पणजी: मुख्य प्रशिक्षक अंतोनियो लोपेझ हबास यांना डच्चू दिल्यानंतर अडचणीत सापडलेला एटीके मोहन बागान संघ मंगळवारी (ता. २१) इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल स्पर्धेत नव्या आव्हानास सज्ज झाला आहे. फातोर्डा येथील पंडित जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर त्यांच्यासमोर नॉर्थईस्ट युनायटेडचा धोका असेल.
गतउपविजेत्या एटीके मोहन बागानचे सहा लढतीतून आठ गुण आहेत. मागील लढतीत त्यांना बंगळूर एफसीने गोलबरोबरीत रोखले. सध्याचा कामगिरीने निराश झालेल्या संघ व्यवस्थापनाने गेल्या शनिवारी हबास यांना डच्चू दिला. एफसी गोवा (FC Goa) संघ सोडलेले हुआन फेरांडो कोलकात्यातील फुटबॉल (Football) संघाचे प्रशिक्षकपद स्वीकारणार आहेत, पण तांत्रिक कारणास्तव फेरांडो लगेच उपलब्ध नसतील, त्यामुळे अंतरिम प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली एटीके मोहन बागानला (ATK Mohun Bagan) खिंड लढवावी लागेल.
नॉर्थईस्ट युनायटेडला (North East United) स्पर्धेत सातत्य प्रदर्शित करता आलेले नाही. सात लढतीतून त्यांनी सात गुणांची कमाई केली आहे. एटीके मोहन बागान संघ मागील चार सामन्यांत विजय मिळवू शकलेला नाही. एटीके मोहन बागानने स्पर्धेत आतापर्यंत १३ गोल स्वीकारले आहेत, त्यामुळे नॉर्थईस्ट युनायटेड संघ त्यांच्या बचावफळीत दबाव टाकण्याच्या प्रयत्नात राहील. अगोदरच्या लढतीत खलिद जमील यांच्या मार्गदर्शनाखालील संघाने ईस्ट बंगालला दोन गोलच्या फरकाने हरविले. प्रमुख परदेशी खेळाडू देशॉर्न ब्राऊन व हरनान सांताना उद्या खेळण्याचे संकेत आहेत. ''एटीके मोहन बागान हा चांगला संघ आहे, परंतु आम्ही फक्त आमचा विचार करतोय. मागील सामन्यातील आमची कामगिरी चांगली झाली होती आणि त्यात सातत्य राखण्याची गरज आहे. खेळाडू सकारात्मक आहेत आणि तेही याच मानसिकतेनं खेळण्याचा त्यांचा निर्धार आहे,'' असे प्रशिक्षक जमील यांनी सांगितले.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.