Harmanpreet Kaur Captaincy Dainik Gomantak
क्रीडा

टी-20, वनडे आणि कसोटी... हरमनप्रीत कौरने अचानक सोडले सर्व फॉरमॅटचे कर्णधारपद, टीम इंडियाची धुरा आता कोणाकडे? 'या' खेळाडूचं नाव चर्चेत

Harmanpreet Kaur Captaincy: भारतीय महिला क्रिकेटमध्ये मोठा नेतृत्वबदल झाला आहे. अनुभवी फलंदाज आणि भारतीय महिला संघाची कर्णधार हरमनप्रीत कौरने सर्व फॉरमॅटच्या कर्णधारपदावरून पायउतार होण्याचा निर्णय घेतला आहे.

Sameer Amunekar

भारतीय महिला क्रिकेटमध्ये मोठा नेतृत्वबदल झाला आहे. अनुभवी फलंदाज आणि भारतीय महिला संघाची कर्णधार हरमनप्रीत कौरने सर्व फॉरमॅटच्या कर्णधारपदावरून पायउतार होण्याचा निर्णय घेतला आहे. मंगळवारी ६ ऑक्टोबर रोजी तिने सोशल मीडियावर भावनिक पोस्ट करत आपल्या निर्णयाची माहिती दिली. मात्र, कर्णधारपद सोडल्यानंतरही हरमनप्रीत खेळाडू म्हणून भारतीय संघासाठी उपलब्ध राहणार आहे.

एशियन गेम्समध्ये भारताला मिळवून दिले सुवर्णपदक

हरमनप्रीतच्या या निर्णयाची विशेष चर्चा होत आहे, कारण काही दिवसांपूर्वीच तिच्या नेतृत्वाखाली भारतीय महिला संघाने २०२६ आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले होते. अंतिम सामन्यात भारताने श्रीलंकेचा मोठ्या फरकाने पराभव करत महिला क्रिकेटमधील आपले दुसरे आशियाई क्रीडा सुवर्णपदक जिंकले.

या स्पर्धेत स्मृती मंधाना उपकर्णधार होती. त्यामुळे हरमनप्रीतच्या राजीन्यानंतर तिचे नाव पुढील कर्णधारासाठी सर्वाधिक चर्चेत असलेल्या पर्यायांपैकी एक आहे. मात्र, बीसीसीआयकडून नव्या कर्णधाराची अधिकृत घोषणा होणे बाकी आहे.

२०१६पासून कर्णधारपदाची जबाबदारी

हरमनप्रीतने २०१६मध्ये भारतीय टी-२० संघाचे कर्णधारपद स्वीकारले होते. मिताली राजच्या निवृत्तीनंतर २०२२मध्ये तिला वनडे संघाचीही पूर्णवेळ कर्णधार बनवण्यात आले. त्यानंतर २०२३मध्ये तिने तिन्ही फॉरमॅटमध्ये भारतीय संघाचे नेतृत्व केले. जवळपास दशकभराच्या या प्रवासानंतर आता तिने नेतृत्वाची जबाबदारी सोडण्याचा निर्णय घेतला आहे.

‘हा निर्णय घेणं सोपं नव्हतं...’

कर्णधारपद सोडण्याची माहिती देताना हरमनप्रीतने आपल्या पोस्टमध्ये हा निर्णय कठीण असल्याचे म्हटले आहे. संघाचे नेतृत्व करताना आलेले चांगले-वाईट अनुभव, भावनिक क्षण, आव्हाने आणि अनेक त्याग या प्रवासाचा भाग असल्याचे तिने नमूद केले.

संघाला सर्वोच्च प्राधान्य देताना काही वेळा आपल्या वैयक्तिक खेळावर आणि महत्त्वाकांक्षांवरही तडजोड करावी लागल्याचे हरमनप्रीतने आपल्या संदेशात म्हटले. कर्णधार म्हणून घेतलेले अनेक निर्णय सोपे नव्हते, मात्र संघातील इतर खेळाडूंना पुढे येण्याची संधी मिळावी आणि त्यांनी स्वतःवर विश्वास ठेवावा, हा त्यामागचा उद्देश असल्याचे तिने स्पष्ट केले.

विश्वचषक आणि एशियन गेम्समधील मोठ्या यशानंतर निर्णय

हरमनप्रीतच्या नेतृत्वाच्या काळात भारतीय महिला क्रिकेटने ऐतिहासिक कामगिरी केली. तिच्या नेतृत्वाखाली भारताने २०२५मध्ये पहिल्यांदाच महिला वनडे विश्वचषक जिंकला. त्यानंतर २०२६मध्ये संघाने आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदकही पटकावले. त्यामुळे यशस्वी टप्प्यानंतर हरमनप्रीतने कर्णधारपद सोडण्याचा निर्णय घेतल्याने क्रिकेटविश्वात आश्चर्य व्यक्त होत आहे.

आता स्मृती मंधानाकडे नेतृत्वाची धुरा?

हरमनप्रीतच्या अनुपस्थितीत पुढील कर्णधार कोण असेल, हा भारतीय महिला क्रिकेटसमोरचा महत्त्वाचा प्रश्न आहे. सध्या स्मृती मंधानाचे नाव आघाडीच्या पर्यायांमध्ये घेतले जात आहे. ती यापूर्वी भारतीय संघाची उपकर्णधार राहिली आहे आणि २०२६च्या आशियाई क्रीडा स्पर्धेसाठीही तिला उपकर्णधारपद देण्यात आले होते.

मात्र, अंतिम निर्णय बीसीसीआय आणि निवड समितीकडून घेतला जाणार आहे. त्यामुळे स्मृतीच पुढील कर्णधार असेल, असे सध्या निश्चितपणे म्हणता येणार नाही.

हरमनप्रीतचा खेळाडू म्हणून प्रवास सुरूच

कर्णधारपदाचा अध्याय संपला असला तरी हरमनप्रीतने क्रिकेटपासून दूर जाण्याचा निर्णय घेतलेला नाही. ती भारतीय संघासाठी खेळाडू म्हणून आपले योगदान सुरू ठेवणार आहे. आपल्या भावनिक संदेशाच्या शेवटीही तिने भारतीय क्रिकेटबद्दलचे प्रेम कायम राहणार असल्याचे स्पष्ट केले.

त्यामुळे भारतीय महिला क्रिकेटमध्ये आता नेतृत्वाच्या नव्या पर्वाची सुरुवात होणार आहे. एकीकडे हरमनप्रीतचा अनुभव संघाला खेळाडू म्हणून मिळत राहणार आहे, तर दुसरीकडे नव्या कर्णधाराकडे पुढील पिढीला घडवण्याची आणि संघाला पुढे नेण्याची जबाबदारी असेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Waste Management: कचरा व्यवस्थापनाचे नियम पाळा, अन्यथा कारवाईची शक्यता; 385 घटकांवर प्रशासनाची नजर

Morjim School Repair News: महिना उलटूनही शाळेची दुरुस्ती रखडली; अंगणवाडी स्टेजवर, बालहक्क आयोगाची नाराजी

Morjim Beach Safety: मोरजी बीचवर गुरांचे कळप, भटक्या श्वानांचा उपद्रव; पर्यटन हंगामात पर्यटकांच्या सुरक्षेचा प्रश्न!

Ranji Trophy: गोव्याची फलंदाजी ठरतेय डोकेदुखी; विदर्भाविरुद्ध पराभवांची मालिका खंडित करण्याचे आव्हान

Rohit Sharma Dance Video: 'ले गई, ले गई' गाण्यावर रोहित शर्मानं धरला ठेका! करिश्मा कपूरसोबतचा डान्स व्हिडीओ व्हायरल; हिटमॅन म्हणाला, 'मजा आ गया'

SCROLL FOR NEXT