Babar Azam on Hyderabadi Biryani, hospitality after reached India during during ICC ODI Cricket World Cup Captains Day:
वनडे वर्ल्डकप 2023 स्पर्धेला 5 ऑक्टोबरपासून सुरुवात होत आहे. त्याआधी बुधवारी (4 ऑक्टोबर) अहमदाबादला सहभागी 10 संघांचे कर्णधार 'कॅप्टन्स डे'साठी एकत्र आले होते, यावेळी त्यांनी विविध विषयांवर प्रतिक्रिया दिल्या. यादरम्यान पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमने देखील आपली दिलखुलास मतं मांडली.
बाबर कॅप्टन्स डे साठी अहमदाबादला आला असला तरी सध्या पाकिस्तानचा संघ हैदराबादला आहे. बाबरही यापूर्वी संघासह हैदराबादला होता, तिथे त्यांनी दोन सराव सामनेही खेळले.
दरम्यान, बाबरसह पाकिस्तान संघातील अनेक खेळाडू पहिल्यांदाच भारतात खेळणार आहेत. अनेक जण पहिल्यांदाच भारतात आले आहेत. पाकिस्तानचा संघ जेव्हा भारतात आला, तेव्हा त्यांचे खास स्वागतही करण्यात आले.
याबद्दल बोलताना बाबर म्हणाला, 'आमचे खूप चांगले स्वागत झाले, आम्हाला इतके चांगले आदरातिथ्य मिळेल, अशी अपेक्षा नव्हती. आम्ही आठवडाभर झाले हैदराबादमध्ये आहोत, पण आम्हाला असे वाटत नाही की आम्ही भारतात आहोत, असे वाटतेय की आम्ही आमच्या घरी आहोत.'
तसेच बाबरने भारतातही चाहत्यांकडून पाठिंबा मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. तो म्हणाला, 'आम्ही हैदराबादमध्ये पोहचल्यापासून आमचे चांगले आदरातिथ्य झाले आहे. पण जर पाकिस्तानमधून इकडे चाहते येऊ शकले असते, तर अजून चांगले झाले असते. मला आशा आहे की आम्हाला प्रत्येक सामन्यात चांगला पाठिंबा मिळेल.'
याशिवाय पत्रकारांशी बोलत असताना मध्येच भारताचे माजी क्रिकेटपटू आणि प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी बाबर आझमला गमतीशीर प्रश्न विचारला. त्यांनी विचारले की 'बिर्याणी कशी वाटली?'
त्यावर बाबर खळखळून हसला आणि त्याने उत्तर दिले, 'मस्त होती. मी नेहमीच ऐकले होते की हैदराबादी बिर्याणी छान असते. ती खरंच चांगली होती.'
भारताविरुद्ध 14 ऑक्टोबर रोजी होणाऱ्या सामन्याबद्दल बाबर म्हणाला, 'आम्ही भारताविरुद्धच्या सामन्यासाठी उत्सुक आहोत, तो नेहमीच मोठा सामना असतो, पण त्याआधी आम्हाला दोन सामने खेळायचे आहे.' तसेच त्याने असेही सांगितले की प्रत्येक सामन्यानुसार ते योजना आखत पुढे जाणार आहेत. त्याचबरोबर त्याने त्यांची गोलंदाजी ही संघाची ताकद असल्याचेही सांगितले.
दरम्यान, पाकिस्तान या वर्ल्डकपमध्ये त्यांच्या मोहिमेची सुरुवात 6 ऑक्टोबर रोजी करणार आहेत. त्यांचा पहिला सामना हैदराबादला नेदरलँड्सविरुद्ध होणार आहे.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.