भारत आणि पाकिस्तानचा क्रिकेट सामना हा नेहमीच चर्चेचा विषय असतो. भारतीय खेळाडू अर्शदीप सिंगने रविवारी आशिया चषकात पाकिस्तानविरुद्ध एक महत्त्वाचा झेल सोडला. 18व्या षटकातील तिसऱ्या चेंडूवर त्याने आसिफ अलीचा झेल सोडला. त्यानंतर आसिफने 8 चेंडूत 16 धावा करत पाकिस्तानला विजयाच्या उंबरठ्यावर नेले.
अर्शदीपच्या या मिसफिल्डिंगमुळे भारताने सामन्यात पुनरागमनाची चांगली संधी गमावली. भारताच्या पराभवाचे हे एक प्रमुख कारण होते. मात्र, सामन्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत विराट कोहली या युवा वेगवान गोलंदाजाच्या समर्थनार्थ बोलला.
विराट म्हणाला, 'जेव्हा मी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये पाकिस्तानविरुद्ध माझा पहिला सामना खेळत होतो, तेव्हा मीही खराब शॉट खेळून आऊट झालो होतो. दबावाखाली कोणीही चूक करू शकतो. संघातील वातावरण सध्या चांगलेच आहे. याचे श्रेय संघ व्यवस्थापन आणि कर्णधाराला जाते. अर्शदीपला त्याची चूक समजून घ्यावी लागेल जेणेकरुन तो पुढच्या वेळी दबावाच्या परिस्थितीत चांगली कामगिरी करू शकेल.
मोहम्मद नवाजचा डाव गेम चेंजर
यादरम्यान कोहलीने मोहम्मद नवाजच्या 20 चेंडूत 42 धावांच्या खेळीला गेम चेंजर म्हटले. “त्याला फलंदाजीला पाठवून एक संधी साधली गेली, जी पाकिस्तानसाठी योग्य ठरली. अशी प्रभावी खेळी खेळणे ही मोठी गोष्ट आहे. त्याचा डाव 15-20 धावांपर्यंत मर्यादित राहिला असता तर परिस्थिती खूप बदलू शकली असती.
'मध्यभागी विकेट गमावल्यामुळे 200 पर्यंत पोहोचू शकलो नाही'
पुढे विराट म्हणाला, 'आम्ही ज्या पद्धतीने खेळत आहोत, आम्हाला हवे तसे निकाल मिळत आहेत. आमचा मिडल ओव्हर रन रेट सुधारत आहे. परंतु काहीवेळा गोष्टी आपल्याला पाहिजे त्याप्रमाणे नसतात. मधल्या षटकात आम्ही काही विकेट गमावल्या आणि त्यामुळे आम्ही 200 धावांपर्यंत पोहोचू शकलो नाही. त्या स्थितीत जर आमच्याकडे जास्त विकेट असत्या तर आम्ही जास्त धावा करू शकलो असतो.
पाकिस्तान 5 विकेट्सने जिंकला
या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना भारताने रोहित शर्मा (28), केएल राहुल (28) आणि विराट कोहली (60) यांच्या दमदार खेळीमुळे 7 गडी गमावून 181 धावा केल्या. प्रत्युत्तरात पाकिस्तान संघाने मोहम्मद रिझवान (71) आणि मोहम्मद नवाज (42) यांच्या शानदार फलंदाजीच्या जोरावर विजय मिळवला. पाकिस्तानने हा सामना एक चेंडू बाकी असताना जिंकला.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.