Goa: Hockey ground project at Pede-Mapusa, which is still incomplete. Dainik Gomantak
क्रीडा

Goa: पेडे हॉकी मैदानाचे काम अजूनही अपूर्णावस्थेत

Goa: खेळातील गुणवत्ता साधनसुविधांअभावी पिछाडीवर

किशोर पेटकर

पणजीः टोकियो ऑलिंपिक (Tokyo Olympic) स्पर्धेत भारताच्या पुरुष व महिला हॉकी (India Hockey Team) संघाने चार दशकांच्या कालावधीनंतर उपांत्य फेरी गाठून लक्ष वेधून घेतले. काही वर्षांपूर्वी मूळ गोमंतकीय हॉकीपटूंनी (Goa Hockey Players) भारतीय संघाचे प्रतिनिधित्व करत ऑलिंपिकपर्यंत मजल मारली, पण सध्या राज्यातील हॉकी अजूनही साधनसुविधांच्या शोधात आहे. गोव्यात गुणवत्ता आहे, पण साधनसुविधा नाहीत हे गेली कित्येक वर्षांचे चित्र कायम आहे. गोव्यात नियोजित असलेल्या 36व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेनिमित्त पेडे-म्हापसा येथे दर्जेदार ॲस्ट्रो टर्फ साकारत असल्याने राज्यातील हॉकीला ऊर्जितावस्था प्राप्त होण्याचे संकेत आहेत, पण काम अजूनही अपूर्णावस्थेत असल्याने हॉकीप्रेमींचा भ्रमनिरास झाला आहे.

पेडे-म्हापसा येथील आंतरराष्ट्रीय दर्जाच्या ॲस्ट्रो टर्फ हॉकी मैदानाचे काम पूर्ण झाले आहे, पण साधनसुविधाविषयक कामे अपूर्णच आहेत. त्यात प्रेक्षक स्टँड, खेळाडूंचे चेंजिंग रुम्स यांचा समावेश आहे. गेल्या शुक्रवारी राज्य विधानसभेत सादर केलेल्या उत्तरात क्रीडामंत्री मनोहर (बाबू) आजगावकर यांनी पेडे-म्हापसा येथील हॉकी प्रकल्प अपूर्ण असल्याचे मान्य केले. फोंड्याचे आमदार रवी नाईक यांच्या प्रश्नास अनुसरून क्रीडामंत्री आजगावकर यांनी उत्तरात, कांपाल येथील तरण तलावाचे नूतनीकरण, चिखली येथील स्क्वॉश कोर्टची सुधारणा, फातोर्डा येथील लॉन टेनिस कोर्टचा विकास, हॉकी मैदानाच्या (म्हापसा) चँजिंग रूमचे बांधकाम आणि कांपाल येथील बेसबॉल मैदानाचा विकास आदी कामे अजून पूर्ण झालेली नाही, असे नमूद केले होते. साधनसुविधा निर्मितीसाठी आतापर्यंत 448.6 कोटी रूपये खर्च करण्यात आले आहेत. त्यापैकी 121.8 कोटी रुपये केंद्र सरकारने मंजूर करून निधी दिलेला आहे, असेही क्रीडामंत्री आजगावकर यांनी लेखी उत्तरात स्पष्ट केले आहे. 2009 पासून गोव्यात गोवन्स हॉकी ही संघटना कार्यरत आहे. कॉस्ताव झेवियर मार्किस हे संघटनेचे अध्यक्ष आहेत. माजी आमदार आणि माजी हॉकीपटू फॅरेल फुर्तादो-ग्रासियस या संघटनेच्या ज्येष्ठ उपाध्यक्ष असून माजी राष्ट्रीय हॉकीपटू बेनी व्हिएगस सचिव आहेत. गोवन्स हॉकीच्या संकेतस्थळानुसार संघटना हॉकी इंडियाशी संलग्न आहे, तसेच राष्ट्रीय पातळीवरील हॉकी स्पर्धेसाठी नियमितपणे संघ पाठवते. मात्र राज्यात दर्जेदार हॉकी स्टेडियम नसल्याने युवा खेळाडूंच्या कामगिरीवर प्रतिकुल परिणाम होत आहे.

हॉकीसाठी विकास केंद्र

केंद्रीय क्रीडा मंत्रालयाच्या खेलो इंडिया अभियानांतर्गत पेडे-म्हापसा येथील क्रीडा संकुलात हॉकी पायाभूत सुविधा विकास केंद्र साकारणार आहे. केंद्रीय युवा व्यवहार व क्रीडा मंत्रालयाच्या खेलो इंडिया अभियानांतर्गत जिल्हा पातळीवर खेलो इंडिया केंद्र विकसित केले जाईल. या ठिकाणच्या केंद्रासाठी भारतीय क्रीडा प्राधिकरणातर्फे गोवा क्रीडा प्राधिकरणास निधी उपलब्ध करून दिला जाईल. याशिवाय राज्य सरकार-गोवा क्रीडा प्राधिकरण यांना संबंधित खेळात मार्गदर्शनासाठी माजी खेळाडूंची प्रशिक्षक-मेंटॉरपदासाठी नियुक्ती करण्याचा अधिकार असेल, असे केंद्रीय क्रीडा व युवा व्यवहार मंत्रालयाने स्पष्ट केले आहे.

ॲस्ट्रो टर्फचे दोन वेळा काम!

गतवर्षी या मैदानाच्या ॲस्ट्रो टर्फचे काम निकृष्ट ठरल्याचे उघड झाले होते, मैदान खेळण्यास धोकादायक असल्याचे कारण देत संबंधित संस्थेने त्यास आवश्यक प्रमाणपत्र देण्यास नकार दिला होता. या कामाचे ठेकेदार आणि ॲस्ट्रो टर्फ पुरवठादारांनी तांत्रिक त्रुटी मान्य करून गोवा क्रीडा प्राधिकरणाकडून अतिरिक्त शुल्क न आकारता मैदानावर दुसऱ्यांदा ॲस्ट्रो टर्फ बसविले. गतवर्षी ऑक्टोबरमध्ये या ॲस्ट्रो टर्फ हॉकी मैदानास आंतरराष्ट्रीय मान्यता मिळाली होती. त्यास जागतिक हॉकी महासंघाचे (एफआयएच) प्रमाणपत्र लाभले आहे. त्यानुसार ते आंतरराष्ट्रीय हॉकी मैदान आवश्यकतेचे निकष पूर्ण करत आहे. जागतिक हॉकी महासंघाच्या मान्यतेची वैधता सप्टेंबर 2023 पर्यंत आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ranji Trophy 2024: मोहितचा 'पंजा' अन् फलंदाजांचा जलवा, गोव्यानं उडवला मिझोरामचा धुव्वा; नोंदवला सलग चौथा विजय!

Goa Live Updates: एंटर एअरचे पहिले चार्टर गोव्यात दाखल!

Rajbagh Beach: राजबाग किनाऱ्याने घेतला 'मोकळा श्वास'! पर्यटन खात्याकडून सात बेकायदेशीर बांधकामे उद्ध्वस्त

Goa Onion Rates: कांद्याने आणले डोळ्यात पाणी! नासाडीमुळे दोन दिवसात दरांमध्ये तब्बल २० रुपयांनी वाढ, जाणून घ्या सध्याचा भाव

Margao News: स्वच्छतेसंदर्भात मडगाव पालिकेचा महत्त्वाचा निर्णय; या कारणासाठी नागरिक, पर्यटकांकडून वसूल केला जाईल दंड

SCROLL FOR NEXT