Dhruv Jurel wearing Jos Buttlers gloves during India A vs Pakistan A in Men's Emerging Asia Cup 2023: श्रीलंकेत सध्या एमर्जिंक एशिया कप स्पर्धा सुरू असून बुधवारी भारतीय अ संघाने पाकिस्तान अ संघाविरुद्ध 8 विकेट्सने विजय मिळवला. भारताच्या या विजयात साई सुदर्शन, निकिन जोस, मानव सुतार आणि राजवर्धन हंगारगेकर यांचे महत्त्वाचे योगदान राहिले. तसेच यष्टीरक्षक ध्रुव जुरेलनेही आपल्या यष्टीरक्षणाने सर्वांचे लक्ष वेधले.
दरम्यान जुरेलमुळे इंग्लंडचा दिग्गज यष्टीरक्षक फलंदाज जॉस बटलर चांगलाच चर्चेत आला होता. झाले असे की या सामन्यात जुरेलने यष्टीरक्षण करताना जे ग्लव्ह्ज वापरले होते, त्यावर जॉस बटलरचे नाव होते.
रिपोर्ट्सनुसार बटलरने जुरेलला आयपीएल दरम्यान ग्लव्ह्ज भेट दिले होते. जुरेल आणि बटलर एकत्र राजस्थान रॉयल्सकडून आयपीएलमध्ये खेळतात. जुरेलने 2023 हंगामातूनच आयपीएलमध्ये पदार्पण केले होते. त्याने या हंगामात प्रभावी कामगिरी करताना 172.73 च्या सरासरीने 152 धावा केल्या होत्या.
दरम्यान, पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात त्याला फलंदाजीची संधी मिळाली नाही. पण त्याने यष्टीरक्षण करताना तीन झेल आणि एक यष्टीचीत करत आपले योगदान दिले.
बुधवारी झालेल्या सामन्यात पाकिस्तान अ संघाने 48 षटकात सर्वबाद 205 धावाच केल्या. पाकिस्तानकडून कासिम अक्रमने सर्वाधिक 48 धावांची खेळी केली. साहिबजादा फरहानने 35 धावांची खेळी केली.
भारताकडून राजवर्धन हंगारगेकरने 8 षटकांत 42 धावा देत 5 विकेट्स घेतल्या. तसेच मानव सुतारने 10 षटकांत 36 धावा देत 3 विकेट्स घेतल्या. रियान पराग आणि निशांत सिंधू यांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली.
त्यानंतर 206 धावांच्या आव्हानाचा पाठलाग भारताने 36.4 षटकात 2 विकेट्स गमावत पूर्ण केला. भारताकडून साई सुदर्शनने नाबाद 104 धावांची खेळी केली. तसेच निकिन जोसने 53 धावांची खेळी केली. पाकिस्तानकडून मुबासिर खान आणि मेहरान मुमताज यांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली.
भारत अ आणि पाकिस्तान अ संघांनी उपांत्य फेरीत प्रवेश निश्चित केला असून भारत अ संघाचा उपांत्य सामना बांगलादेश अ संघाविरुद्ध आणि पाकिस्तान अ संघाचा उपांत्य सामना श्रीलंका अ संघाविरुद्ध होणार आहे. 21 जुलै रोजी उपांत्य फेरीत विजय मिळवणारे संघ 23 जुलै रोजी अंतिम सामना खेळतील.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.