India vs Bangladesh Dainik Gomantak
क्रीडा

IND vs BAN: शुभमन गिलचं शतक होऊनही का हरली टीम इंडिया, जाणून घ्या 5 कारणे

Pranali Kodre

Asia Cup 2023 Super Four Bangladesh won by 6 runs against India:

शुक्रवारी आशिया चषक 2023 स्पर्धेत बांगलादेशने भारतीय संघाला अखेरच्या सुपर फोरच्या सामन्यात पराभवाचा धक्का दिला. रोमांचक झालेल्या या सामन्यात भारताला 6 धावांनी पराभवाचा सामना करावा लागला. दरम्यान, या सामन्याचा स्पर्धेवर मोठा परिणाम होणार नव्हता, तरी भारतीय संघाला अंतिम सामन्यापूर्वी धक्का देणारा होता.

भारतीय संघाने यापूर्वीच अंतिम सामन्यात स्थान मिळवले आहे, तसेच बांगलादेशचे आव्हान मात्र संपले आहे. कोलंबोमधील आर प्रेमदासा स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात बांगलादेशने प्रथम फलंदाजी करताना 50 षटकात 8 बाद 265 धावा करत भारतासमोर 266 धावांचे आव्हान ठेवले होते.

पण भारताचा संघ 49.5 षटकात 259 धावांवर सर्वबाद झाला. भारताच्या या पराभवामागील कोणती मोठी कारणे होती, याचा आढावा घेऊ.

भारतीय संघात मोठे बदल

भारतीय संघ आधीच अंतिम सामन्यात पोहचल्याने या सामन्यासाठी काही प्रयोग करण्यात आले आणि ज्या खेळाडूंना फारशी खेळण्याची संधी मिळाली नव्हती, त्यांना प्लेइंग इलेव्हनमध्ये घेण्यात आले. ज्याचा फटका या सामन्यात बसल्याचे दिसले.

संघ संयोजन बदलल्याने अचानक सर्व पुन्हा जुळवून सामना खेळणे भारतीय संघाला कठीण गेले. प्रामुख्याने गोलंदाजी फळीतील बदलांनी मोठा फटका बसला. कारण सुरुवातीच्या यशानंतर मधल्या षटकांमध्ये विकेट्स घेण्यात अपयश आले. त्यामुळे बांगलादेशने मोठी धावसंख्या उभारली.

या सामन्यात विराट कोहली, हार्दिक पंड्या, मोहम्मद सिराज, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह या अनुभवी खेळाडूंना विश्रांती देण्यात आली. त्यांच्याऐवजी प्लइंग इलेव्हनमध्ये तिलक वर्मा, सूर्यकुमार यादव, मोहम्मद शमी, प्रसिद्ध कृष्णा आणि शार्दुल ठाकूर यांना बांगलादेशविरुद्ध प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी देण्यात आली होती.

शाकिब अल हसन - तौहिद हृदोय यांच्यातील भागीदारी

या सामन्यात बांगलादेशने पहिल्या चार विकेट्स 14 षटकांच्या आत 59 धावांवरच गमावल्या होत्या. पण नंतर कर्णधार शाकिब अल हसन आणि तौहिद हृदोय यांनी 101 धावांची भागीदारी करत बांगलादेशला सावरले. त्यांच्या भागीदारीने बांगलादेशच्या डावाला स्थैर्य दिले.

हृदोयने एक बाजू सांभाळलेली असताना शाकिबने फिरकी गोलंदाजांविरुद्ध आक्रमण चढवले होते. त्यामुळे बांगलादेशने 160 धावांचा टप्पा सहज गाठला. शाकिबने या भागीदारी दरम्यान अर्धशतकही पूर्ण करत कर्णधाराला साजेशी 80 धावांची खेळी केली.

तळातली फलंदाजीने पाडला प्रभाव

शाकिब बाद झाल्यानंतरही बांगलादेशच्या खालच्या फळीने चिवट झुंज दिली. हृदोय 54 धावा करून बाद झाला. तो बाद झाला तेव्हा बांगलादेशच्या 41.2 षटकात 7 बाद 193 धावा झाल्या होत्या. पण अखेरच्या जवळपास 9 षटकात बांगलादेशने एकच विकेट गमावत 73 धावा जोडल्या.

बांगलादेशकडून नसुम अहमद आणि मेहदी हसन यांच्याच 8 व्या विकेटसाठी 45 धावांची भागीदारी झाली. तसेच नसुम 44 धावांवर बाद झाल्यानंतर मेहदी हसन (29*) आणि तान्झिम हसन साकिब (14) यांनी अखेरीस काही आक्रमक शॉट्स खेळत बांगलादेशला 50 षटकात 8 बाद 265 धावांपर्यंत पोहचवले.

दोन डाव्या हाताचे फिरकी गोलंदाज

या सामन्यात भारताने रविंद्र जडेजा आणि अक्षर पटेल या डावखुऱ्या फिरकी गोलंदाजांना प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळवले होते. हे दोन्ही गोलंदाज साधारण सारख्याच प्रकारची गोलंदाजी करतात. त्यामुळे त्यांच्याविरुद्ध खेळणे बांगलादेशच्या फलंदाजांना विशेषत: शाकिब अल हसनला सोपे जात होते.

शाकिबने त्याच्या 80 धावांमधील 51 धावा या दोघांविरुद्ध खेळतानाच काढल्या होत्या. भारतीय संघ जडेजा किंवा अक्षर या दोघांपैकी एकाला विश्रांती देऊन कुलदीप यादवला खेळवू शकला असता.

गिलव्यतिरिक्त फलंदाज अपयशी

भारताकडून 266 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना शुभमन गिलने 121 धावांची खेळी केली. तसेच अक्षर पटेलने अखेरीस आक्रमक खेळताना 34 चेंडूत 42 धावांची खेळी केली. या दोघांव्यतिरिक्त मात्र, अन्य कोणत्याच भारतीय फलंदाजाला खेळपट्टीवर स्थिरावता आले नाही. ज्यामुळे अखेरीस धावगती वाढत गेली, ज्याचा दबाव खालच्या फळीतील फलंदाजांना घेता आला नाही.

बांगलादेशची शानदार गोलंदाजी

बांगलादेशचा कर्णधार शाकिब अल हसनने गोलंदाजीतील विविधतेचा चांगला वापर केला, त्याने गोलंदाजीत केलेले बदल महत्त्वाचे ठरले. त्यामुळे गिल आणि अक्षर व्यतिरिक्त भारतीय फलंदाजांना स्थिरावता आले नाही. बांगलादेशच्या वेगवान आणि फिरकी गोलंदाजांचे चांगले संमिश्रण त्यांना या सामन्यात महत्त्वाचे ठरल्याचे दिसले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ponda: बहिणीने धाडस केले पण भाऊ बचावला नाही; 17 तासानंतर आढळला दर्शन नार्वेकरचा मृतदेह

मेरशीत एक महिन्यापासून उभ्या जीपमध्ये आढळला मृतदेह, परिसरात खळबळ; गोव्यातील ठळक बातम्या

Goa Belgaum Highway: गोवा-बेळगाव महामार्गावरील वाहतूक ठप्प, दोन्ही बाजूला 4-5 किलोमीटर लांब वाहनांच्या रांगा

Divar Island: पाचव्या शतकातील निर्मिती प्रक्रिया वापरुन गोव्यात उभारलं जातंय जहाज; पुढल्या वर्षी करणार गुजरात ते मस्कत प्रवास

Funny Viral Video: 3 वर्षापासून पैसे साठवून 4 मित्र गोव्याला निघाले, टोल भरण्यातच खिसे रिकामे झाले

SCROLL FOR NEXT