Indian Super League: मुंबई सिटी एफसीने यावेळच्या इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल स्पर्धेत धडाकेबाज खेळ करताना सर्वाधिक 48 गोल केले, 17 सामने ते अपराजित आहेत, साहजिकच त्यांचे पारडे जड आहे.
तरीही एफसी गोवाचे मुख्य प्रशिक्षक कार्लोस पेनया प्रतिस्पर्ध्यांचा दबाव घेण्यास तयार नाहीत. शनिवारी (ता. 11) स्पर्धेतील सनसनाटी निकाल नोंदविण्याचे उद्दिष्ट त्यांनी बाळगले आहे.
एफसी गोवा आणि मुंबई सिटी यांच्यातील महत्त्वपूर्ण सामना फातोर्डा येथील पंडित जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर खेळला जाईल. या मैदानावर एफसी गोवाने यंदा आठपैकी सहा सामने जिंकले आहेत.
मुंबई सिटीने पहिल्या टप्प्यात एफसी गोवाचा 4-1 असा फडशा पाडला होता. ती पुनरावृत्ती शनिवारी झाल्यास डेस बकिंगहॅम यांच्या मार्गदर्शनाखालील संघाला दुसऱ्यांदा लीग विनर्स शिल्ड पटकावण्याची संधी असेल.
प्रतिष्ठेची शिल्ड आपल्या नावे करण्यासाठी त्यांना बाकी तीन लढतीतून सहा गुणांची आवश्यकता आहे. गोव्यातील संघाची सरशी झाल्यास त्यांची प्ले-ऑफ फेरीतील जागा जवळपास निश्चित होईल.
सध्या 13 विजय व चार बरोबरी या कामगिरीसह मुंबई सिटीचे सर्वाधिक 43 गुण आहे. एफसी गोवा संघ मागील चार सामन्यांत दोन विजय व दोन बरोबरीसह अपराजित आहे. त्यांचे 17 सामन्यांतून 27 गुण असून ते सध्या पाचव्या क्रमांकावर आहे.
नॉर्थईस्ट युनायटेड व ओडिशाविरुद्ध बरोबरीमुळे महत्त्वाच्या गुणांना मुकावे लागल्याची सल प्रशिक्षक पेनया यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत व्यक्त केली.
समतोल कामगिरीवर भर
एफसी गोवासाठी शनिवारच्या महत्त्वपूर्ण सामन्यासाठी सर्व खेळाडू उपलब्ध असल्याची माहिती पेनया यांनी दिली. अनुभवी एदू बेदिया एका सामन्याचे निलंबन संपवून पुनरागमन करत आहे. नवा खेळाडू हर्नान सांताना ओडिशाविरुद्ध बदली खेळाडू होता, त्यांनी खेळायला मिळालेल्या कालावधीत प्रभावित केल्याचे पेनया यांनी नमूद केले."
"एफसी गोवाचा आघाडी फळीतील प्रमुख खेळाडू इकेर ग्वोर्रोचेना याने 10 गोल केले आहेत, तर नोआ सदावी याने सात गोल आणि सात असिस्ट अशी अष्टपैलू कामगिरी बजावली आहे. पेनया म्हणाले, की ‘‘संघाच्या मजबूत कामगिरीत समतोल महत्त्वाचा ठरतो. आमचा भर त्यावर आहे. आक्रमणासोबत भक्कम बचावही निर्णायक ठरतो.’’
ताजातवान्या मानसिकतेसह मैदानात उतरू
‘‘ओडिशाविरुद्धची बरोबरी आता इतिहासजमा झालीय. जे काही घडलेय ते आम्ही बदलू शकत नाही. त्याविषयी विचार न करणेच योग्य ठरेल. उद्याचा नवा सामना आहे. नवे आव्हान आहे. आम्हाला ताजातवान्या मानसिकतेसह मैदानात उतरायचे आहे आणि आम्ही काय करू शकतो याचाच विचार करायचाय."
"मुंबई सिटीविरुद्ध अगोदरच्या लढतीत आम्ही उत्तरार्धात चुका केल्या, त्याची भरपाई करावी लागली. आता आमच्यासमोर मोठे उद्दिष्ट आहे. प्रतिस्पर्धी बलाढ्य आहे, पण आमचे ध्येय निश्चित आहे. प्रबळ आत्मविश्वासासह मैदानात उतरून प्रतिस्पर्ध्यांना पूर्ण क्षमतेने सामोरे जायचे आहे,’’ असे पेनया यांनी सामन्याच्या पूर्वसंध्येला सांगितले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.