

फेसबुकवर ओळख झालेल्या एका महिलेने वाढदिवसानिमित्त गिफ्ट पार्सल पाठवण्याचे आमिष दाखवून शिरोडा येथील एका व्यक्तीची तब्बल १ लाख ६१ हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी फोंडा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून पोलिसांनी सायबर गुन्ह्यांतर्गत तपास सुरू केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अँड्र्यू नावाच्या शिरोडा–फोंडा येथील रहिवाशाची फेसबुकवर इंग्लंडमध्ये राहत असल्याचा दावा करणाऱ्या एका महिलेबरोबर ओळख झाली होती. काही दिवस संवाद झाल्यानंतर त्या महिलेने अँड्र्यू यांना वाढदिवसानिमित्त खास गिफ्ट पार्सल पाठवत असल्याचे सांगितले.
त्यानंतर काही वेळातच दिल्लीतील कस्टम विभागातून बोलत असल्याची बतावणी करणाऱ्या एका महिलेचा फोन आला. पार्सल भारतात पोहोचल्याचे सांगून कस्टम शुल्क आणि इतर प्रक्रियेसाठी काही रक्कम भरण्याची मागणी करण्यात आली. विश्वास ठेवून अँड्र्यू यांनी वेगवेगळ्या कारणांखाली एकूण १ लाख ६१ हजार रुपये ऑनलाइन पद्धतीने पाठवले.
मात्र पैसे पाठवल्यानंतरही पार्सल मिळाले नाही आणि संबंधित महिलांशी संपर्कही तुटला. त्यानंतर आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच अँड्र्यू यांनी फोंडा पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. या प्रकरणात फेसबुक फ्रेंड आणि दिल्लीतील कथित कस्टम अधिकारी अशी ओळख सांगणाऱ्या महिलांनी एकत्रितपणे फसवणूक केल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.
पोलिसांनी ॲना डोनाट आणि दीपिका शर्मा या नावांचा वापर करणारी व्यक्ती एकच आहे का, याचा तपास सुरू केला असून सायबर विभागाच्या मदतीने पुढील चौकशी केली जात आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.