगवेगळ्या परिस्थितीत खेळण्याची संधी देणे आणि फलंदाज-गोलंदाज यांच्यात योग्य समतोल असलेल्या खेळपट्ट्या मिळणे, हा मुद्दा गंभीर यांच्या वक्तव्यातून अधोरेखित झाला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Guru Gochar 2026: नशिबाची साथ अन् छप्परफाड धनलाभ! गुरु गोचरमुळे कोट्यधीश होण्याचा योग; 31 ऑक्टोबरपासून 'या' 3 राशींच्या हातात खेळणार पैसा

Aadhaar Card Email Update: आधार कार्डधारकांसाठी खूशखबर! 31 डिसेंबरपर्यंत मिळणार मोफत ईमेल अपडेटची सुविधा; UIDAI चा मोठा निर्णय

Viral Video: बीचवर आई-वडील रील्स करण्यात मग्न अन् चिमुरडी थेट लाटेच्या तावडीत... पुढं जे झालं ते तुम्हीच बघा?

Hardik Pandya Injury Update: टीम इंडियाला मोठा झटका! हार्दिक पांड्या गंभीर दुखापतीमुळे पुढील सहा महिने मैदानाबाहेर; आता 2027 मध्ये होणार पुनरागमन

Goa Unity Ride: गोव्यात 'युनिटी राइड'चे उत्साहात स्वागत; राष्ट्रीय एकात्मतेसह अमलीपदार्थमुक्त भारताचा संदेश!

SCROLL FOR NEXT