Rajvardhan Hangargekar
Rajvardhan HangargekarDainik Gomantak

IND A vs PAK A: हंगारगेकर ऑन फायर! पाकिस्तानविरुद्ध 5 विकेट्स घेत दाखवला दम

Emerging Asia Cup 2023 : भारतीय अ संघाकडून पाकिस्तान अ विरुद्ध राजवर्धन हंगारगेकरने 5 विकेट्स घेत चमकदार कामगिरी केली.
Published on

Emerging Asia Cup 2023 India A vs Pakistan A, Rajvardhan Hangargekar Five-Wicket Haul :

श्रीलंकेत सध्या एमर्जिंक एशिया कप स्पर्धा सुरू असून बुधवारी भारतीय अ विरुद्ध पाकिस्तान अ संघात सामना होत आहे. कोलंबोतील आर प्रेमदासा स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात भारताकडून राजवर्धन हंगारगेकरने चमकदार कामगिरी केली आहे.

या सामन्यात पाकिस्तान अ संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. पण, भारताने सुरुवातीलाच पाकिस्तानला मोठे धक्के दिले. चौथ्या षटकात हंगारगेकरने साईम आयुब आणि ओमेर युसूफ या दोघांनाही भोपळाही न फोडू देता बाद केले आणि पाकिस्तानला दुहेरी धक्के दिले.

त्यानंतर साहिबझादा फरहान आणि हसिबुल्लाह खान यांनी डाव सावरण्याचा प्रयत्न केला. पण त्यांची भागीदारी जास्त धोकादायक ठरणार नाही याची रियान परागने काळजी घेतली आणि त्याने फरहानला ३५ धावांवर बाद केले.

त्यानंतर २२ व्या षटकात मानव सुतारनेही पाकिस्तानला पुन्हा दोन धक्के दिले. त्याने खेळपट्टीवर स्थिरावलेल्या हसिबुल्लाह खानला २७ धावांवर आणि कामरान घुलामला १५ धावांवर बाद केले. त्यामुळे पाकिस्तानची अवस्था ७८ धावांवर ५ विकेट्स अशी झाली होती. त्यानंतरही कर्णघार मोहम्मद हॅरीसही सुतारच्या गोलंदाजीवर १४ धावा करून बाद झाला.

पण नंतर कासिम अक्रम आणि मुबासिर खान यांनी डाव सावरला. मात्र त्यांना मोठी धावसंख्या उभारण्यापासून मिशांत सिंधूने रोखले. त्याने मुसाबिरला २८ धावांवर बाद केले. तरी कासिम एका बाजूने खेळत होता. त्याने पाकिस्तानला १९० धावांचा टप्पा पार करून दिला. अखेर त्याला हंगारगेकरने ४८ धावांवर बाद केले.

हंगारगेकरने ४८ व्या षटकात मोहम्मद वसिम ज्युनियर (८) आणि शाहनवाज दहानी (४) यांना बाद केले आणि पाकिस्तानचा डाव संपवला. पाकिस्तानला ४८ षटकात सर्वबाद २०५ धावाच करता आल्या. पाकिस्तानकडून मेहरान मुमताझ २५ धावांवर नाबाद राहिला.

गोलंदाजी करताना भारताकडून राजवर्धन हंगारगेकरने ८ षटकांत ४२ धावा देत ५ विकेट्स घेतल्या. तसेच मानव सुतारने १० षटकांत ३६ धावा देत ३ विकेट्स घेतल्या. रियान पराग आणि निशांत सिंधू यांनी प्रत्येकी १ विकेट घेतली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com