पणजी: बंगळूर एफसीने रिलायन्स फाऊंडेशन डेव्हलपमेंट लीग फुटबॉल स्पर्धेत सलग सहावा विजय नोंदवून विजेतेपदाचा दावा खूपच भक्कम केला. त्यांनी शनिवारी नागोवा येथील मैदानावर एका गोलच्या पिछाडीवरून जमशेदपूर एफसीला ५-२ फरकाने हरविले.(Bangalore FC won for the sixth time in a row )
बाणावली येथील मैदानावर हैदराबाद एफसीने चेन्नईयीन एफसीवर ३-२ असा निसटता विजय नोंदवून पहिल्या दोन संघांत स्थान मिळविण्याच्या आशा पल्लवित केल्या. सध्या बंगळूर एफसीचे सर्वाधिक १८ गुण आहेत. त्या खालोखाल केरळा ब्लास्टर्सचे १२, तर हैदराबादचे १० गुण आहेत. स्पर्धेच्या शेवटच्या साखळी सामन्यात बंगळूर एफसी केरळा ब्लास्टर्सविरुद्ध खेळेल, तो सामना विजेतेपदाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरू शकतो. त्यापूर्वी, केरळा ब्लास्टर्स रविवारी (ता. ८) आरएफ यंग चँप्स संघाविरुद्ध खेळेल.
लेनिन सिंग याने चौथ्याच मिनिटास जमशेदपूरला आघाडी मिळवून दिली. त्यानंतर बंगळूरने खेळाची सूत्रे हाती घेतली. राहुल राजू याचे दोन गोल (१७ व ५२वे मिनिट), तसेच लास्टबॉर्न मॉफनियांग (४५+१वे मिनिट), बेके ओरम (४७वे मिनिट) व जगदीप सिंग (६०वे मिनिट) यांनी प्रत्येकी एक गोल नोंदवून बंगळूरची स्थिती भक्कम केली. बदली खेळाडू निखिल बार्ला याने ७०व्या मिनिटास जमशेदपूरची पिछाडी २-५ अशी कमी केली. त्यांचा हा तिसरा पराभव असून सात गुण कायम राहिले.
सामन्यातील पाच मिनिटे बाकी असताना महंमद रफी याने गोल नोंदविल्याने हैदराबाद एफसीला स्पर्धेतील तिसरा विजय नोंदविता आला. पूर्वार्धात त्यांच्यासाठी पी. ए. अभिजित (२१वे मिनिट) व सी. लालचुंगनुंगा (३९वे मिनिट) यांनी प्रत्येकी एक गोल केला होता. जॉन्सन मॅथ्यूज (२९वे मिनिट) व आर. सोलाईमलाई (५७वे मिनिट) यांनी गोल केल्यामुळे चेन्नईयीनला बरोबरी साधता आली होती. त्यांचा हा चौथा पराभव ठरला. स्पर्धेत विजयाविना असलेल्या या संघाच्या खाती दोन गुण आहेत.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.