पणजी : सामन्याच्या भरपाई वेळेतील पहिल्या मिनिटास बदली खेळाडू लालरिनलियाना (टेरिना) ह्नाम्टे याच्या शानदार हेडिंग गोलमुळे ईस्ट बंगालने पिछाडीवरून आठव्या इंडियन सुपर लीग (आयएसएल) (ISL) फुटबॉल (football) स्पर्धेत पराभव टाळला. दोन गोलनी मागे पडूनही त्यांनी माजी विजेत्या चेन्नईयीन एफसीला झुंजार खेळ करत 2-2 गोलबरोबरीत रोखले.
वास्को (Vasco) येथील टिळक मैदानावर झालेल्या या लढतीत चेन्नईयीन संघ पहिल्या पंधरा मिनिटांत 2-0 फरकाने आघाडीवर होता. दुसऱ्याच मिनिटास हिरा मोंडलने स्वयंगोल केल्यानंतर 15व्या मिनिटास निन्थोईंगंबा मीतेल याने चेन्नईयीनला दोन गोलची आघाडी मिळवून दिली. नंतर मारियो रिव्हेरा यांच्या मार्गदर्शनाखालील ईस्ट बंगालने जबरदस्त मुसंडी मारत सामना बरोबरीत राखला व एका गुणाची कमाई केली.
वाहेंगबाम लुवांग याच्या कॉर्नर फटक्यावर टेरिनाने उंच उडी घेत सुरेख हेडिंग साधले, त्यावेळी गोलरक्षक देबजित मजुमदार पूर्ण हतबल ठरला. त्यापूर्वी डॅरेन सिडोल याने 61व्या मिनिटास थेट फ्रीकिवर ईस्ट बंगालची पिछाडी कमी केली होती.
गुण मिळाल्यामुळे ईस्ट बंगाल संघ अकराव्या क्रमांकावरून दहाव्या स्थानी आला. समान १० गुण झाल्यानंतर ईस्ट बंगालने (-14) नॉर्थईस्ट युनायटेडला (-15) गोलसरासरीत अकराव्या स्थानी लोटले. ईस्ट बंगालची ही 15 लढतीतील सातवी बरोबरी ठरली. विजय हुकल्यामुळे चेन्नईयीनला पहिल्या चार संघांत स्थान मिळाले नाही. समान 19 गुण झाल्यानंतर चेन्नईयीन (-5) संघ सहाव्या स्थानी राहिला, तर एटीके मोहन बागानला (+4) पाचवा क्रमांक मिळाला. चेन्नईयीनची ही 14 लढतीतील चौथी बरोबरी ठरली.
स्वयंगोलमुळे दुसऱ्याच मिनिटास चेन्नईयीन एफसीला आघाडी मिळाली. जेरी लालरिनझुआला याच्या पासवर सुहेल पाशा याने हेडिंग साधले असता ईस्ट बंगालच्या हिरा मोंडल याच्या पायाला लागून चेंडू नेटमध्ये गेला. यावेळी गोलरक्षक अरिंदम भट्टाचार्य याला काहीच करता आले नाही. नंतर पंधराव्या मिनिटास मध्यफळीतील निन्थोईंगंबा मीतेल याने आयएसएल स्पर्धेतील वैयक्तिक पहिला गोल नोंदवून चेन्नईयीनची आघाडी वाढविली. ईस्ट बंगालच्या बचावपटूकडून चेंडू सुटल्याची संधी साधत मीतेल याने कठीण कोनातून फटका मारत गोलरक्षक अरिंदमला चकवा दिला. तासाभरानंतर नेदरलँड्सचा मध्यरक्षक डॅरेन सिडोल याने सलग दुसऱ्या लढतीत गोल केल्यामुळे ईस्ट बंगालची पिछाडी एका गोलने कमी झाली. त्याचा स्पर्धेतील तिसरा गोल ठरला.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.