Anmol Kharb | Badminton Asia Team Championships 2024 X/BATC_ASIA
क्रीडा

Anmol Kharb: सायनाची फॅन ते भारताच्या चीनविरुद्धच्या विजयाची शिल्पकार, अनमोल खर्बच्या खेळाने वेधले अनेकांचे लक्ष

Badminton Asia Team Championships 2024: बॅडमिंटन आशिया टीम चॅम्पियनशीप स्पर्धेत भारतीय महिला संघाला चीनविरुद्ध 3-2 अशा विजय मिळवून देण्यात 17 वर्षीय अनमोल खर्बचे योगदान महत्त्वाचे ठरले.

Pranali Kodre

Anmol Kharb is Saina Nehwal fan, who helped India Women beat China in Badminton Asia Team Championships 2024:

बॅडमिंटन आशिया टीम चॅम्पियनशीप स्पर्धेला सुरूवात झाली असून बुधवारी भारताच्या महिला संघाने चीनच्या बलाढ्य संघाला पराभवाचा धक्का दिला. भारतीय महिला संघाने चीनच्या महिला संघाला 3-2 अशा फरकाने पराभूत करत उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. भारताच्या विजयात 17 वर्षीय अनमोल खर्बने मिळवलेला विजय महत्त्वाचा ठरला.

या लढतीत भारतीय संघ 2-2 अशा बरोबरीवर असताना अखेरचा आणि निर्णायक सामन्यात अनमोलला चीनच्या वू लुओ यु हिच्याशी दोन हात करायचे होते. 472 क्रमांकावर असलेल्या अनमोलने अटीतटीच्या पहिल्या गेममध्ये 149 व्या क्रमांकावर असलेल्या वू लुओ यु हिला 22-20 असा फरकाने हरवले.

मात्र दुसऱ्या गेममध्ये अनमोलला 14-21 असे पराभूत व्हावे लागले. पण तिने हार न मानता तिसरा गेम 21-18 ने जिंकत भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. तिने हा सामना जिंकून अनेकांची मनं जिंकली आहेत.

दरम्यान, गेल्या काही महिन्यांपासून अनमोलचे नाव भारतीय बॅटमिंटन वर्तुळात गाजत आहे. हरियाणाची असलेली अनमोल भारताची ऑलिम्पिक पदक विजेती सायना नेहवालची मोठी चाहती आहे. तिला पाहूनच तिने खेळण्याची प्रेरणाही घेतली. तिने एकदा सायना नेहवालच्या पोस्टरबरोबर पंजकुलामध्ये खेळताना फोटोही घेतला होता.

सायनाने भारताच्या बॅडमिंटनमध्ये मोठे योगदान दिले आहे. तिने अनेक स्पर्धा जिंकत अनेकदा भारतीय तिरंगा मानाने फडकवला आहे. सायनाने आंतरराष्ट्रीय बॅडमिंटनमध्ये पदार्पण करण्यापूर्वी 2003 मध्ये 17 वर्षांखालील आणि 2006 मध्ये 19 वर्षांखालील स्पर्धा जिंकली होती. विशेष म्हणजे त्यावेळी अनमोलचा जन्मही झाला नव्हता.

20 जानेवारी 2007 रोजी जन्मलेल्या अनमोललाही सायनाप्रमाणेच अशी कामगिरी करायची आहे. तिने नुकतीच नायुडू हॉल ट्रॉफी जिंकली आहे.

सायनाचा तिच्यावर असलेल्या प्रभावाबद्दल ती द इंडियन एक्सप्रेसशी बोलताना म्हणाली होती, 'सायना दिदी जागतिक स्थरावर भारतीय बॅडमिंटनचे नाव अग्रस्थानी नेणाऱ्यांपैकी एक आहे. मला आनंद आहे की तिने ज्यूनियर स्थरावर जिंकलेली एक स्पर्धा मी देखील जिंकली आहे.'

'मी 2006 मध्ये जन्मले नव्हते, पण तिने 2006 मध्ये जिंकलेल्या ट्रॉफीबरोबरचा तिचा फोटो मी पाहिला आहे. तिच्या त्या फोटोने मला पूर्ण आठवड्यात प्रेरणा दिली होती. मला आशा आहे की मी लवकरच आंतरराष्ट्रीय स्थरावर खेळेल आणि तिने केले तशी कामगिरी करेल'

दरम्यान, अनमोलचे आंतरराष्ट्रीय स्थरावर खेळण्याचे स्वप्न लवकरच पूर्ण झाले. तिला भारतीय संघात आशिया टीम चॅम्पियनशीप स्पर्धेसाठी संधीही मिळाली आणि तिने या संधीचा फायदाही घेतला. तिने या स्पर्धेतील विजयाने सर्वांवरच प्रभाव पाडला आहे.

खरंतर अनमोलने फरिदाबादमध्ये तिच्या भावामुळे बॅडमिंटन खेळायला सुरुवात केली होती. मात्र भावाने पुढे इंजिनियरिंगमध्ये करियर करण्याचे निश्चित केल्यानंतर तिने बॅडमिंटनमध्येच अधिक लक्ष्य केंद्रित केले. तिने नंतर नोएडामधील सनरायझर्स शटलर्स ऍकेडमीमध्ये प्रशिक्षणास सुरूवात केली. यावेळी तिची आई तिच्याबरोबर जायची.

हळुहळू अनमोलने वयोगटातील स्पर्धा जिंकण्यास सुरुवात केली. तिने 2019 मध्ये सब-ज्युनियर नॅशनल्समध्ये 13 वर्षांखालील स्पर्धेत उपांत्यपूर्व फेरीपर्यंत पोहचली होती. नंतर ती सब-ज्युनियर नॅशनल्समध्ये 17 वर्षांखालील गटात अंतिम सामन्यापर्यंत पोहचली, तर 19 वर्षांखालील ज्युनियर नॅशनल्समध्ये तिने उपांत्य फेरीत धडक मारली होती.

तिने हैदराबादमध्ये 17 वर्षांखालील ऑल इंडिया रँकिंग स्पर्धेचे विजेतेपद जिंकले. हे तिचे पहिले विजेतेपद होते. ती मागच्या हंगामात इंडोनेशियामध्ये झालेल्या आशियाई ज्युनियर चॅम्पियनशीप स्पर्धेत उपउपांत्यपूर्व फेरीपर्यंत पोहोचली होती.

दरम्यान, ती टोकियो ऑलिम्पिक विजेती शेन युफेईची देखील मोठी चाहती असल्याचे तिने सांगितले आहे. आता अनमोलकडे भारताची उदयोन्मुख खेळाडू म्हणून पाहिले जात आहे. त्यामुळे आता ती कशाप्रकारे तिचा खेळ उंचावत नेते, हे पाहावे लागणार आहे.

Karthik Aaryan In Goa: 'रुह बाबा'नं पुन्हा जिंकलं चाहत्यांचं मन; गोव्यात एन्जॉय करतानाचे फोटो केले शेअर!

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

South Goa Beach: दक्षिण गोव्यातील समुद्र किनाऱ्यांची धूप वृध्दी सुरुच; राष्ट्रीय अभ्यासातून खुलासा!

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांना गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

India Bike Week 2024: चित्तथरारक स्टंट, म्युझिक आणि बरंच काही...; गोव्यातील बाईक इव्हेंटच्या Date, Venue जाणून घ्या

SCROLL FOR NEXT