पणजी: देशातील कोरोना विषाणू महामारी (Covid 19) परिस्थितीनुरूप गोव्यात (Goa) नियोजित असलेल्या 36व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेबाबत चर्चा करण्यासाठी सध्याची वेळ योग्य नाही, असे मत गोवा क्रीडा प्राधिकरणाचे कार्यकारी संचालक वसंत प्रभुदेसाई (Vasant Prabhudesai) यांनी गुरुवारी व्यक्त केले. ते टोकियो ऑलिंपिकविषयक (Tokyo Olympic) कार्यक्रमात बांबोळी येथे बोलत होते.
प्रभुदेसाई यांनी सांगितले, की ''कोरोना विषाणू महामारीचा साऱ्या देशाला फटका बसला आहे. स्पर्धा घेण्याइतपत सध्याची परिस्थिती नाही. त्यामुळे भारतीय ऑलिंपिक संघटनेनेही राज्यात नियोजित असलेल्या स्पर्धेच्या तारखेबाबत गेले दीड वर्ष विचारणा केलेली नाही. त्यामुळे स्पर्धा गोव्यात कधी होणार याची चर्चा करण्याची ही योग्य वेळ नाही. आमची तयारी आहे, महामारी परिस्थिती आटोक्यात आल्यानंतर आयोजनाबाबत बोलता येईल. टोकियो ऑलिंपिकनंतरच राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेवर विचारविनिमय होऊ शकेल, पण महामारीमुळे स्पर्धा नेमकी कधी होईल हे सांगता येणार नाही.
गोव्यात विविध कारणास्तव वारंवार लांबणीवर पडलेली 36वी राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा गतवर्षी 20 ऑक्टोबर ते 4 नोव्हेंबर या कालावधीत होणे अपेक्षित होते, पण कोरोना विषाणू महामारीने उग्र रूप धारण केल्यानंतर गेल्या वर्षी मे महिन्यात राज्य सरकारने स्पर्धा बेमुदत लांबणीवर टाकण्याचा निर्णय घेतला होता. त्यास खेळाडूंच्या आरोग्यास प्राधान्य देत केंद्र सरकारनेही अनुमोदन दिले होते.
गोमंतकीय क्रीडापटूंत सातत्याचा अभाव
ऑलिंपिक स्पर्धेसाठी गोव्यातील क्रीडापटू का पात्र ठरू शकत नाहीत या प्रश्नावर प्रभुदेसाई यांनी राज्यातील क्रीडापटूंस जबाबदार धरले. ``गोमंतकीय क्रीडापटूंत सातत्याचा अभाव आहे. देशातील इतर भागातील क्रीडापटूंप्रमाणे ते चिकाटी आणि जिद्द प्रदर्शित करू शकत नाहीत. खेळात उत्साह आवश्यक आहे, त्याचा अभाव गोमंतकीय क्रीडापटूंत आहेत. त्यामुळेच ऑलिंपिकपर्यंत मजल मारण्यात ते सफल ठरत नाहीत,`` असे मत प्रभुदेसाई यांनी व्यक्त केले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.