पणजी: नायजेरियन आघाडीपटू बार्थोलोमेव ओगबेचे (Bartholomew Ogbeche) याने नोंदविलेल्या दोन गोलच्या बळावर हैदराबाद एफसीने (Hyderabad FC) सोमवारी इंडियन सुपर लीग (ISL) फुटबॉल स्पर्धेत धडाका राखला. त्यांनी नॉर्थईस्ट युनायटेडचा (Northeast United) 5-1 फरकाने धुव्वा उडवून यंदाच्या मोसमातील तिसऱ्या विजयाची नोंद केली. ते आता दुसऱ्या स्थानी आले आहेत. सामना बांबोळी येथील ॲथलेटिक स्टेडियमवर झाला. सामन्याच्या 12व्या मिनिटास चिंग्लेनसाना सिंग याने आयएसएल स्पर्धेतील पहिला वैयक्तिक गोल नोंदवून हैदराबादला आघाडी मिळवून दिली. ओगबेचे याने 27व्या मिनिटास संघाची आघाडी वाढविली. 43व्या मिनिटास लाल्डानमाविया राल्टे याने केलेल्या गोलमुळे गुवाहाटीच्या संघाला पिछाडी 1-2 अशी कमी करता आली.
ओगबेचे याने 78व्या मिनिटास आणखी एक गोल करून हैदराबादची स्थिती 3-1 अशी बळकट केली. त्यानंतर हैदराबादच्या ‘सुपरसब’ खेळाडूंनी प्रत्येकी एक गोल केला. रोहित दानूच्या जागी आलेल्या कोल्हापूरच्या अनिकेत जाधव याने 90व्या मिनिटास हैदराबादची आघाडी 4-1 अशी मजबूत केली. अनिकेतचा हा यंदाच्या चार सामन्यातील पहिलाच, तर आयएसएल स्पर्धेत 31 सामन्यांतील एकंदरीत तिसरा गोल ठरला. ओगबेचे याची जागा घेतलेल्या स्पॅनिश हावियर सिव्हेरियो याने 90+3व्या मिनिटास हैदराबादच्या खाती पाचव्या गोलची भर टाकली. 24 वर्षीय आघाडीपटूचा हा पहिलाच आयएसएल गोल ठरला.
हैदराबादची मुसंडी
हैदराबादने पाच लढतीतील तिसरा विजय नोंदविला. त्यांचे आता 10 गुण झाले असून ते गुणतक्त्यात दुसऱ्या स्थानी आले आहेत. अव्वल स्थानावरील मुंबई सिटीपेक्षा त्यांचे फक्त दोन गुण कमी आहेत. नॉर्थईस्टला चौथा पराभव पत्करावा लागला. त्यामुळे सहा लढतीनंतर त्यांचे चार गुण कायम राहिले आणि दहाव्या क्रमांकावर घसरण झाली.
ओगबेचे याने आंगुलोस गाठले
यंदाच्या आयएसएल स्पर्धेत सर्वाधिक गोलच्या गोल्डन बूट शर्यतीत बार्थोलोमेव ओगबेचे याने आता मुंबई सिटीचा स्पॅनिश आघाडीपटू इगोर आंगुलो याला गाठले आहे. दोघांनीही प्रत्येकी पाच गोल नोंदविले आहे. ओगबेचे याने आता आयएसएल स्पर्धेतील 62 सामन्यांत एकूण 40 गोल केले आहेत.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.