CARLOS MARTINEZ FC GOA STRIKER : व्यावसायिक फुटबॉलमधील 18 वर्षांच्या दीर्घ कालावधीत तेरा संघांचे प्रतिनिधित्व केलेला स्पॅनिश आघाडीपटू कार्लोस मार्टिनेझ आता एफसी गोवाचे (FC Goa) आक्रमण धारदार करणार आहे. या संघाने 37 वर्षीय खेळाडूशी 2023-24 मोसमासाठी करार केला.
कार्लोस याच्या कारकिर्दीत एफसी गोवा चौदावा संघ असेल. स्पेनमधील विविध क्लबतर्फे, तसेच जपानमधील द्वितीय विभागीय संघ टोकियो व्हर्डीतर्फे खेळलेला कार्लोस एफसी गोवा संघाने आगामी मोसमासाठी करारबद्ध केलेला सातवा नवा खेळाडू असून ऑस्ट्रेलियन पावलो रेट्रे याच्यानंतरचा दुसरा परदेशी आहे.
‘‘मी एफसी गोवासंबंधी माहिती घेतलेली आहे. भारतीय फुटबॉलमधील त्यांच्या कामगिरीची मला जाणीव आहे. भारतीय लीगमधील हा एक यशस्वी संघ असून त्यांच्या शैलीशी परिचित असल्याने या क्लबशी करार करणे सोपे ठरले,’’ असे कार्लोस मार्टिनेझने एफसी गोवाच्या करारपत्रावर सही केल्यानंतर सांगितले.
‘‘गोव्यात लवकर दाखल होऊन सहकारी खेळाडूंना भेटण्यास मी इच्छुक आहे. एकत्रितपणे सर्व करंडकांना आव्हान देऊ, जेणेकरून या संघाच्या चाहत्यांना अभिमान वाटेल,’’ असे बार्सिलोनातील मातारो येथे जन्मलेला मार्टिनेझ पुढे म्हणाला.
‘‘कार्लोस गोल नोंदविण्यासाठी ओळखला जातो. गोलनेटचा सातत्याने वेध घेणे हे त्याचे प्राथमिक कौशल्य असून हवेतील चेंडूवर वर्चस्व राखण्याच्या त्याचे कसब आमच्या आक्रमणात आणखी परिणामकारक ठरेल. त्याची अष्टपैलू गुणवत्ता संघासाठी उपयुक्त ठरेल,’’ असा विश्वास एफसी गोवाचे फुटबॉल संचालक रवी पुस्कूर यांनी सांगितले.
दृष्टिक्षेपात कार्लोस मार्टिनेझची कारकीर्द
१८ वर्षे, १३ संघ, ३५७ सामने, १२३ गोल, ८ असिस्ट
बादालोना सीएफतर्फे व्यावसायिक फुटबॉलमध्ये पदार्पण
२०१२ मध्ये यूई ओलोत संघातर्फे खेळताना ३१ गोल
व्हिलारेयाल सीएफच्या राखीव संघातर्फे खेळताना ५७ गोल
जुलै २०१७ मध्ये जपानमधील द्वितीय विभागीय टोकियो व्हर्डी संघात दाखल
गतवर्षी एफसी अंदोर्रा संघाचे प्रतिनिधित्व
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.