Indian Super League Winner Hyderabad FC Dainik Gomantak
क्रीडा

Indian Super League : गोलरक्षक लक्ष्मीकांतच्या पेनल्टी शूटआऊटवर हैदराबाद विजयी

अंतिम लढतीत पेनल्टीवर तीन फटके अडविले, केरळा ब्लास्टर्सचा तिसऱ्यांदा स्वप्नभंग

Kishor Petkar

पणजी : अनुभवी गोलरक्षक लक्ष्मीकांत कट्टीमनी याने पेनल्टी शूटआऊटवर तीन फटके अडवत हैदराबाद एफसीला प्रथमच इंडियन सुपर लीग (आयएसएल) करंडक जिंकून देण्यात मोलाचा वाटा उचलला. 1-1 गोलबरोबरीनंतर पेनल्टी शूटआऊटवर 3-1 फरकाने हार पत्करल्यामुळे केरळा ब्लास्टर्सला तिसऱ्यांदा उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. रंगतदार ठरलेला अंतिम सामना रविवारी फातोर्डा येथील पंडित जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर झाला.

निर्धारित नव्वद, तसेच अतिरिक्त वेळेतील तीस मिळून 120 मिनिटे 1-1 बरोबरी कायम राहिली. के. पी. राहुलने गोलशून्य बरोबरीची कोंडी 68व्या मिनिटास वेगवान फटक्याद्वारे फोडली आणि केरळा ब्लास्टर्सला (Kerala Blasters) आघाडी मिळवून दिली. त्यानंतर 88व्या मिनिटास प्रेक्षणीय गोलवर बदली खेळाडू साहिल ताव्होरा याने हैदराबादला बरोबरी साधून दिली आणि केरळा ब्लास्टर्सच्या उत्साहावर विरजण पडले. 71व्या मिनिटास सौविक चक्रवर्तीच्या जागी मैदानात आलेल्या 26 वर्षीय गोमंतकीय मध्यरक्षकाने प्रतिस्पर्ध्यांची आघाडी भेदली.

पेनल्टी शूटआऊटमध्ये 32 वर्षीय कट्टीमनी याने फटक्यांचा अचूक नेम बांधत अनुक्रमे मार्को लेस्कोविच, निशू कुमार, जिक्सन सिंग यांचे फटके अडविले, त्यामुळे 2014 व 2016 नंतर तिसऱ्यांदा केरळा ब्लास्टर्सचा अंतिम लढतीत स्वप्नभंग झाला. केरळा ब्लास्टर्सच्या फक्त आयुष अधिकारी यालाच कट्टमनीचा बचाव भेदता आला. हैदराबादतर्फे (Hyderabad FC) जुवाव व्हिक्टर, खासा कामारा व हालिचरण नरझारी यांनी गोलरक्षक प्रभसुखन गिल याला चकवून फटक्यास अचूक दिशा दाखविली. हावियर सिव्हेरियो याने दिशाहीन फटका मारला.

निर्धारित वेळेत गोलबरोबरी

थ्रिसूर येथील 22 वर्षीय राहुलने ताकदवान फटक्यावर हैदराबादचा गोलरक्षक लक्ष्मीकांत कट्टीमनी यास चकवा दिला. लक्ष्मीकांत चेंडू अडविण्यासाठी आटोकाट प्रयत्न केले, पण त्याला यश लाभले नाही. राहुलचा हा मोसमातील पहिलाच गोल ठरला. स्पॅनिश अल्वारो वाझकेझने रचलेल्या चालीवर राहुलकडे चेंडू आल्यानंतर त्याने हैदराबादच्या बचावपटूंना दाद न देता जोरदार फटका मारला व त्यात त्याला यशही प्राप्त झाले. वीस मिनिटानंतर गोमंतकीय मध्यरक्षक साहिल ताव्होराचा खोलवरील व्हॉली फटका रोखणे केरळा ब्लास्टर्सच्या गोलरक्षकास रोखणे शक्य झाले नाही. पूर्वार्धात दोन्ही संघांना गोल करण्यात अपयश आले होते. विश्रांतीला सहा मिनिटे बाकी असताना अल्वारो वाझकेझ याचा चांगला प्रयत्न क्रॉसबारला आपटल्यामुळे केरळा ब्लास्टर्सची आघाडी संधी हुकली. पूर्वार्धातील भरपाई वेळेत हैदराबादचा बदली खेळाडू हावियर सिव्हेरियो याचा धोकादायक हेडर गोलरक्षक प्रभसुखन गिल याने वेळीच रोखून केरळा ब्लास्टर्सवरील संकट टाळले. 76व्या मिनिटास केरळा ब्लास्टर्सचा गोलरक्षक प्रभसुखन याच्या अफलातून एकाग्रतेमुळे हैदराबादचा बार्थोलोम्यू ओगबेचे फ्रीकिक फटक्यावर गोल नोंदवू शकला नाही.

तिसऱ्यांदा फायनल अतिरिक्त वेळेत

आयएसएल (ISL) स्पर्धेच्या इतिहासात तिसऱ्यांदा विजेतेपदाचा सामना अतिरिक्त वेळेत गेला. यापूर्वी 2016 मध्ये कोची येथे एटीके संघाने पेनल्टी शूटआऊटवर केरळा ब्लास्टर्सला हरविले होते, तर 2018-19 मध्ये मुंबई (Mumbai) येथे अतिरिक्त वेळेतील गोलमुळे बंगळूर एफसीने एफसी गोवावर मात केली होती.

दोघा चाहत्यांचे अपघाती निधन

आयएसएल अंतिम सामन्यासाठी केरळहून दुचाकीवरून गोव्याला निघालेल्या केरळा ब्लास्टर्सच्या दोघा युवा चाहत्यांचे रविवारी सकाळी अपघाती (Accident) निधन झाले. ए. के. शिबिल ( 20) व पी. टी. मुहम्मद जमशिर (22) हे मल्लपुरम शहरानजीकच्या चेरुकुन्नू गावातील दोघे युवक मडगाव येण्यासाठी दुचाकीवरून निघाले होते. केरळमधील कासारागोड जिल्हातील उदमा येथे त्यांच्या दुचाकीला मिनी ट्रकची धडक बसली. इस्पितळात दाखल केल्यानंतर त्यांना मृत घोषित करण्यात आले. शिबिल हा हैदराबाद एफसीचा विंगर ए. के. अब्दुल राबीह याचा नातेवाईक आहे. दोघा युवा चाहत्यांच्या अपघाती निधनाबद्दल केरळा ब्लास्टर्स संघाने सोशल मीडियाद्वारे तीव्र दुःख व्यक्त करून त्यांना श्रद्धांजली वाहिली.

स्टेडियमवर ‘पिवळी लाट’

केरळमधून मोठ्या संख्येने केरळा ब्लास्टर्सचे पाठिराखे रविवारी फातोर्ड्यात दाखल झाले. हा संघ यलो जर्सीसाठी ओळखला जातो. त्यामुळे नेहरू स्टेडियमवर संघाच्या चाहत्यामुळे पिवळी लाट उसळलेली पाहायला मिळाली. प्रत्यक्षात सामन्यात केरळा ब्लास्टर्सचे खेळाडू अवे सामना असल्याने काळ्या, तर हैदराबादचे खेळाडू यलो जर्सीत खेळले. अधिकृत आकडेवारीनुसार पंडित जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर 11,500 उपस्थिती होती.

दृष्टिक्षेपात...

- केरळा ब्लास्टर्सच्या के. पी. राहुल याचा मोसमातील 7 लढतीत 1 गोल, एकंदरीत 32 आयएसएल सामन्यांत 5 गोल

- एफसी गोवा, मुंबई सिटीतर्फे खेळलेल्या साहिल ताव्होराचा हैदराबादतर्फे पहिलाच गोल, आयएसएलमध्ये 45 सामन्यांत एकूण 3 गोल

- विजेत्या संघाला 6 कोटी रुपये, तर उपविजेत्या संघाला 3 कोटी रूपये

- यापूर्वी 2014 व 2016 मध्ये केरळा ब्लास्टर्सला उपविजेतेपद, दोन्ही वेळेस एटीके संघाविरुद्ध हार

- 2016 मध्ये केरळा ब्लास्टर्सची अंतिम लढतीत पेनल्टी शूटआऊटवर हार

- यंदा आयएसएल स्पर्धेत सर्वाधिक 18 गोल करणारा हैदराबादचा नायजेरियन बार्थोलोम्यू ओगबेचे अंतिम लढतीत गोलविना

- ओगबेचे सलग दुसऱ्यांदा आयएसएल विजेता, गतमोसमात मुंबई सिटी संघाचा सदस्य

- गोमंतकीय लक्ष्मीकांत कट्टीमनी पहिल्यांदाच आयएसएल विजेता, 2015 साली एफसी गोवा संघात असताना उपविजेता

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Karthik Aaryan In Goa: 'रुह बाबा'नं पुन्हा जिंकलं चाहत्यांचं मन; गोव्यात एन्जॉय करतानाचे फोटो केले शेअर!

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

South Goa Beach: दक्षिण गोव्यातील समुद्र किनाऱ्यांची धूप वृध्दी सुरुच; राष्ट्रीय अभ्यासातून खुलासा!

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांना गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

India Bike Week 2024: चित्तथरारक स्टंट, म्युझिक आणि बरंच काही...; गोव्यातील बाईक इव्हेंटच्या Date, Venue जाणून घ्या

SCROLL FOR NEXT