Goa Pro League Dainik Gomantak
क्रीडा

Goa Pro league 2023 : गोवा प्रो लीगमधील संघांची संख्या वाढणार; ‘जीएफए’चा निर्णय

किशोर पेटकर

Goa Professional League Football : गोवा फुटबॉल असोसिएशनने (जीएफए) आगामी मोसमापासून प्रोफेशनल लीग फुटबॉल स्पर्धेतील सहभागी संघांची संख्या वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार थेट प्रवेशासाठी इच्छुक संघांकडून बोली मागविण्यात आल्या.

गोवा प्रोफेशनल लीग फुटबॉल स्पर्धेत 2022-23 मोसमात 11 संघ होते, 2023-24 मोसमात बोली प्रक्रिया निवडीनुसार सहभागी संघांची संख्या वाढेल. त्यासाठी स्थानिक क्लब आणि कॉर्पोरेट क्लब अशा दोन गटातून बोली मागविण्यात आल्या आहेत.

पहिल्या स्थानिक गटातील संघासाठी किमान बोली रक्कम ३० लाख रुपये असेल आणि हा क्लब सोसायटी कायदा १८६० नुसार नोंदणीकृत असावा. दुसरा गट कॉर्पोरेट प्रवेशिकांसाठी असेल. या गटातील संघासाठी किमान बोली रक्कम ५० लाख रुपये असेल आणि क्लब कंपनी कायदा २०१४ नुसार नोंदणीकृत असावा.

थेट प्रवेशिका बोलीसाठी गोव्याबाहेरील संस्था अथवा उद्योगसमूह राज्यातील स्थान क्लबशी करार करू शकतील. यामुळे बऱ्याच आयएसएल संघांच्या राखीव संघांना किंवा अकादमींना गोवा प्रोफेशनल लीग स्पर्धेत खेळणे शक्य होईल. काही संघ स्पर्धात्मक अनुभवासाठी गोव्यात खेळण्यास इच्छुक आहेत.

किमान दोन संघांची अपेक्षा

थेट प्रवेश निर्णयाविषयी जीएफए अध्यक्ष कायतान फर्नांडिस यांनी सांगितले, की ‘‘कार्यकारी समितीने यावर्षी चौकटीबाहेर जाऊन निर्णय घेण्याचे ठरविले. गोव्यातील सर्वाधिक प्रतिष्ठेची फुटबॉल स्पर्धेचा दर्जा उंचावण्यासाठी आम्ही कसून काम करत आहोत. यंदा मोसमात थेट प्रवेशानुसार किमान दोन संघ लीगमध्ये सहभागी होण्याची आम्हाला अपेक्षा आहे. गोवा प्रोफेशनल लीग स्पर्धेची लोकप्रियता वाढावी, पुरस्कर्ते पुढे यावेत, चांगले खेळाडू आणि दर्जात्मक वाढ या दृष्टीने आम्ही प्रयत्नशील आहोत.’’

थेट प्रवेश घेणाऱ्या नव्या संघांसाठी जीएफए क्लब परवाना निकषांचे पालन करावे लागेल, याअंतर्गत क्लबना साधनसुविधा, क्रीडाविषयक, कायदाविषयक, आर्थिकविषयक आणि प्रशासकीय निकाषांची पूर्तता करणे आवश्यक असेल.

पायाभूत फुटबॉल विकासाला प्राधान्य

जीएफए कार्यकारी समितीच्या निर्णयाविषयी जीएफए ज्येष्ठ उपाध्यक्ष आणि स्पर्धा समितीचे प्रमुख अँथनी पांगो यांनी सांगितले, की ‘‘गोवा प्रोफेशनल लीग स्पर्धेत थेट प्रवेश मिळणाऱ्या संघांना फुटबॉलच्या पायाभूत आणि युवा विकास कार्यक्रमात गुंतवणूक करावी लागेल. स्पर्धेतील अगोदरच्या संघाव्यतिरिक्त नव्या क्लबसाठी हे अतिरिक्त असेल. यामुळे राज्यातील भविष्यकालीन युवा गुणवत्तेला उभारी देणे हा उद्देश आहे.’’

ऑगस्टमध्ये स्पर्धेला सुरवात

गोवा प्रोफेशनल लीग फुटबॉल स्पर्धा नियोजित वेळापत्रकानुसार यावर्षी ऑगस्टमध्ये सुरू होईल. गतमोसमात स्पर्धेत ११ संघ होते आणि धेंपो स्पोर्टस क्लबने सलग दुसऱ्यांदा विजेतेपद मिळविले होते.

स्पर्धा द्विसाखळी पद्धतीने होते, परंतु कोविडमुळे दोन वर्षांपूर्वी स्पर्धेचे स्वरूप बदलण्यात आले. त्यानुसार विजेतेपद आणि पदावनती अशा दोन गटात स्पर्धा झाली. गतवर्षी संघटनेची निवडणूक उशिरा झाल्यामुळे मोसमाला विलंबाने सुरवात झाली व मागीलप्रमाणेच दोन गटात स्पर्धा घ्यावी लागली होती.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

बॉलीवूड, टॉलीवूडचा प्रसिद्ध नृत्य दिग्दर्शक जानी मास्टरला गोव्यात अटक, सहकारी महिलेचा 6 वर्षापासून लैंगिक छळ केल्याचा आरोप

Ratnagiri Crime News: स्वप्नात दिसला मृतदेह, सिंधुदुर्गातील तरुण पोहोचला पोलीस ठाण्यात; तपासात उघड झाली धक्कादायक माहिती

तम्नार प्रकल्प रखडणार! कर्नाटकचे शेपूट वाकडेच, सिद्धरामय्यांनी कळसा-भांडुराचा मुद्दा केला उपस्थित

रस्त्यांच्या अवस्थेवरुन काँग्रेस आक्रमक; दहा दिवसांत काम सुरु न झाल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा

फोंड्यात 'हेडा गॅब्लर'चा प्रयोग; 125 वर्षापूर्वी लिहलेले नोर्वेजियन नाटककाराचे नाटक पाहण्याची संधी

SCROLL FOR NEXT