Goa Politics: खरी कुजबुज; गोव्याचा वारसा, चांदराचे सौदागर कोण?

Goa Political News: ‘भिवपाची गरज ना’ असे सांगणे सोपे. मात्र आपल्या राज्यातील बेरोजगार युवकांच्या मनातील भिती काढण्यात सरकारला अपयश आले आहे.
Khari Kujbuj
Khari KujbujDainik Gomantak
Published on
Updated on

गोव्याचा वारसा, चांदराचे सौदागर कोण?

कुंपणानेच शेत खाल्ले, तर दोष कुणाला देणार? असे मराठीत एक बोध वाक्य आहे. कुंकळ्ळी मतदारसंघातील ‘चांदरा’ या ऐतिहासिक वारसा हक्कप्राप्त गावाचा सौदा गावातील स्थानिक राजकारण्यांनी केल्याचा आरोप आता स्थानिक करायला लागले आहेत. कदंब राजसत्तेच्या काळी गोमंतकाची राजधानी असलेल्या चांदरा या गावाला वारसा हक्क प्राप्त झालेला आहे. येथील जुनी घरे, चर्च व ऐतिहासिक स्थळांना महत्वाचे स्थान आहे. मात्र काही लोकांनी या गावातील मोठी जमीन परराज्यातील मोठ्या बिल्डरला विकली असून या गावात मोठा गृहनिर्माण प्रकल्प उभा राहत असल्यामुळे स्थानिक चिंतेत पडले आहे. महत्त्वाचे म्हणजे गोवा वाचवा हो, म्हणून महाआंदोलनात भाग घेतलेल्या काही राजकीय पक्षांचे पंच या वारसा स्थळाचा सौदा करण्यात सहभागी असल्याचा आरोप व्हायला लागला आहे. आता पाहूया चांदरा सांभाळण्यात कोण पुढे येतात. ∙∙∙

साहेब कुठे आहेत नोकऱ्या?

‘भिवपाची गरज ना’ असे सांगणे सोपे. मात्र आपल्या राज्यातील बेरोजगार युवकांच्या मनातील भिती काढण्यात सरकारला अपयश आले आहे, म्हणून बेरोजगार भिवपाची गरज आहे, असे गळा फाडून सांगतात. पदवी घेतलेल्यांना कारकुनाची नोकरी करण्याची गरज नाही, गोव्यात करिअरच्या अनेक संधी उपलब्ध असल्याचा दावा आपले मुख्यमंत्री करतात. डॉक्टर साहेब शिक्षितांना कुठे आहेत नोकऱ्या? असा प्रश्न शिक्षित विचारायला लागले आहेत. उच्च शिक्षित आता नोकऱ्या नाही म्हणून क्लार्कच्या नव्हे, एमटीएस (चपरासी) च्या नोकरीसाठी प्रयत्न करताना दिसतात. अभियांत्रिकी, फार्मसी, शिक्षण या विषयात पदवीधरच नव्हे, तर पोस्ट ग्रॅज्युएट ही नोकरीच्या प्रतीक्षेत आहेत. मुख्यमंत्री साहेब उपलब्ध नसलेल्या करिअरचा फायदा घ्या म्हणून बेरोजगारांच्या जखमेवर मीठ चोळू नका, असे आता बेरोजगार म्हणायला लागले आहेत. डॉक्टर साहेब ‘सब्र का फल मिठा होता है।’ असे आपण सांगतात खरे, मात्र संयमाचा बांध जेव्हा तुटतो, तेव्हा सुनामी यायला उशीर लागत नाही. ∙∙∙

राजकारण की राजकारणाचे शब्द?

राज्यात राजकारणात शब्दांचा बाजार फार रंगात आला आहे म्हणे! आंदोलनाच्या तापलेल्या वातावरणात मुख्यमंत्र्यांनी स्वतः पुढाकार घेत ‘आंदोलकांवरील तक्रारी मागे घेऊ, कोणावर कारवाई होणार नाही,’ असे आश्वासन दिले. पण म्हणतात ना, हवा कधी बदलते कळत नाही! आंदोलकांना पोलिसांकडून ‘समन्स’ देण्याचे आले. काहींना चौकशीसाठी पोलिस स्थानकात बोलावण्यात आले. आता या ‘समन्स’ शब्दावरच लोक मिश्कीलपणे हसत आहेत, समन्स की इशारा द्यायचा? राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे, की मुख्यमंत्री शब्दाला फिरले. आश्वासन देताना जे बोलले गेले, ते अधिकृत होते, की फक्त वातावरण शांत करण्यासाठीचे ‘तात्पुरते औषध’ होते? काहींच्या मते, राजकारणात शब्द हे पतंगासारखे असतात, सोडले की उंच जातात, पण दोरी दुसऱ्याच्या हातात असते! सध्या संताप, नाराजी भाव आंदोलनांमध्ये एकाच वेळी दिसत आहेत. मुख्यमंत्री शब्दाचे पक्के की राजकारणाचे चतुर, याचा निकाल मात्र पुढच्या काही दिवसांत लागेलच. तोपर्यंत चर्चा सुरूच… “शब्द दिला की शब्द फिरवला?” ∙∙∙

राजकीय नेते ‘अॅक्टिव्ह मोड’वर

निवडणुकीनंतरचे पहिली चार वर्षे म्हणजे जणू ‘सायलेंट मोड’वर असतात. फोन लावला तरी नेटवर्क नाही, मेसेज केला तरी ‘ब्लू टिक’ नाही आणि भेटायला गेले, तर ‘साहेब मिटिंगमध्ये आहेत’ हे कायमचे उत्तर. लोकांनी कितीही सांगितले, तरी विकासाच्या मोठ्या आराखड्यात ते बसत नाही, असे सांगून सगळे आपल्या मनासारखेच! पण गंमत बघा... आता निवडणुकीला अवघे एक वर्ष उरले आणि अचानक सगळीकडे “अॅक्टिव्ह मोड” सुरू! चार वर्षे दिसले नाहीत, ते नेते आता प्रत्येक गल्लीत, प्रत्येक कार्यक्रमात, प्रत्येक वाढदिवसाला! जिथे खड्डे होते, तिथे अचानक डांबराचा वर्षाव, जिथे रंग उडाला होता, तिथे नव्याने रंगरंगोटी, जिथे मैदान ओस पडले होते, तिथे खेळांसाठी निधी, आणि जिथे घरात काही गरज होती, तिथे मदतीचा हात! कोण म्हणतो रस्ते देतो, कोण म्हणतो खर्च करतो, कोणी म्हणतो सुशोभीकरण करतो… म्हणजे जणू “विकासाची सेल”च लागली आहे. चार वर्षे ‘स्टॉक संपला’ म्हणणारे आता अचानक “ऑफर मर्यादित काळासाठी” घेऊन हजर! लोक मात्र शांतपणे सगळं बघतायत. कारण जनता मूर्ख नसते. ती फक्त योग्य वेळ येईपर्यंत शांत असते. चार वर्षे जे ऐकू आले नाहीत, ते आता कान देऊन ऐकतायत... आता प्रश्न एवढाच, ही अचानक आलेली लोकप्रेमाची लाट खरी की निवडणुकीची वाऱ्याची झुळूक? उत्तर मात्र एका वर्षानेच मिळणार! ∙∙∙

लढा पाहण्‍यास जनता आतुर!

विरेश बोरकर हे विद्यमान विधानसभेतील सर्वात तरुण आमदार. रिव्‍हॉल्‍यूशनरी गोवन्‍स पक्षाचा (आरजीपी) सामान्‍य कार्यकर्ता ते आमदार हा त्‍यांचा प्रवास राजकारणात येऊ इच्‍छिणाऱ्या तरुण–तरुणींसाठी निश्‍चित आदर्शवत असाच आहे. या तरुण आमदाराने गेले काही दिवस नगरनियोजन कायद्याच्‍या कलम ३९ ‘अ’ वरून राज्‍यभर रान पेटवले आणि आपल्‍या सांतआंद्रे मतदारसंघासाठी केलेली मागणीही सरकारकडून पूर्ण करून घेतली. विधानसभेत भाजपकडे ३३ आमदारांचे बळ आहे. विरोधात केवळ सात आमदार असतानाही विरेशनी रस्‍त्‍यावर उतरून बलाढ्य सरकारला जी टक्‍कर दिली, त्‍याची चर्चा अजूनही राज्‍यभर सुरू आहे. आता येत्‍या ६ मार्चपासून विधानसभेचे अर्थसंकल्‍पीय अधिवेशन सुरू होत आहे. यात जमीन संरक्षणाच्‍या दृष्‍टीने विरेश पुन्‍हा सरकारला कसे शिंगावर घेणार, हे पाहण्‍यासाठी जनता आतुर झालेली आहे.∙∙∙

रात्रीस खेळ चाले

रेती काढण्यास राज्यभरात बंदी आहे. असे असतानाही सरकारी व खासगी बांधकामे मात्र उभी राहत आहेत. परराज्यातून एवढी रेती आणणे शक्य आहे का याचाही विचार कोणी करत नाही. आता रेतीविरोधात स्थानिक आवाज उठवू लागले आहेत. पंप लावून रेती काढण्याचे प्रकार वाढीस लागल्यानंतर स्थानिकांना जाग आली आहे. रेती काढणारे रात्रीच्यावेळी पंप लावतात म्हणून सावईवेरेचे ग्रामस्थ संतप्त झाले आहेत. आता अशी रेती काढणाऱ्यांविरोधात कारवाई होते की नाही याकडे सर्वांचे लक्ष मात्र लागून राहिले आहे. ∙∙

Khari Kujbuj
Goa Politics: आतिषी, चर्चिल भेटीमुळे सासष्‍टीत खळबळ, राजकीय घडामोडींना वेग; दोन्‍ही बाजूने सदिच्‍छा भेट असल्याचा दावा

मीराबाग : मोर्चाचा विचार

मीराबाग बंधाऱ्याविरोधात सध्या आंदोलन सुरू आहे. पणजीलगत चिंबल असल्याने तेथील आंदोलनाकडे माध्यमांचे लक्ष जात होते आणि त्याला मोठी प्रसिद्धी मिळाली. चिंबलवासियांनीही चिवटपणे लढा दिला आणि ते जिंकले. मिरावाबवासिय गेले १९ दिवस आंदोलन करत आहेत. त्यांची दखल सरकार कधी घेणार हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. त्यांनाही बहुधा विधानसभेवर मोर्चा आणावा लागेल असे बोलले जाऊ लागले आहे. केवळ मीराबाग येथे आंदोलन करून सरकारचे लक्ष वेधता येणार नाही हेही त्यांच्या लक्षात येऊ लागले आहे. ∙∙∙

Khari Kujbuj
Goa Politics: खरी कुजबुज; आधी घ्यायचा फायदा; नंतर...!

गोवा ‘आप’ला फायदा मिळेल?

दिल्लीतील मद्य घोटाळ्यातून अखेर माजी मुख्‍यमंत्री अरविंद केजरीवाल आणि माजी उपमुख्‍यमंत्री मनीष सिसोदिया यांची राउज अहेन्‍यू न्‍यायालयाने ‍निर्दोष मुक्तता झाली. त्‍याचवेळी न्‍यायालयाने या प्रकरणी तपास केलेल्‍या ‘सीबीआय’लाही विविध मुद्द्यांवरून फटकारले. केजरीवाल आणि सिसोदियांची मुक्तता होताच आम आदमी पक्षाच्‍या (आप) गोव्‍यातील नेत्‍यांनीही जल्लोष करीत, या दोघांच्‍या अटकेमागे पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा यांचा हात कसा होता? हे सांगण्‍याचे प्रयत्‍न सुरू केले आहेत. गोवा विधानसभा निवडणूक अवघ्‍या तेरा महिन्‍यांवर येऊन ठेपल्‍याने आणि या निवडणुकीत अधिकाधिक आमदार निवडून आणण्‍यासाठी जंग जंग पछाडणाऱ्या प्रभारी आतिषी तसेच राज्‍य निमंत्रक वाल्‍मिकी नाईक यांना केजरीवाल, सिसोदियांच्‍या मुक्ततेचा निवडणुकीत फायदा मिळणार? की गोमंतकीय जनता जिल्‍हा पंचायत निवडणुकीप्रमाणेच ‘आप’कडे दुर्लक्ष करणार? याकडे जनतेचे लक्ष लागून असेल.∙∙∙

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com